'आप म्हणजे स्वयंस्फूर्तीनं उभ्या राहिलेल्या आंदोलनाची हत्या'

आम आदमी पार्टी Image copyright Getty Images

आम आदमी पक्षाला नुकतीच पाच वर्ष पूर्ण झाली. 2012 मध्ये हा पक्ष स्थापन झाल्यापासून 'आप' ने नेहमीच भ्रष्टाचाराविरूद्ध लढणारा पक्ष अशीच आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला.

अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनातून बळ मिळालेल्या अरविंद केजरीवालांनी आपला स्वतःचा पक्ष काढला. हा पक्ष सामान्य माणसासाठी काम करेल असं म्हणत त्यांनी या पक्षाला 'आम आदमी पक्ष' असं नावं दिलं.

पाच वर्षांनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की 'आप'च्या राजकीय वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर वाचकांनी त्यांची भरभरून मतं मांडली.

या आहेत त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया.

Image copyright Getty Images

संकेत भोसले आणि धनंजय साठे यांना अरविंद केजरीवाल यांचे काम पसंत पडलं आहे. "आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात 'आप'नं उल्लेखनीय काम केलं आहे," असं भोसले म्हणतात, तर "दिल्लीमध्ये अतिशय उत्तम काम सुरू आहे. निदान ते गाजरं आणि आश्वासनं तरी देत नाहीत," असं साठेंनी लिहीलं आहे.

मकरंद डोईजड म्हणतात, "अवघ्या ५ वर्षांचा अनुभव असलेल्या पक्षानं काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना गर्वाचं घर नेहमी खाली असतं हेच दाखवून दिलं. ७० पैकी ६७ आमदार निवडून येणं हा दिल्लीतील मतदारांनी दाखवलेला विश्वासच आहे. एवढं प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर दिल्ली सरकारनं शैक्षणिक, आरोग्य, क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे."

Image copyright Facebook

"जगण्यासाठी सरकारनं ज्या मुलभूत गरजा पुरवल्या पाहिजेत त्या सर्व गरजा आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये पुरवत आहे. सरकारी शाळांचा झालेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे, महागड्या वैद्यकीय सेवा फुकटात होत आहेत. पाणी आणि वीज अल्पदरात मिळत आहे यापेक्षा अजून काय अपेक्षा असते सरकारकडून?" असं मत निखील खळे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

शरद शेळके आणि अनिल कुलकर्णी म्हणतात की, त्यांचं काम जनहिताच वाटतं. त्याबद्दल सामान्य जनतेची तक्रार नाही म्हणजे त्यांचं काम ठीक आहे असं म्हणायचं.

Image copyright Facebook

अर्थात प्रत्येकालाच अरविंद केजरीवाल यांचं काम किंवा त्यांच्या आप पक्षाची ध्येयधोरणं पटलेली आहेत असं नाही.

नचिकेत भंडारी म्हणतात की लोकांनी मोठ्या अपेक्षेनं केजरीवालांच्या आप पक्षाला सत्ता दिली. पण ते बऱ्याच बाबतीत अयशस्वी ठरले. त्यांच्या स्वतःच्याच मंत्र्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे केजरीवालांची राजकीय कारकीर्द ही प्रभावी राहिली नाही.

Image copyright Facebook

"आम आदमी पार्टी म्हणजे व्यक्तिगत महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगला उद्देश घेऊन स्वयंस्फूर्तीनं उभं राहिलेल्या जन आंदोलनाची केजरीवाल यांनी केलेली हत्या होय," असं अजय चौहान यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

तर राजेंद्र गधारींच मत आहे की आम आदमी पार्टीचा फुगा लवकरच फुटणार आणि पक्ष भुईसपाट होणार.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)