दृष्टिकोन : भाजप आणि संघाच्या टोपी-जानव्याच्या राजकारणात राहुल गांधी अडकतायत का?

राहुल गांधी आणि जानवं

जानव्याचं वैशिष्ट्य असं की ते दोनच प्रसंगी दिसतं - एक म्हणजे जेव्हा कोणी उघडबंब व्यक्ती पुजाअर्चेत किंवा यज्ञासारख्या धार्मिक विधीत असते. आणि दुसरं तेव्हा, जेव्हा ते परिधान केलेली व्यक्ती त्या धाग्याला लघुशंकेच्या वेळी कानात गुंडाळते. पण आणखी एक प्रसंग असाधारणपणे असू शकतो - जेव्हा कुणी एखाद्याला धर्माविषयी छेडतं आणि मग ते जानवं दिसतं.

राहुल गांधींच्या हिंदू संस्कारांची चर्चा होऊ लागल्यानंतर जानव्याची गाठ जनतेसमोर उकलू लागली. अख्ख्या गुजरातला निवडणुकीचा ज्वर चढलेला असताना, राहुल आणि जानवं यांची गाठ बुधवारी प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात पडली.

मी कधीच राहुल गांधींचं जानवं पाहिलेलं नाही. पण आता पूजाअर्चा, यज्ञ करताना कुठल्यातरी निमित्ताने शर्ट किंवा कुर्ता उतरवून जानवं दाखवण्याचा ट्रेंड रूढ झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. जानवं दाखवण्याचे व्ही़डिओ युट्यूबवर खपू लागले तरी चकित होऊ नका.

गेल्या तीन वर्षांत भारतीय राजकारणाने बराच मोठा पल्ला गाठला आहे. तलम रेशीम असलेल्या क्रोशाच्या जाळीदार टोपीऐवजी आता जानव्याचा जुडगा राजकारणातलं नवं स्टाइल स्टेटमेंट झालं आहे.

धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक

मात्र जानव्याला स्टाइल स्टेटमेंट होऊ देण्याचे काही धोकेही आहेत. ही ती क्रोशाची झकास टोपी नव्हे जी लेवून अटलबिहारी वाजपेयी, अर्जुन सिंग, नितीश कुमार आणि लालू यादव इफ्तार पार्टीचं आयोजन करायचे. असं आयोजन म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं द्योतक मानलं जायचं.

पण राजकारणाच्या या नव्या पर्वात आता जानव्याचा वारसदार कोण होणार? रामविलास पासवान, उदित राज, प्रकाश आंबेडकरांसारख्या दलित नेत्यांना राहुल गांधींप्रमाणे जानवं परिधान करून मिरवण्याची परवानगी कोणी देईल का?

राहुल गांधींनी जानव्यावर जाहीरपणे काहीही सांगितलेलं नाही. त्यांच्यावतीने काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन राहुल यांची भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

हे सांगताना त्यांनी एक गौप्यस्फोटही केला : "काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी न केवळ हिंदू धर्माचे आहेत, ते तर जानवंधारी हिंदू आहेत. जाट, खाटीक, निषाद अशा समाजांमधल्या कोट्यवधी तरुणांचा सुरजेवाला यांनी विचार केला नाही, ज्यांना वर्ण व्यवस्थेत जानवं परिधान करण्याची अनुमती नाही."

दशकांपूर्वी आर्य समाजाने दलितांना जानवं परिधान करू देण्यासाठी आणि गायत्री मंत्र पठण करू देण्यासाठी एक आंदोलन केलं होतं. मात्र हे आंदोलन कर्मठ वर्णव्यवस्थेचे नियम तोडू शकलं नाही.

सोनिया गांधी यांच्यानंतर 'सेक्यूलर' काँग्रेसचे सगळ्यांत मोठे नेते असलेले राहुल गांधी हिंदू असल्याची घोषणा नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उच्चपदस्थांच्या कानात घुमली नसती तरच नवल.

संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून तर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत संघाच्या सगळ्या पिढ्या गेली नऊ दशकं याच दिवसाची प्रतीक्षा करत होते. त्यांची घोषणाही तशीच होती- जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा.

म्हणजे जर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी जाहीर केलं, की ते दररोज ब्राह्ममुहूर्तावर गायत्री मंत्राचं पठण केल्यावरच अन्नग्रहण करतात; किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे के. डी. राजा यांनी जाहीर केलं की नवरात्रांमध्ये पक्षाचे देशभरातले सगळे कार्यकर्ते नऊ दिवस उपवास करतील, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कम्युनिस्ट पक्षाप्रती दृष्टिकोन बदलेल, अशी आशा करायला हरकत नाही.

