ब्लॉग : प्रेमासाठी पालकांविरोधात एल्गार पुकारणाऱ्या महिला

hadiya Image copyright SHAFIN JAHAN/FACEBOOK

केरळमधल्या हदियाच्या लग्नाच्या निमित्तानं लवजिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलंमुली पालकांविरोधात का भूमिका घेत आहेत याचा बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्या यांनी घेतलेला वेध.

हदिया एका हिंदू कुटुंबातली मुलगी. सज्ञान झाल्यावर हदियानं मुस्लीम धर्म स्वीकारला आणि एका मुस्लीम मुलाशी लग्न केलं. केरळमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय हदिया जहाँ हिची कहाणी वेगळी नक्कीच नाही.

पण तिच्या आयुष्यातल्या घडामोडी अभ्यासणं आवश्यक आहे. कारण हदियाच्या पालकांनी तिला नजरकैदेत ठेवलं होतं. कारण एकच हदियानं निवडलेला मुलगा त्यांना मान्य नाही.

हिंदू मुलींचं मुस्लीम मुलाशी लग्न होतं आणि मुस्लीम मुलींचं हिंदू मुलाशी लग्न होतं. भारतात गेली अनेक वर्ष अशी लग्न होत आहेत.

अशा लग्नांच्या वेळी दोन्ही बाजूंची कुटुंबं कठोर विरोधात असतात. मात्र आता या मुली आणि महिला आपल्या कर्मठ कुटुंबीयांना कडवी टक्कर देत आहेत.

मुली आणि महिला स्वत:चे निर्णय स्वत: घेत आहेत आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. प्रेम केलं त्या प्रियकरासाठी त्या मुली आणि महिला नाराज कुटुंबात प्रवेश करतात, त्यांचा सामना करतात. स्वत:चा धर्म, घरचे आणि रुळलेलं वातावरण हे सगळं सोडून एका नव्या घरात स्वत:चं स्थान मिळवण्याची त्यांची धडपड असते. आणि हे सगळं करायचं केवळ आपल्या प्रियकरासाठी.

हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलगी अशा एका दांपत्याशी मी बोलले, त्यांची अट एकच होती- नाव न सांगण्याची.

Image copyright PTI

मुलीच्या घरच्यांकडून हल्ल्याची शक्यता असल्यानं या दोघांना त्यांचं शहर सोडावं लागलं.

दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. लग्न झालं आहे हे कळल्यावर मुलाच्या घरचे दोघांच्या नात्याला मान्यता देतील, असा मुलीच्या घरच्यांचा होरा होता.

सगळ्या प्रकारचे धोके दिसत असतानाही 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'नुसार त्यांनी गुपचूप लग्न केलं. लग्न झाल्यावर ते दोघे मुलाच्या घरी पोहोचले.

भारतात दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्ती स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत कायदेशीर विवाह करू शकतात.

हिंदूधर्मीय मुलाशी लग्न केलेल्या त्या मुस्लीम मुलीनं सांगितलं की, "भारतात लग्न झाल्यावर मुलगी मुलाच्या घरी जाते. त्यानुसार लग्न झाल्यावर आम्ही नवऱ्याच्या घरी गेलो. त्यांना नाईलाजानं माझा स्वीकार करावा लागला. मात्र मुलांसाठी असं नसतं."

मुली स्वत:चे निर्णय खुलेपणाने सांगूही शकत नाही. आमच्यासाठी चांगलं काय, वाईट काय हे आम्हाला समजतं यावर कुणाचाही विश्वास नाही.

आमचं लग्न होऊ नये यासाठी माझ्या घरचे कुठल्याही थराला जाऊ शकतात याची, कल्पना होती म्हणूनच लग्न झाल्यावर आम्ही शहर सोडलं.

Image copyright A S SATHEESH/BBC

ती मुलगी पुढची पाच वर्ष घरच्यांशी एकदाही बोलली नाही. तिचे वडील खूप आजारी होते. मात्र तिला कोणीही याची कल्पना दिली नाही. वडिलांचं निधन झाल्यावर तिला कळवण्यात आलं.

ती मुलगी म्हणाली, "मला निर्णयाचा जराही पश्चाताप नाही. लग्नासारखा आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला होता. घरच्यांना माझ्यावर विश्वास ठेवावासा का वाटला नाही हे न उलगडलेलं कोडं आहे. या निर्णयामागचा माझा विचार आणि भूमिका मांडण्याची एक संधीही वडिलांनी मला दिली नाही याचं वाईट वाटतं."

