...मग नितीन आगेची हत्या कोणी केली?

नितीन आगेचे आई वडील Image copyright SUDHARAK OLWE
प्रतिमा मथळा नितीन आगेचे आई वडील

नितीन आगेची हत्या झाली हे सत्य आहे तर मग त्याला कोणी मारलं हा प्रश्न प्रत्येकाला का पडत नाही? त्याला कोणीच मारलं नाही का?

दिवसाढवळ्या सगळ्यांदेखत 17 वर्षांच्या मुलाला अमानुषपणे मारलं जातं आणि सगळेच्या सगळे आरोपी निर्दोष सुटतात, तेव्हा अर्थातच प्रश्न विचारण्याची प्रत्येकाची जबाबदारी अधिकच वाढते.

नितीन आगे या दलित मुलाची गावातल्या सवर्ण समाजातल्या लोकांनी एप्रिल 2014 हत्या केली, अशी बातमी मीडियात आल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आगे कुटुंबीयांची भेट घेतली होती.

या भेटीच्याही बातम्या झळकल्या. आगे कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन गेल्या चार वर्षांमध्ये कुठे विरून गेलं? हा प्रश्न तेच राजकीय नेते स्वत:ला विचारतील का?

परवाच्या निकालानंतर मी खूप अस्वस्थ आहे. निराशाजनक तपास झाला हे उघड आहे, हे मी जवळून पाहिलंय. दलित अत्याचारासंबधी गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली नाही तर गुन्ह्यांचं प्रमाण कमी होणं शक्य नाही. इथे पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी महत्त्वाची आहे.

जर आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणवून घेत असू तर अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांच्या बाबतीत आपली अवस्था दयनीय आहे. खरं तर गुन्हा घडू नये यासाठी कायद्याचा वापर झाला पाहिजे. जर शिक्षाच होणार नसेल तर पोलीस आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्याची गरज आहे. महाराष्ट्रासाठी हे चिंताजनक आहे.

Image copyright SUDHARAK OLWE
प्रतिमा मथळा गुन्ह्याची तीव्रता पाहुन गुन्हेगाराला शिक्षा होईल अशी आशा राजू आगेंना होती.

गेल्या वर्षी मराठा मोर्चात अॅट्रोसिटी कायद्याविषयीचीही मागणी होती. त्यावेळी मी विचार करत होतो- राज्यभरातल्या दलित अत्याचाराच्या घटनांची सत्य परिस्थिती काय आहे हे पाहिलं पाहिजे.

राज्यातल्या अशा 20 गाजलेल्या अॅट्रोसिटी केसेस मी निवडल्या. माझ्यासोबत टीममध्ये रिसर्चरही होते. अभ्यास करताना लक्षात आलं मुळात केस रजिस्टर होण्याचं प्रमाण खूप कमी आहे.

अॅट्रोसिटी होण्याची कारणं काहीही असू शकतात. आंतररजातीय प्रेम, लग्न, बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याचा रिंगटोन, पाणी घेतलं, योजनेचे लाभार्थी झाले... अशी एक ना अनेक कारणं. आणि त्यानंतर काहीही होऊ शकतं- खून, बलात्कार, अपमान, अमानुष छळ.

घटना घडल्यानंतर पहिल्यांदा कधीच पोलीस स्टेशनमध्ये केस नोंदवून घेतली जात नाही. घटना घडली आहे हे सांगण्यासाठी दलित समाजाला रस्त्यावर उतरावं लागतं. अॅट्रोसिटीच्या 90टक्के केसेसमध्ये आरोपी निर्दोष सुटतात तर शिक्षा होण्याचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

अशाच 20 केसेस मधली एक केस होती ती नितीन आगेच्या हत्येची.

Image copyright SUDHARAK OLWE
प्रतिमा मथळा याच लिंबाच्या झाडाला नितीनचा मृतदेह अर्धवट लटकलेला अवस्थेत मिळाला.

नितीन आगेचं वय होतं अवघं १७ वर्षं. इयत्ता अकरावीत शिकणारा नितीन बौद्ध (महार) जातीत जन्माला आला. शाळेतला हुशार विद्यार्थी होता. स्वत:चं आयुष्य घडवण्यापूर्वीच त्याची अमानुषपणे हत्या झाली.