काँग्रेसला हिंदू धर्माचं वावडं

राहुल गांधी जानवंधारी आहेत (तसं खरंच आहे की नाही हे कोणालाही ठाऊक नाही), हे काँग्रेसने जणू एका राजकीय जाहीरनाम्यासारखंच सादर केलं. पण असले डावपेच सहसा हिंदूहितासाठी काम करणाऱ्या संघाच्या धोरणात असतात. म्हणून संघाला यावर कोणताही आक्षेप असू नये.

खरंतर संघाला अशा हिंदू विचारांचं भय वाटतं ज्यांचा प्रचार महात्मा गांधी दिल्लीतल्या बिर्ला भवनातून दर संध्याकाळी करायचे.

नथुराम गोडसे यांच्या हातून गांधीची हत्या होण्याच्या दहा दिवस आधी मदनलाल पाहवा याने गांधींच्याच प्रार्थना सभेत बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

त्यावेळी गांधीजी म्हणाले होते, "या युवकाच्या पाठीशी जी संघटना आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अशा पद्धतीने हिंदू धर्माचं रक्षण करू शकत नाही. मी जे काम करतो आहे ते हिंदू धर्माला जिवंत राखेल."

राहुल गांधीच्या जानव्याची गोष्ट सांगून काँग्रेस नरेंद्र मोदींकडून हिंदुत्वाचा मुद्दा हिरावून घेईल, हा सुरजेवाला यांचा गैरसमज आहे.

देशावर राज्य करायचं असेल, सत्ता प्राप्त करायची असेल तर हिंदूहिताच्या गोष्टी जाहीरपणे बोलणं गरजेचं आहे. याची जाणीव राहुल गांधींनाही झाली आहे, असं वाटू लागलं आहे.

हिंदुत्वाप्रती निष्ठेची चढाओढ

त्यांना हेही बहुधा लक्षात आलं असावं की मुसलमानांची जाळीदार गोल टोपी घालून इफ्तार पार्टीत सहभागी होण्यापेक्षा स्वत:ला जानवंधारी हिंदू जाहीर करणं अधिक फायदेशीर आणि सोपं आहे.

गुजरात निवडणुकीच्या धामधुमीत राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला तुम्ही नरोडा पाटिया किंवा बेस्ट बेकरीसारख्या 2002 मध्ये दंगलीचा जबर फटका बसलेल्या मुस्लिमांविषयी विचारणार आहात का?

याचाच अर्थ संघाने राजकीय पट मांडून त्यावर हिंदुत्वाचा अजेंडा सेट केला आहे. पटाचा हा डाव जिंकण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना संघाची दीक्षा मिळालेल्या भाजपच्या नेत्यांपेक्षा कट्टर हिंदुत्ववादी असल्याचं सिद्ध करावं लागेल.

Image copyright Getty Images

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केलेल्या राजकारणात मुसलमान मतदार कुठेच नाहीत. आता शर्यत हिंदुत्वाप्रती सर्वाधिक निष्ठावान कोण, हे सिद्ध करण्याची आहे.

या राजकीय पटावर नरेंद्र मोदी आक्रमक पवित्र्यासह खेळी करतात. त्यांना हवी तशी पटावरची प्यादी फिरवतात. त्यांना वाटतं तेव्हा ते राजकीय वैर एका टोकाला नेतात. कधी ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची सोमनाथ मंदिरविरोधी म्हणून हेटाळणी करतात.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुस्लिमांची टोपी परिधान करण्यास नकार देणारे मोदी मनात आलं तर परदेशी पाहुण्यांना अहमदाबादेतल्या मशिदींच्या फिरायलाही घेऊन जातात.

पण हे असं वागणं ते राजकीय नाईलाजापोटी नव्हे तर स्वत:च्या मनाप्रमाणे करतात.

हे सगळं सुरू असताना दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याची आणि ताजमहालला तेजोमहल सिद्ध करण्याची अहमहमिकाच लागली आहे.

हिंदुत्वाची लाट इतकी शिगेला पोहोचलेली असताना राहुल गांधी त्यात मागे राहणं शक्य नाही. तेही हिंदुत्वाची कास पकडून वारसा पुढे चालवतील.

ज्याप्रमाणे ते आपल्या लाडक्या कुत्र्याला अर्थात पिडीला बिस्किट खाऊ घालतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकू शकतात, तसंच शेंडी वाढवलेली, कपाळाला गंध, गळ्यात जानवं आणि मुखाने दुर्गा सप्तशती किंवा शिवस्तोत्राचं पठण करतानाचा व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करू शकतात.

तसं झालं तर देशाच्या राजकारणाला वेगळंच वळण मिळेल.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)