गुजरातमध्ये प्रचारासाठी भाजप इतका फौजफाटा का उतरवत आहे?

भाजप Image copyright Getty Images

गुजरात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसं सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्यांना प्रचारात आणताना दिसत आहे.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात चार सभा घेत आहेत. याआधीही त्यांनी अनेक दौरे केले आहेत. एकदा तर बुलेट ट्रेन भूमिपूजनाच्या निमित्तानं जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यासोबत सप्टेंबरमध्ये एक रोडशो देखील झाला.

याव्यतिरिक्त केंद्र सरकारमधले मोठे चेहरे - राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती आणि भाजपचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचार करतच आहेत. त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि छत्तीसगडचे रमण सिंह यांचा समावेश आहे.

आणि या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्य समन्वयक म्हणून केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांची नेमणूक झाली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन

जवळजवळ दोन दशकांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला इतका मोठा प्रचार कार्यक्रम का करावा लागतो आहे?

समाजशास्त्रज्ञ शिव विश्वनाथन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "भाजपनं प्रचारासाठी गुजरातमध्ये त्यांचे अनेक दिग्गज नेते पाठवले आहेत. भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. भाजप प्रचंड बहुमतानं जर निवडून आलं नाही तर हे त्यांच्यासाठी हरण्यासारखंच असेल."

पण भाजपचं याविषयी मत वेगळं आहे.

भाजप मीडिया सेलचे प्रमुख हर्षद पटेल म्हणतात, "जे केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री प्रचारासाठी गुजरातमध्ये येत आहेत ते पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत. कोणत्याही राज्यात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा प्रचारासाठी केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री जातातच ना!"

'भाजपनं मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला होता'

ज्येष्ठ पत्रकार अजय उमठ सांगतात, "याआधी कधीच भाजपचे इतके सारे केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचारासाठी आले नव्हते.

"2007 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भाजपनं काँग्रेसला टोला लगावला होता", ते सांगतात.

ते पुढे सांगतात, "त्यावेळी भाजपने असं म्हटलं होतं की, काँग्रेसला पराभवाची भीती आहे. म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग प्रचारासाठी गुजरातमध्ये आले आहेत."

Image copyright Getty Images

आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचारासाठी उतरले आहेत.

गुजरातमध्ये प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या टीकेचं प्रत्युत्तर निर्मला सीतारामन त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन देताहेत.

"राज्यात विकास नाही, व्यवसायात प्रगती नाही, रोजगार नाहीत," असं राहुल एका सभेत म्हणाले. मग सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत काँग्रेसला प्रश्न केला, "एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमची कामगिरी चोख बजावली का?"

"काँग्रेसला जनतेनं चार वेळा नाकारलं आहे. ज्यावेळी काँग्रेसची सत्ता केंद्रात होती त्यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांना परवानगी दिली नाही. त्यामुळं गुजरातची कामं रखडली. त्याचं तुमच्याकडं काय उत्तर आहे?" असा सवाल सीतारामन यांनी केला.

Image copyright Getty Images

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 9 डिसेंबरला 89 जागांसाठी मतदान होईल. 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)