प्रेस रिव्ह्यू : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार संस्कृतीचे धडे

पुढील सत्रापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाव्यतिरिक्त भारताची राज्यघटना, समाजशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि संस्कृतीचा अभ्यास करावा लागणार आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

Image copyright NOAH SEELAM

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) ठेवलेल्या या प्रस्तावाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

IIT आणि NIT या स्वायत्त संस्था असल्यामुळे हा निर्णय त्यांना लागू होणार नाही. या निर्णयामुळं देशातील 3,000 इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करावा लागणार आहे.

धर्माचा वापर कधी राजकारणासाठी केला नाही

सोमनाथ मंदिराच्या वारीनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या धर्मावरून गुरुवारी दिवसभर वाद-विवाद आणि राजकारण झालं.

अखेर या वादात भाष्य करत 'आपण धर्माचं राजकारण करत नाही', असं ते म्हणाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

Image copyright Getty Images

"धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आम्ही धर्माचा वापर कधी राजकारणासाठी केला नाही," असं राहुल गांधी यांनी गुजरातमधील अमरेली येथील सभेत केले.

"माझी आजी आणि माझं कुटुंब शिवभक्त आहोत. आमचा धर्म कोणता याचं प्रमाणपत्र दाखवण्याच्या आम्हाला गरज नाही," असंही ते पुढे म्हणाले.

सर्वाधिक भ्रष्टाचार महाराष्ट्रात

सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात समोर आली आहे, असं हिंदुस्तान टाइम्सनं एका वृत्तात म्हटलं आहे.

2016मध्ये महाराष्ट्रात 1,016 भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. देशभरात नोंदवण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या केसेसपैकी 22.9 टक्के केसेस महाराष्ट्रात नोंवण्यात आल्या, असं या डेटामधून समोर आलं आहे.

Image copyright Getty Images

तसंच उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यानंतर देशात सर्वाधिक खून महाराष्ट्रात झाल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.

2016 मध्ये महाराष्ट्रात 94,919 लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये झालेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबईचा दुसरा क्रमांक असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

'ती ऑटोत बसलीच का?'

सामूहिक बलात्कार पीडितेबद्दल केलेल्या एका वक्तव्यानं अभिनेत्री आणि खासदार किरण खेर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

"जर तीन पुरुष ऑटो रिक्षात बसलेले दिसत होते तर त्या मुलीनं रिक्षात बसणं टाळायलं हवं होतं," असं खेर यांनी म्हटल्याचं वृत्त NDTVनं दिलं आहे.

Image copyright PRAKASH SINGH/getty

आरोपींवर नव्हे तर पिडितेवर बलात्कार टाळण्याची जबाबदारी का ढकलत आहात, असं म्हणून अनेकांनी खेर यांच्या विधानावर टीका केली.

आपण पीडितेला दोष देत नसल्याचं स्पष्टीकरण अखेर खेर यांनी दिलं. "मी हे विधान फक्त काळजीपोटी केलं," असं त्या म्हणाल्या.

पत्रकाराची कानपूरमध्ये हत्या

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 'हिन्दुस्तान' या हिंदी दैनिकाचे पत्रकार नवीन श्रीवास्तव यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या चौकशीचे आदेश दिले असल्याचं टाइम्स नाऊनं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

कानपूरच्या बिल्होर परिसरात मोटरसाइकल स्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नवीन यांना रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आलं.

गेल्या महिन्याभरात त्रिपुरामधील दोन पत्रकारांची तर सप्टेंबरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)