कथित उच्च जातीतल्या मुलीशी बोलतो म्हणून त्याला मारून झाडाला लटकवलं गेलं होतं. त्याच जातीतील तीन जणांवर या हत्येचा संशय होता. त्यात त्या मुलीच्या भावाचाही समावेश होता. नितीनचे मुलीशी प्रेमसंबंध आहेत, असं वाटून त्याला त्रास दिला जात होता. शाळेतही त्याचा वारंवार छळ केला गेला.

नितीन आगेची हत्या होऊन तीन वर्षं झाली होती. त्याच्या घरी खर्ड्याला आम्ही पोहोचलो तेव्हा त्याचे वडील राजू आगे यांच्या मनात संताप होता. तीन वर्षांनंतर मदत करणाऱ्या सगळ्यांनीच पाठ फिरवली होती. कोणीच मदतीला येत नव्हतं अशी त्यांची खंत होती.

हत्येतले आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डनुसार फरार होते, पण गावात राजरोसपणे फिरत होते, याविषयी त्यांना चीड होती. शेकडो लोकांना त्यांनी स्वत:ची कहाणी सांगितली होती, तशी आम्हालाही सांगितली.

खरंतर आगे कुटुंब खर्डापासून लांब एका गावात राहात होतं. पण नितीनची अभ्यासातली प्रगती पाहून त्याला खर्डाच्या इंग्लिश मीडियम विद्यालयात टाकलं. आणि त्यासाठीच हे कुटुंब खर्डाला येऊन स्थायिक झालं.

शाळेत शिकता-शिकता नितीन पार्टटाईम नोकरी करत होता. मोटरसायकल गॅरेजमध्ये जाऊन काही वर्षं त्याने प्रशिक्षणही घेतलं होतं. खर्डा गावातील गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूलमधून तो बारावी परीक्षेची पूर्वतयारी करत होता.

अकरावीतल्या हुशार मुलाला जिद्दीने शिकवू पाहणारा बाप बोलत होता. राजू आगे यांच्या म्हणण्यानुसार - "नितीन शाळेत गेल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट शाळेच्या आवाराबाहेर जाऊन मारहाण करण्याचा सल्ला दिला."

"मग ते नितीनला शाळेबाहेर घेऊन गेले आणि बेदम मारलं. हा प्रकार पाहणाऱ्या लोकांनी नंतर मला सांगितलं की, नितीनची गावकऱ्यांसमोर नग्न धिंड काढली. पण या अत्याचाराला कोणीच विरोध केला नाही. हा सगळा प्रकार पाहणारे मराठा जातीचे होते. त्यामुळे जातीच्या भीतीने कोणीच मध्ये पडलं नाही. एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याला जसं मारतात तसं माझ्या मुलाला मारून टाकलं."

"तीन जणांनी नितीनचे हात-पाय मोडून त्याला खाली पाडलं. फिल्मी स्टाईलने त्याच्या अंगावरून मोटरसायकल चालवली गेली. आणि त्याहूनही अमानुष म्हणजे त्याच्या गुप्तांगात गरम सळई घातली."

"त्यानंतर त्याचा मृतदेह गावातल्या लिंबाच्या झाडाला बांधला गेला. ही आत्महत्या वाटेल असं भासवलं गेलं.लिंबाचं झाड इतक्या कमी उंचीचं आहे की त्याला बांधून कोणी गळफास घेईल यावर विश्वास बसणार नाही", असं राजू आगे सांगतात.

ही घटना सांगताना गुन्ह्याची तीव्रता पाहून गुन्हेगाराला शिक्षा होईल अशी आशा राजू आगेंना होती.

मराठा मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनला लक्ष्य केलं गेलं, असा आरोप आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा दावा होतो की - 'नितीनला मारहाण केली पण त्याचा खून केला नाही. त्याने आत्महत्या केली असावी.'

पण नितीनच्या आईचं यावर वेगळं म्हणणं होतं. घटनेच्या दोन दिवस आधी नितीनने आईला सांगितलं होतं की- या मुलीने स्वतःहून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.

"माझा मुलगा अगदी नम्र होता. त्याने आम्हाला कधीच त्रास दिला नाही. त्याला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. शिवाय त्याला कुठल्याही भांडणात पडायचं नव्हतं." भरलेल्या डोळ्यांनी त्याची आई सांगत होती.

