दिल्लीत तुसॉद्स म्युझियममध्ये आता मधुबाला, मेर्लिन मन्रोला जवळून पाहा

मधुबाला
प्रतिमा मथळा मधुबाला

'प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट' या उक्तीचा प्रत्यय देणाऱ्या मॅडम तुसॉद्स म्युझियमची एक शाखा राजधानी दिल्लीत अवतरली आहे. आतापर्यंत टीव्ही, इंटरनेट आणि पेपरमधून दिसणारे हे हुबेहूब पुतळे आता आपल्या सगळ्यांना 'याचि देही याचि डोळा' अनुभवता येणार आहेत.

वर्तुळाकार विस्तारलेल्या आणि दिल्लीच्या मधोमध वसलेल्या आणि ट्रेंडिंग परिसर असलेल्या कनॉट प्लेसमध्येच हे म्युझियम उभारण्यात आलं आहे.

म्युझियममध्ये आत शिरताच क्रिकेटविश्वाचा मानबिंदू असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आपलं स्वागत करतो. त्याच्या शेजारी देखण्या बॅटिंगसाठी प्रसिद्ध ब्रायन लारा आपल्या स्वागताला सज्ज असतो.

'फुकट तेच पौष्टिक' हा फंडा इथे कामी येत नाही कारण म्युझियम पाहायचं असेल तर लहान मुलांसाठी 760 तर मोठ्यांसाठी 960 रुपये भरावेच लागतात. पैसे भरले की पबमध्ये लगावतात तसा स्टँप मनगटावर उमटवला जातो. तुम्ही फी भरली आहे याचं ते द्योतक.

प्रतिमा मथळा राज कपूर

आत शिरतोय तोच पवनकुमार चतुर्वेदी अर्थात बजरंगी भाईजान सिनेमामधला सलमान खान झोकात उभा दिसतो.

त्याच्या अगदीसमोर डुकाटी बाईकवर टॉम क्रूज दिसतो, अगदी स्पीडमध्ये. आणि मग नजर पडते अनारकलीवर. आरस्पानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध मधुबाला तुमचा कलिजा खलास करते.

'आवारा हूँ मैं' म्हणणारे राज कपूर आणि 'बत्तमीज दिल' म्हणत असंख्य तरुणींच्या दिलाची धडकन बनलेला रणबीर कपूर आपलं लक्ष वेधून घेतो.

चमचमणारे डिस्को लाईट्स आणि पार्टी साँग माहोल पूर्ण करतं.

वाऱ्याच्या झोतानिशी उडणारा तिचा स्कर्ट जगभर प्रसिद्ध आहे, अशी लावण्यवती मेर्लिन मन्रो आपल्या सौंदर्यानं घायाळ करते.

प्रतिमा मथळा मेर्लिन मन्रो

मन्रो आख्यानातून आपण बाहेर पडत नाही तोच आपल्या विनोदांनी लोटपोट करून सोडणारा कपिल शर्मा नजरेस पडतो.

प्रतिमा मथळा अनिल कपूर

'मिस्टर इंडिया' बनून गायब होणारा 'एकदम झकास' असा अनिल कपूर आपल्या पुढ्यात दत्त म्हणून हजर असतो. तो आपल्याला करोडपती गेम खेळण्यासाठी आमंत्रण देतो. आणि हे फेक निमंत्रण नाही. चाहत्यांचं मन रिझवण्यासाठी म्युझियमवाल्यांनी खरंच क्विझची रचना केली आहे.

तुम्ही हळूहळू पुढे सरकलात की गेमिंग एरिना आहे जिथं बॉक्सर मेरी कोम, इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हीड बेकहम दिमाखात उभे आहेत. आणि तिथंच तुमच्या दिशेनं धावण्यास तयार आहेत 'फ्लाईंग शीख' अर्थात मिल्खा सिंग.