यामध्ये वयाचा आणि अनुभवाचा मुद्दा नाही. मुलीवरचं नियंत्रण गमावल्याची आणि समाजात बेअब्रू होईल ही भीती हे विरोधामागचं खरं कारण आहे.

दुसऱ्या एका प्रसंगात हिंदू मुलीनं मुस्लीम मुलाशी लग्न करण्यासाठी दहा वर्षं प्रतीक्षा केली. जेव्हा त्यांचे ऋणानुबंध जुळले तेव्हा ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती. मात्र तरीही तिच्या निर्णयाला विरोध झाला.

तिच्या पालकांच्या मते हा कट होता. लग्न होणं म्हणजे धर्मबदलाची सक्ती होईल, असं तिच्या पालकांचं म्हणणं होतं.

प्रत्यक्षात मुस्लीम मुलानं त्या मुलीसमोर अशी कोणतीही अट ठेवली नव्हती. आणि लग्नानंतर त्यानं धर्मबदलाची सक्ती केली नाही.

तिनं मला सांगितलं, "आमचं लग्न म्हणजे लव-जिहाद नव्हतं. माझं ब्रेनवॉश वगैरे एकदाही करण्यात आलं नव्हतं. फक्त एका मुस्लीम मुलावर माझं प्रेम होतं. प्रेमात कोणत्याही धर्माचा मुलगा किंवा मुलगी पडू शकते."

मात्र आईवडिलांना हे समजण्यासाठी तब्बल दहा वर्षं लागली. त्यांनी समजून घेतलं कारण आर्थिकदृष्ट्या ते तिच्यावर अवलंबून होते.

Image copyright PTI

वाढतं वय आणि आजारपणांनी शरीराचा ताबा घेतला होता. त्यांची मुलगीच घरातली कर्ती होती. घराचा सगळा डोलारा चालवण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती.

अशी परिस्थिती आली की, मुलीच्या आयुष्यावर हक्क गाजवणं आता शक्य नव्हतं.

प्रेमात पडल्यावर दहा वर्षांनंतर तिला आपला मनासारखा जोडीदार मिळाला.

तिनं मला सांगितलं, "मी माझ्या प्रेमाबद्दल ठाम होते. माझ्या आईवडिलांची लग्नाला परवानगी नाही म्हणून माझी वाट पाहत थांबण्याची गरज नाही. तू दुसऱ्या मुस्लीम मुलीशी लग्न करू शकतो. मी तुझी दुसरी बायको होते असं स्पष्ट केलं. पण त्यानं नकार दिला. मी तुझी वाट पाहतो असं त्यानं सांगितलं. कारण मुली म्हणजे मेंढ्याबकऱ्या नाहीत, अशी त्याची भूमिका होती."

हदियाचा अनुभव मात्र विदारक होता.

लग्नाला विरोध असल्यानं घरच्यांनी अनेक महिने नजरकैदेत ठेवलं असा आरोप तिनं केला आहे. नवऱ्यानं तिच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली म्हणून सोमवारी तिची नजरकैदेतून सुटका होऊ शकली.

तिच्या लग्नाची शहानिशा होत आहे.

हदियाचं लग्न म्हणजे लवजिहाद आहे, या विचारातून तिच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

लग्नाच्या बहाण्यानं तिला सीरियातल्या कथित ISमध्ये पाठवण्याचा कुटील डाव आहे, असं मुलीच्या पालकांचं म्हणणं होतं. केरळ उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालय हदियाच्या लग्नाप्रकरणी लवकरच निर्णय देणार आहे.

मात्र न्यायालयाच्या प्रांगणात आणि बाहेरही हदियानं स्पष्ट आवाजात आपले विचार मांडले.

प्रसारमाध्यमांसमोर बोलताना ती म्हणाली, 'मी मुसलमान आहे. मी स्वमर्जीनं हा धर्म स्वीकारला आहे. हा धर्म स्वीकारण्याची माझ्यावर कोणीही सक्ती केली नाही. मला न्याय हवा आहे आणि मला पतीबरोबर राहायचं आहे.

आपल्या निर्णयांविषयी, भूमिकेविषयी ठाम असणाऱ्या अनेक मुली आणि महिलांप्रमाणेच हदियाही तिच्या म्हणण्यावर ठाम आहे.

स्वत:चा निर्णय फसला किंवा निवड चुकली तरी तिला या निर्णयाचं स्वातंत्र्य हवं आहे.

अगदी तसंच जसं पुरुषांना निर्णय घेण्याची आणि चुका करण्याची संधी मिळते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)