उत्तर प्रदेशातल्या घोडदौडीचा भाजपला गुजरातमध्ये फायदा होईल का?

आदित्यनाथ Image copyright GETTY/SANJAY KANOJIA
प्रतिमा मथळा या विजयात मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचा मोठा वाटा आहे

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत 16 पैकी 14 महापालिकांमध्ये विजय मिळवला आहे.

अलिगढ आणि मीरत ही दोन शहरं वगळून उर्वरीत 14 ठिकाणी भाजपचा महापौर होणार आहे.

बीबीसी हिंदीचे डिजिटल एडिटर राजेश प्रियदर्शी यांनी या निवडणुकांना माध्यमांनी दिलेल्या महत्त्वाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

"सकाळी सहा वाजल्यापासून टीव्ही चॅनल्सनी या निवडणुकांना राष्ट्रीय स्तरावर आणून ठेवलं आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल येत आहेत. तसंच, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याबाबत उत्सुकता होती," असं राजेश प्रियदर्शी यांनी सांगितलं. तरीही याचा निकालाचा परिणाम गुजरात निवडणुकीवर होणार नाही, असंही प्रियदर्शी यांचं म्हणणं आहे.

दुसऱ्या बाजुला हिंदुस्तान टाइम्सच्या लखनऊच्या संपादक सुनीता अॅरॉन यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दिलेल्या महत्त्वाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Image copyright GETTY/SANJAY KANOJIA
प्रतिमा मथळा उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपचाच झेंडा फडकला

'याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री किंवा मोठे नेते क्वचितच येत होते. पण अमित शहा यांना अगदी तळागाळात पक्ष पोहोचवायचा असल्याने त्यांनी उत्तर प्रदेशमधील या निवडणुकांवर भर दिला आहे,' असं अॅरॉन यांनी सांगितलं.

'स्थानिक स्वराज्य संस्थांची असूनही ही निवडणूक अगदी राष्ट्रीय स्तरावर चर्चिली गेली. या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हांचा जास्त वापर झाला. एखाद्या विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक असल्यासारखं वातावरण होतं,' अशी पुष्टी न्यूज-18चे पोलिटिकल एडिटर सुमित पाण्ड्ये यांनी जोडली.

भाजपची लाट

उत्तर प्रदेशात आलेली भाजपची लाट अद्यापही ओसरली नसल्याचं या निवडणुकांमधून दिसत असल्याचं, अॅरॉन नमूद करतात.

'2014च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या 300 जागांवर भाजपने विजयाची मोहोर उमटवली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपने मुसंडी मारल्याने 2019मध्ये पक्षाला त्याचा फायदा होईल,' असं अॅरॉन यांनी सांगितलं.

या निवडणुकांसाठी पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्याने 36 सभा घेतल्या. भाजपने यंदा पूर्ण तयारीने या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केलं होतं.

'विशेष म्हणजे जीएसटी किंवा नोटाबंदी या निर्णयांचा फटका भाजपला बसेल, असं म्हटलं जात होतं. प्रत्यक्षात चित्र वेगळंच असल्याचं निकालांवरून दिसून येत आहे,' असं निरीक्षणही अॅरॉन यांनी नोंदवलं.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाला घसघशीत यश मिळाल्याचीही चर्चा आहे.

सपा मागे, बसपाचा कमबॅक

अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या समाजवादी पक्षाला एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला महापौर बसवता येणार नाही, हे आता निकालांमधून स्पष्ट झालं आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या बहुजन समाज पक्षाला मीरत आणि अलिगढ दोन शहरांमध्ये यशाची चव चाखायला मिळाली आहे. बसपाची कामगिरी चांगली झाल्याचं निरीक्षण सुनिल पाण्ड्ये यांनी नोंदवलं.

दुसऱ्या बाजुला, 'समाजवादी पक्षाने या स्थानिक निवडणुकांना म्हणावं तेवढ्या गांभीर्याने घेतलं नाही', अशी टिपण्णी सुनीता अॅरॉन यांनी केली आहे.

मुस्लीम-दलित मतांची विभागणी झाल्याचा फटकाही या दोन पक्षांना बसल्याचे हे विश्लेषक सांगतात.

काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा ठेंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता उलथवून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा पराभवाची चव चाखावी लागली.

'काँग्रेसने ही निवडणूक गांभीर्यानेच लढवली होती. 2019च्या निवडणुकांच्या आधी राज्यातली आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न त्यांनी केला,' असं सुनीता अॅरॉन यांनी सांगितलं.

Image copyright GETTY/SANJAY KANOJIA
प्रतिमा मथळा मतदानाला लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊनही काँग्रेसला फार फायदा झाला नाही.

या वेळी काँग्रेस 16 पैकी किमान दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला ठसा उमटवेल, असं निरीक्षण राजकीय अभ्यासक व्यक्त करत होते.

प्रत्यक्षात मात्र गांधी परिवाराच्या अमेठीतील स्थानिक स्वराज्य संस्थाही काँग्रेसला जिंकता आली नाही. इथेही भाजपचाच विजय झाला.

'एका संपूर्ण पिढीला राज्यात कधी काँग्रेसचं सरकार असल्याचं बघायलाच मिळालेलं नाही. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये अनेक वर्षं निवडणुकांमध्ये पराभूत होत आली आहे. लोकसभेतील संख्याबलाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे महत्त्वाचं राज्य आहे. त्या राज्यात सातत्याने पराभूत होणं काँग्रेससाठी चांगलं नाही,' अशी चिंता अॅरॉन यांनी व्यक्त केली.

गुजरातमध्ये फायदा होणार का?

या निकालांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काय होणार ही चर्चाही सुरू आहे. चारच दिवसांवर गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आहे.

काँग्रेसने गुजरातमध्ये प्रचाराची आघाडी उघडली असून भाजपनेही गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल गुजरातच्या निवडणुकांवर प्रभाव टाकतील का, हा प्रश्न आहे.

'गुजरातमध्ये सध्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे. हे चूक आहे की बरोबर, हे सांगणं कठीण आहे. पण उत्तर प्रदेशमधल्या विजयाचा थेट परिणाम गुजरातच्या निवडणुकांवर होणार नाही,' असं ठाम मत राजेश प्रियदर्शी यांनी नोंदवलं.

Image copyright GETTY/SAM PANTHAKY
प्रतिमा मथळा गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

याला सुनीता अॅरॉन यांनीही दुजोरा दिला. 'या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांपुरत्या मर्यादीत होत्या. त्या देखील उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांपुरत्याच! गुजरातमधील मुद्दे वेगळे आहेत, तेथे प्रत्येक पक्षाची ताकदही वेगळी आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीवर याचा काहीच परिणाम होणार नाही,' असं अॅरॉन यांनी नमूद केलं.

मात्र, या निवडणुकांच्या निकालांमुळे गुजरातमध्ये प्रचारात असलेल्या बड्या नेत्यांच्या मनोबलावर काही परिणाम नक्कीच होईल, असा अंदाज प्रियदर्शी यांनी व्यक्त केला.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)