ती पहिल्यांदा विमानात बसली पायलट म्हणूनच!

  • गुरप्रीत कौर
  • बीबीसी पंजाबी प्रतिनिधी

अॅनी दिव्या, एका मध्यमवर्गीय घरातली तरुणी, 30 वर्षांची. ती कधीही विमानात बसली नव्हती. पण ती आता बोईंग 777 या सगळ्यांत मोठ्या प्रवासी विमानाची पायलट आहे.

बोईंग 777 हे सगळ्यांत मोठ्या क्षमतेच्या प्रवासी विमानांपैकी एक. त्यात सुमारे 400 प्रवासी बसू शकतात. आणि विमान चालवणाऱ्यांपैकी अॅनी ही सगळ्यांत तरुण महिला पायलट आहे.

पंजाबच्या पठाणकोटमध्ये अॅनीचा जन्म झाला. तिचे वडील सैन्यात होते. ती 10 वर्षांची असताना वडिलांचं पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं झालं होतं.

पायलट बनण्याचं स्वप्नं अॅनीनं लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण ते स्वप्न प्रत्यक्षात येणं तेवढं सोपं नव्हतं.

वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पायलटच्या कोर्सची, 15 लाखांची फी भरणं, हेच एक आव्हान होतं.

तरीही तिच्या वडिलांनी काही मित्रांकडून पैसे उसने घेतले, शिवाय कर्ज काढण्याचा निर्णय घेतला.

"माझ्या आईबाबांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. आज मी जी आहे, ती त्यांच्यामुळेच आहे," अशा शब्दात अॅनी त्यांच्याबदल कृतज्ञता व्यक्त करते.

फीची व्यवस्था झाल्यावर तिनं उत्तर प्रदेशमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.

अर्थात अडचणींचा सिलसिला अजूनही संपलेला नव्हता.

इंग्रजीचं आव्हान

पायलटला अनेक देशांमध्य जावं लागतं. त्यामुळे इंग्रजी बोलता येणं ही अगदी प्राथमिक गरज. अॅनीला इंग्रजी नीट बोलता येत नव्हती. त्यामुळे तिनं इंग्रजीचा सराव सुरू केला. सगळ्यांसोबत तोडक्यामोडक्या इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली.

ती म्हणते, "सुरुवातीला सगळे माझी थट्टा करायचे, हसायचे. मग हळूहळू माझ्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त करू लागले."

"त्याचबरोबर इंग्रजी बातम्या, चित्रपट पाहायला लागले. आता मी हिंदीपेक्षा चांगलं इंग्रजी बोलू शकते," असंही ती म्हणते.

पंख कधी लागले?

अॅनी 17व्या वर्षीच पायलट झाली. "प्रशिक्षणाच्या काळात प्रथम विमान उडवलं, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं," असं अॅनी म्हणते.

तिला 19व्या वर्षी एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. तेव्हा तिनं बोईंग 737 विमान उडवलं, तर 21व्या वर्षी बोईंग 777 उडवण्याची संधी मिळाली.

तेव्हा ती हे विमान उडवणारी सर्वांत तरुण पायलट ठरली. तिचं हे स्वप्नं पूर्ण झाल्यावर तिनं तिच्या भावंडांचं स्वप्नं पूर्ण करायचं ठरवलं.

सध्या तिची बहिण अमेरिकेत डेंटिस्ट आहे, तर भाऊ ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे.

पायलट म्हणून अॅनीची आतापर्यंतची सर्वांत लांब फ्लाईट होती दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को, तब्बल 18 तासांची!

काय बदललं?

अॅनी म्हणते, "पायलट झाल्यानंतर आयुष्य बदलून गेलं आहे. आजही विजयवाड्यातल्या अनेक कॉलेजांत मुलींना शर्ट-पॅण्ट घालण्याची परवानगी नाही. पण जग फिरल्यामुळं माझी लाइफस्टाइल बदलून गेली. कधी मी न्यूयॉ़र्कमध्ये तर कधी फॅशनचं शहर असलेल्या पॅरिसमध्ये असते. लोकांना भेटते, अनेक गोष्टी बघते."

"मला फिट राहायला आवडतं. त्यासाठी रोज व्यायाम करते. तब्येतीची काळजी घेते. माझं काम तणावपूर्ण आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडणं आवश्यकच असतं," असं अॅनी म्हणाली.

फावल्या वेळात गाणी ऐकायला, डान्स करायला, योग करणं आणि मित्रमैत्रिणींना भेटणं अॅनीला आवडतं.

भविष्यात कमांडर अॅनी दिव्या यांना इतरांना प्रशिक्षण द्यायचं आहे. तसंच, ज्यांना स्वप्नं पूर्ण करण्यात अडचणी येतात अशा तरुणांना मार्गदर्शन करण्याची तिची इच्छा आहे.

पायलटचं शिक्षण घेण्यासाठी फारशी शिष्यवृत्ती मिळत नाही. तसंच, शैक्षणिक कर्जावरील व्याजही जास्त आहे. सरकारनं याबद्दल काही करायला हवं, अशी अपेक्षा अॅनीनं व्यक्त करते.

तुम्हाला पायलट व्हायचंय असेल तर...

दिव्या ने दिलेल्या या काही टिप्स :

  • अकरावी आणि बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घ्यावेत.
  • पायलटच्या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर किमान 50 टक्के मार्क हवेत.
  • मेडिकल फिटनेस आवश्यक आहे.
  • शैक्षणिक कर्ज घेता येतं.
  • इंग्रजी चांगलंच यायला हवं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)