...म्हणून सौदीत महिलांचं चित्र काढण्यास मनाई!

सौदी अरेबिया, कला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीत महिलांचं चित्र काढण्यास मान्यता नाही.

भारत आणि सौदी अरेबियातल्या चित्रांमध्ये एक मूलभूत फरक असतो. सौदीतल्या चित्रांचे विषय असतात इमारती, वाळवंट, उंट, खजुराची झाडं असं काहीतरी. इथं तुम्ही महिलेचं चित्र रेखाटू शकत नाही.

हे सांगताना सौदीत राहणाऱ्या प्रेरणा यांचा स्वर नाराजीचा असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये सौदीचे राजे सलमान यांनी यांनी महिलांवरील अनेक निर्बंध मागे घेण्याची घोषणा केली आहे. आता कला क्षेत्रातही हे स्वातंत्र्य मिळावं अशी प्रेरणा यांची इच्छा आहे.

प्रेरणा गेली 30 वर्षं सौदीतच राहत आहेत. त्या कलाकार आहेत. मूळच्या नागपूरच्या असलेल्या प्रेरणा यांनी भोपाळ विद्यालयातून फाइन आर्ट्समध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे.

सौदी अरेबियात कला क्षेत्रात कार्यरत व्यक्तींवर विविध स्वरुपाचे निर्बंध आहेत. सौदी राजे आणि प्रशासनाच्या निर्देशांचं सक्त पालन करूनच ही कलाकार मंडळी आपला आविष्कार व्यक्त करतात. कोणतंही प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी कलाकारांना कडक अशा सेन्सॉरशिपला सामोरं जावं लागतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही निर्बंध आहेत.

बीबीसीशी बोलताना प्रेरणा म्हणाल्या, "इथं जेव्हाही प्रदर्शन भरवण्यात येतं तेव्हा कशाला अनुमती आहे आणि कशाला नाही अशी एक नियमांची जंत्रीच देण्यात येते. याचा अन्वयार्थ असा की, तुम्ही धर्माशी निगडीत कशावरही चित्र काढू शकत नाही."

"दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही महिलेचं चित्र काढू शकत नाही. जर महिलेचं चित्र काढायचंच असेल तर चेहरा आणि अन्य गोष्टी धुसर ठेवण्याची अट आहे. कोणत्याही चित्रात महिलेचे डोळे आणि नाक दाखवू शकत नाही. एखाद्या वेळेस महिलेचं चित्र ही गरज असेल तर केवळ आकृतीबंध रेखाटता येऊ शकतो. मात्र त्यातही महिला पूर्ण कपड्यात असणं अनिवार्य आहे."

सौदीमध्ये महिलेचं चित्र काढणं पाप करण्यासमानच मानलं जातं. मध्ययुगीन इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक अमेरिकेचे लेखक हंट जनीन आणि मार्गारेट बशीर यांनी आपल्या 'कल्चर्स ऑफ द वर्ल्ड: सौदी अरब' पुस्तकात याबाबत तपशीलवार लिहिलं आहे. जागतिक कलाविश्वाला सौदीचं योगदान म्हणजे मशीदी आणि शायरी.

प्रतिबंधाचं कारण काय?

या दोघांच्या मते सौदीत कलेवर धार्मिक कारणास्तव प्रतिबंध आहेत. कलाकार आपल्या रेखाटनात कोणत्याही जीवित प्राण्याचं चित्र रेखाटू शकत नाहीत. हा प्रतिबंध इस्लाममधील एका नियमाचा भाग आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एखाद्या माणसाचं चित्र असेल तर त्याचे डोळे आणि नाक धुसर दाखवावे लागतात.

या नियमानुसार केवळ अल्लाच जीवनाबद्दल काही भाष्य करू शकतात. इस्लामच्या मान्यतेनुसार कोणतीही व्यक्ती एखाद्या प्राण्याचं चित्र काढत असेल तर तो देव होण्याचा प्रयत्न करत आहे असं समजलं जातं.

सौदीतील परंपरेनुसार असं चित्र पाहणाऱ्यांचं अल्लावरचं लक्ष विचलित करू शकतं. अल्लाला प्रमाण मानण्याऐवजी ते चित्रातील गोष्टींवर विश्वास ठेऊ शकतात.

पुस्तकात लिहिल्याप्रमाणे धर्माधिष्ठित रुढीपरंपरांचं अन्य मुस्लीमबहुल देशांमध्ये पालन केलं जात नाही. मात्र सौदीत हे नियम शिथील होऊ शकत नाहीत.