नितीन गेल्यानंतर तीन वर्षांनी आगे कुटुंबात एका बाळाचा जन्म झाला. या बाळाचं नाव नितीन ठेवलं आहे. हा नवा नितीन आगे कुटुंबात आनंद घेऊन आला आहे.

आज राजू आगे यांचं वय 55च्या आसपास असेल. मी त्यांना विचारलं हेच नाव का ठेवलंत? त्यावर म्हणाले- 'अजूनही हरायचं नाही. एक नितीन गेला म्हणून काय झालं, दुसरा नितीन उभा राहील. आम्ही विटाळ, अन्यायाविरोधात स्वाभिमानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय."

Image copyright SUDHARAK OLWE
प्रतिमा मथळा नितीन आगेच्या मृत्यूनंतर कुटुंबात आलेल्या नवीन सदस्याचं नाव नितीन ठेवण्यात आलं.

पण राजू आगे यांच्या या लढण्याच्या ताकदीला परवाच्या निकालाने धक्का दिला आहे असं मला वाटतं. म्हणून मी अस्वस्थ आहे. आपला पोटचा मुलगा गेल्यावर धक्का पचवूनही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेवर नितीनच्या आई-वडीलांनी जोडे झिजवले आहेत. आगे कुटुंब आता दुसऱ्यांदा यंत्रणेचा बळी ठरलं.

मी अभ्यास केलेल्या 20 केसेसमधला समान धागा हाच आहे की- केस उभी राहात नाही तेव्हा फाईल बंद करुन टाकली जाते. आणि दुसरीकडे गुन्हाच्या तीव्रतेनुसार केस उभीच राहात नाही.

नितीनच्या बाबतीत तेच झालं. सरकारी यंत्रणा पाठिशी असताना केस कशी हरू शकतं? हे सरकारी वकिलांचं अपयश आहे. प्रयत्न कमी पडले याचं मला दु:ख वाटत वाटतंय.

एका दलिताची हत्या असो की शंभर दलितांची हत्या असो, समाजात याविषयी अनास्था आहे. अॅट्रोसिटीची केस केल्यावर अख्खं गाव दलित कुटुंबाच्या विरोधात जातं. असलेले जुने संबंध नाहीसे होतात.

Image copyright SUDHARAK OLWE

गावात काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही. तरीही न्यायव्यवस्थेवरचा विश्वास म्हणून कित्येक आई-वडील रक्ताचं पाणी करतात. कारण मी पाहिलेल्या बहुतांश केसेसमध्ये दलित तरुण-तरुणींचेच बळी गेले आहेत.

महाराष्ट्रात जातीभेदाविरोधात लढण्याची परंपरा मोठी आहे. जातीच्या पलीकडे माणसाला माणूस म्हणून पाहण्याच्या जाणीवा अजूनही जिवंत आहेत.

म्हणूनच फक्त एक करू या. उठून प्रश्न विचारू या. नितीन आगेच्या आई-वडिलांच्या जागी उभं राहून विचारा.. माझ्या मुलाला कोणी मारलं? तुम्ही स्वत:ला, व्यवस्थेला, यंत्रणेला पुन्हा एकदा विचारून पाहा- ...मग नितीन आगेची हत्या कोणी केली?

ता.क : जुलै 2016 पर्यंत अट्रोसिटीच्या 1027 केसेस नोंदवल्या गेल्या. त्यातील फक्त 14 केसेसमध्ये आरोपींना शिक्षा झाली. एकंदरीत शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प म्हणजेच 3 ते 4 टक्के आहे.

2013च्या तुलनेत 2015मध्ये अॅट्रोसिटीच्या केसेसचं प्रमाण जास्त आहे. 2013मध्ये 1399 केसेसची नोंद झाली तर 2015मध्ये 2299केसेसची नोंद झाली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाच्या रेकॉर्डनुसार अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचाराच्या प्रमाणात 2014ते 2015मध्ये 3.8 टक्क्यावरून 4.1 टक्के इतकी वाढ झाली आहे.

(लेखक पद्मश्री सुधारक ओलवे सामाजिक कार्यकर्ते आणि छायाचित्रकार आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)