बिटकॉईन म्हणजे नेमकं काय? मलाही कोट्यधीश होता येईल का?

bitcoins Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बिटकॉईन्स मधली तेजी किती खरी?

भारतात सध्या अधिकाधिक व्यवहार ऑनलाईन करण्याचं पेव फुटलं आहे. 'डिजिटल इंडिया' आणि 'कॅशलेस इंडिया' सारख्या योजना आखून सरकारही ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी जागतिक स्तरावर बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीने सगळ्यांना गोंधळात टाकलं आहे.

अगदी मंगळवारीच बिटकॉईनचा ताजा भाव डॉलरमध्ये दहा हजार वर गेला. म्हणजे एका बिटकॉईनची किंमत दहा हजार डॉलर आहे.

बिटकॉन इंडिया साईटवर ही किंमत 8 लाख 76 हजार 226 रुपये दाखवली जात आहे.

आणि मग लगेच गुरुवारी हा आकडा 11 हजारच्याही पार गेला होता.

याचा सरळ अर्थ असा की तुमच्याकडे एक जरी बिटकॉइन असेल तरी तुम्ही मिलियनेअर आहात.

गंमत म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉईनचा दर फक्त हजार डॉलर होता. आता अचानक नोव्हेंबर महिन्यात त्याचा भाव वाढला आहे.

त्याच्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे, जागतिक स्तरावर अधिकाधिक देशांमध्ये बिटकॉईनला मिळणारी मान्यता. आणि दुसरं म्हणजे, या व्यवहारांसाठी ज्या नेटवर्क आणि प्लॅटफॉ़र्मचा वापर होतो त्या ब्लॉकचेनची सुरक्षितता.

ब्लॉकचेन एक अशी ऑनलाईन व्यवस्था आहे जिथे डिजिटल व्यवहार करता येतात. ही कुठलीही आर्थिक सेवा नसून फक्त एक आर्थिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे.

अलीकडे अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीटवरची एक कंपनी बिटकॉईनचे ETF काढणार असल्याची बातमी आली होती.

ETF म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड. हा म्युच्युअल फंडसारखा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे जिथे तुमचे पैसे तज्ज्ञ गुंतवतात. आणि झालेला नफा तुम्हाला गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटला जातो.

त्यामुळं म्युच्युअल फंडप्रमाणेच या क्रिप्टो करन्सीची विश्वासार्हता आणखी वाढली आहे.

अर्थातच बिटकॉईनबद्दल अचानक इतकं कुतूहल निर्माण झालं असताना धोक्याची घंटाही आहेच.

जवळ जवळ सगळेच शेअर बाजार नियामक संस्थांकडून चालवले जातात. म्हणजे व्यवहारांवर नियामक मंडळाचं लक्ष असतं. पण इथं तसं नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बिटकॉईनमधली तेजी कशामुळे

बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात. आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या फक्त दोन व्यक्तींमध्ये होतात. आणि त्यावर इतर कुणाचंही नियंत्रण नसतं.

शिवाय, बिटकॉईनचे दर अचानक वाढले आहेत. त्याची नेमकी कारणं अजूनही कळलेली नाहीत. त्यामुळे हे दर वाढले तसे खाली येऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करतच आहेत.

बिटकॉईन म्हणजे काय?

भारतात जिथे आर्थिक साक्षरता मूळातच कमी आहे, तिथे बिटकॉईन ही संकल्पना तशी अगदीच नवीन आहे.

बिटकॉईन इंडिया सारख्या जवळपास 25 साइट्स आहेत जिथं तुम्ही हे व्यवहार करू शकता. पण बिटकॉईनला कायदेशीर मान्यता नसल्यानं भारतात त्याला फारसा उठाव नाही.

पण अमेरिका आणि महत्त्वाच्या युरोपीय देशांमध्ये ते सर्रास वापरली जातात. म्हणून या निमित्तानं बिटकॉईन म्हणजे काय, हे समजणं गरजेचं आहे.

बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.

जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साइट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.

ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.

जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.

2017 पर्यंत जगभरातल्या एक लाखांहून अधिक सुपरमार्केट चेन्स आणि मोठ्या दुकानदारांनी बिटकॉईनमध्ये व्यवहारांना मान्यता दिली आहे.

भारतातही इन्फोसिसच्या इन्फोसिस फिनॅकल या सबसिडरी कंपनीनं नुकतंच ब्लॉकचेनच्या माध्यमातून व्यवहारांसाठी 11 बँकांसोबत प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बिटकॉईनचा वाढता वापर

त्यामुळे वॉलेटमध्ये जमलेले बिटकॉईन तुम्ही कदाचित लवकरच बँकिंग व्यवहारांमध्येही वापरू शकाल. किंवा तुम्हाला हव्या असलेल्या करन्सीमध्ये बदलून घेऊ शकता.