मुलांना काय शिकवतात?

चित्र रेखाटन तसंच प्रदर्शनाच्या आयोजनाव्यतिरिक्त प्रेरणा या सौदीत चित्रकला हा विषय शाळेत शिकवतात. कोणत्याही जीवित माणसाचं तसंच प्राण्यांचं चित्रं काढणं मुलांना शिकवण्यास शाळेत मनाई आहे.

मुलांना निव्वळ प्राण्यांचं चित्रही काढता येत नाही. शाळेत मुलांना मूलभूत कलाप्रकार शिकवले जातात. निसर्गचित्र, भांडी, ग्लास अशा अमूर्त गोष्टींची चित्रं काढता येऊ शकतात.

भारतात असेपर्यंतच प्रेरणा या मानवी भावभावनांचा समावेश असलेली चित्रं रेखाटत होत्या. सौदीत स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आल्याचं त्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीत आता महिलांना स्टेडियममध्ये बसून सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रेरणा पुढे सांगतात, "चित्रांवर बंधनं आहेत. माझ्या जे मनात आहे ते मी चितारू शकत नाही. मात्र सौदीतही अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियातून आलेल्या मंडळींसाठी व्यासपीठ आहे. तिथं मुक्तपणे चित्र काढता येतात. अगदी वैयक्तिक पातळीवर मुक्तपणे चित्र रेखाटता येतं. मात्र जाहीरपणे असं चित्र काढता येत नाही आणि सादरही करता येत नाही."

कलाकारांकडून विरोध

सौदीत असलेल्या या अभिव्यक्तीविरोधात कलाकारांनी अनेकदा एल्गार पुकारला आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Image copyright JowharaAlSaud/Facebook
प्रतिमा मथळा निर्बंधांविरोधात सौदीतील कलाकार जोहरा अल सऊद यांनी छायाचित्र काढलं होतं.

अशा स्वरुपाचा विरोध काही वर्षांपूर्वी जोहरा अल सऊद नावाच्या कलाकारानं व्यक्त केला होता. त्यांनी निर्बंधांविरोधात कलात्मक पद्धतीनं टिप्पणी केली होती. त्यांनी फेसबुकवर 'आऊट ऑफ लाइन' नावाची मालिका चालवली होती. त्यात त्यांनी छायाचित्रणातून मानवी भावना टिपल्या होत्या. फोटोंच्या निगेटिव्हमधून माणसांचं नाक आणि डोळे वगळून त्यांनी फोटो प्रसिद्ध केले होते.

यासंदर्भात प्रेरणा यांनी आपला अनुभव सांगितला. मानवी भावभावनांचं रेखाटन करणं सौदीत अत्यंत अवघड आहे. भारतात अगदी सहज दिसणारी आलिंगन देतानाची चित्रं इथं काढताच येत नाहीत.

"कोणत्याही प्रदर्शनाच्या वेळी आयोजकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन काम करावं लागतं. माझं एक चित्र प्रदर्शनात मांडायला नकार देण्यात आला होता. त्या चित्रात एक महिला नृत्य करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं."

सौदीत प्रेरणा यांच्यासारखे कलाकार निर्बंधमय वातावरणातच आपली अभिव्यक्ती मांडत आहेत. इथं कोणीही कायदा मोडू शकत नाही. कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी लोक नियमांचं पालन करतात.

Image copyright JowharaSAlSaud/Facebook
प्रतिमा मथळा मूळ प्रतिमेतून डोळे आणि नाक वगळून सऊद यांनी फोटो प्रसिद्ध केला होता.

सौदीत या निर्बंधांविरोधात जागरुकता वाढत आहे. सौदीत महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी मिळाली आहे. स्टेडियमयमध्ये सामने पाहण्याची अनुमती मिळाली आहे. याच धर्तीवर कलाकारांना मनाप्रमाणे चित्रं काढण्याची मुभा मिळेल अशी आशा कलाकार वर्तुळाला आहे.

प्रेरणा यांची चित्रं सौदीतील भारतीयांप्रमाणेच स्थानिक लोकांमध्येही लोकप्रिय आहेत. त्यांची काही चित्रं सौदीच्या राजांच्या महालाचा भाग आहेत.

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : भविष्यात कृत्रिम हृदयांचा पर्याय?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)