प्रेस रिव्ह्यू: 'मला माझं स्वातंत्र्य हवं आहे', हादियाची न्यायालयाला विनंती

कोर्ट

लग्न करण्यासाठी धर्मांतर करून मुस्लीम होण्याच्या मुलीच्या निर्णयाला तिच्या पालकांनीच न्यायालयात आव्हान दिलं आहे.

या हादिया प्रकरणासंदर्भात इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, "मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. मला माझ्या पतीबरोबर राहण्याची इच्छा आहे आणि मला माझं शिक्षणही पूर्ण करू द्यावं," अशी विनंती हादियाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

त्यांची विनंती मान्य करत हादियानं आपलं शिक्षण पूर्ण करावं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा व्हावी अशी विनंती हादियाच्या वडिलांनी केली होती. ती न्यायालयाने अमान्य केली आहे. हादिया उर्फ अखिलाने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्माचा स्वीकारला होता.

त्यावर त्यांच्या वडिलांनी हरकत घेतली होती. हे प्रकरण न्यायालयात गेलं. केरळच्या उच्च न्यायालयानं हादियाचं लग्न रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हादिया यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं, असं या बातमीत म्हटलं आहे.

राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी नाही?

Image copyright Narayan Rane/Twitter

भारतीय जनता पक्षाकडून समर्थन मिळून नारायण राणे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होईल या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर केली असल्यानं राणेंची चर्चा थंडावल्याचं हे वृत्त आहे.

7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

शिवसेनेच्या विरोधानंतर नारायण राणे यांच्याऐवजी लाड यांना उमेदवारी दिली असं एबीपीनं म्हटलं आहे.

मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यावर कृष्णकुंजवर तातडीची बैठक

मुंबईतल्या विक्रोळी परिसरात मराठी पाट्यांसाठी निवेदन देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर सोमवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे मनसेची तातडीची बैठक पार पडल्याचं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

Image copyright INDRANIL MUKHERJEE
प्रतिमा मथळा राज ठाकरे

विक्रोळी येथे फेरीवाल्यांना विरोध करण्यासाठी गेले असता मनसेच्या कार्यकर्त्यांना मार खावा लागला होता. त्यानंतर ही बैठक बोलवण्यात आली.

आर. अश्विनच्या 300 विकेट पूर्ण

भारतीय गोलंदाज आर. अश्विननं सोमवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात 300 विकेटचा टप्पा पूर्ण केला.

Image copyright Getty Images

सर्वांत जलदगतीनं 300 कसोटी विकेट घेण्याचा डेनिस लिली यांचा विक्रमही अश्विननं मोडला आहे. आपल्या 54 व्या सामन्यात 4 विकेट घेत अश्विननं हा इतिहास रचला आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे.

इतर क्रीडावृत्तात, प्रसिद्ध भारतीय स्नूकरपटू पंकज अडवाणीनं IBSF वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आहे. दोहा येथे झालेल्या अल अराबी स्पोर्ट क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत पंकज अडवाणीनी एक नवा विक्रम रचला आहे.

हे अडवाणीचं जागतिक स्पर्धेतलं 18वं विजेतेपद आहे.

तुम्ही हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)