हे सगळे व्यवहार ऑनलाईन आणि त्याचबरोबर फक्त दोन अकाऊंट दरम्यान होतात. कुठलाही मध्यस्थ नसतो.

याचवर्षी ऑगस्टमध्ये बिटकॉईनचे दोन प्रकार पाडण्यात आले - एक म्हणजे क्लासिक बिटकॉईन किंवा BCT, ज्याचा सर्रास वापर होतो. आणि दुसरा म्हणजे हार्डफोर्क बिटकॉईन कॅश किंवा BCH.

शिवाय क्लासिक बिटकॉईनची 1, 0.1, 0.01, 0.001 अशी डिनॉमिनेशनही आहेत. म्हणजे कमी मूल्याचे बिटकॉईन तुम्ही खरेदी करू शकता.

याशिवाय इथेरिअम, लाईटकॉईन, रिपल, डॅश, मोनेरो, डॉजकॉईन अशा अनेक क्रिप्टो करन्सी आहेत. पण त्या बिटकॉईनच्या जवळपासही नाहीत. शिवाय त्यांची विश्वासार्हताही नाही.

बिटकॉईनचे फायदे काय?

बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.

कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही.

पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण होऊ शकते. त्यासाठी सगळ्यांत सोपा गेट वे आहे.

जगभरात अनेक वित्तीय संस्था बिटकॉईनचे ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातही रिझर्व्ह बँक त्याबाबतीत सकारात्मक आहे. पण ही तरतूद ट्रेडिंग नाही तर ऑनलाईन व्यवहारांसाठी आहे. त्यासाठी ब्लॉकचेन सुरक्षित प्रणाली समजली जाते.

सध्या रशिया आणि अर्जेंटिना वगळता इतर देशांमध्ये बिटकॉईन व्यवहार सुरू आहेत.

यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलंही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.

तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्यूटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.

सावधान! पुढे धोका आहे?

बिटकॉईनच्या वापरावर भारतात बंदी नसली, तरी तुम्ही जर गुंतवणूक म्हणून यात पैसे टाकण्याचा विचार करत असाल, तर थोडं सावध राहिलेलं बरं.

कारण आतापर्यंत बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवणारे लोक हे गॅम्बलिंग, हॅकिंगसारखे कारभार करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याचं भवितव्य अधांतरी आहे.

बिटकॉईनची सुरुवात 2009मध्ये झाली. 2010 पर्यंतचं याचं मूल्य अक्षरश: 0.003 डॉलर होतं. पण त्यानंतर अचानक ही वाढ झाली आहे. पण पुढे काय होईल? ही वाढ अशीच होत राहील का? की हा एक फुगा आहे? कुणालाच ठाऊक नाही, म्हणूनच तज्ज्ञ सावधानतेचा इशारा देत आहेत.

याला आणखी एक कारण म्हणजे, जगभरात रॅन्समवेअरचा हल्ला झाला तेव्हा याच हॅकर्सनी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे मिळवले होते.

जाणकारांनुसार हँकर्सनी मग हे पैसे बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आणि म्हणून हा फुगवटा निर्माण झाला. त्यांनी पैसे काढले तर फुगा फुटेल, अशी भीती आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करताना घ्यायची काळजी

बिटकॉईन्सच्या अधिकृत वेबसाईटवरच इशारा आहे - "You should never expect to get rich with Bitcoin or any emerging technology. It is always important to be wary of anything that looks too good to be true or disobeys any basic economic rules."

"There is no guarantee that bitcoin will continue to grow even though it has developed at a very fast rate so far. All of these methods are competitive and there is no guarantee of profit."

अर्थात, "बिटकॉईनसारखं कोणतंही नवं तंत्रज्ञान तुम्हाला कमी वेळात श्रीमंत करू शकत नाही. जर गुंतवणुकीसाठी कोणतीही गोष्ट खूपच आकर्षक वाटत असेल किंवा काही मूलभूत आर्थिक नियमांचं पालन होत नसेल, तर पुन्हा विचार करा."

"बिटकॉईन वाढतच जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. म्हणून यातून फायदा होईलच, याची हमी नाही."

दुसरं म्हणजे, एनक्रिप्टेड करंसीमधल्या व्यवहारातली गोपनीयता हा देखील एक संशयाचाच मुद्दा आहे. कारण व्यवहारांवर कुणाचंही नियंत्रण नसल्याचं हे द्योतक आहे.

तेव्हा बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर थोडं जपूनच.

आणखी हे वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)