प्रतिमा मथळा मिल्खा सिंग

आणि तिथंच एका कोपऱ्यात पृथ्वीतलावरचा वेगवान माणूस उसेन बोल्ट आपल्या सिग्नेचर बोल्ट पोजमध्ये उभा आहे.

पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधले दिग्गज क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी तुमच्याकडं बॉल करतात. पुतळे एवढे जिवंत की आपण क्षणभरात पास घेण्यासाठी पाय पुढे टाकतो.

प्रतिमा मथळा कपिल देव

त्यांच्याच समोर आहेत भारतीय क्रिकेटमधले दोन दिग्गज - कपिल देव, आणि ("आईला!" पुन्हा) सचिन तेंडुलकर. इथं तर तुम्ही चक्क पायाला पॅड्स बांधून, हेल्मेट घालून आणि हातात बॅट घेऊन पोज घेऊ शकता.

प्रतिमा मथळा सचिन तेंडुलकर

तर वरच्या माळ्यावर गेलं की एका सुसज्ज अशा शासकीय हॉलमध्ये तुमचं स्वागत करतात, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्याशेजारी रॉकेटमॅन माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी.

प्रतिमा मथळा राष्ट्रपिता महात्मा गांधी, भगत सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

आणि मग एका कोपऱ्यात लोहपुरुष सरदार पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय शैलीच्या बैठकीत आहेत.

तिथून पुढं जाता, जागाच नाही तर काळ आणि थीम बदलतं. शासकीय हॉलची जागा एका लाईव्ह कॉन्सर्टचं बॅकस्टेज घेतं आणि समोर उभे राहतात 'किंग ऑफ पॉप' मायकल जॅक्सन!

प्रतिमा मथळा मायकल जॅक्सन

हा बॅकस्टेज शो संपला की समोर सोनू निगम तुम्हाला गाणं म्हणण्यासाठी साद घालतो. त्याच्या शेजारी तबल्याचे उस्ताद झाकिर हुसैन आणि आशा भोसले प्रकट होतात आणि आपल्या मुखातून 'व्वा' अशी दाद बाहेर पडते.

प्रतिमा मथळा आशा भोसले

आणि मग त्यांच्यासमोर डोळे दिपवून टाकणाऱ्या पोशाखात लेडी गागा आणि जगभरातल्या कोट्यवधी मुलींचा "बेबी" जस्टीन बीबर, असे पॉप सेलेब्स दिसतात.

प्रतिमा मथळा हा सेल्फी नाही तर खरंच जस्टीन बीबरचा पुतळा आहे

शेवटी आणखी एक मजला खाली उतरून तुम्ही एका मोठ्या दालनात पोहोचता, जिथं कतरिनापासून अँजलिना जोलीपर्यंत, विल स्मीथ ते अगदी ह्रतिक रोशन दिसतो. त्याच्याच बाजूला सेल्फी काढणारी किम कर्दाशियन आहे.

आणि या सर्व गर्दीत 'टायटॅनिक'मधली गोड जोडी रोज आणि जॅक, अर्थात केट विन्सलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रिओ एकमेकांकडे टक लावून बघत आहेत, बरं का!

तिथंच आपली मराठमोळी माधुरी दीक्षित नेने एका कोपऱ्यात प्रेमळ असं स्मित करताना दिसते.

शेवटी तुसॉद्सच्या "ए-लिस्ट" दालनात करिना कपूर, अँजलिना जोली, ऍन्ना हॅथवे सोबत प्रकट होतात शहेनशहा अमिताभ बच्चन.

प्रतिमा मथळा माधुरी दीक्षित नेने, अमिताभ बच्चन आणि करीना कपूर

आणि याच मोठ्या दालनात ही म्युझियमवारी संपुष्टात येते.

शेकडो सेल्फ्या काढत-काढत आपण दमतो, हरखून जातो. या सर्व सेलिब्रेटींना प्रत्यक्षात भेटणं शक्य नसल्यानं इथं त्यांचं दर्शन होणं म्हणजे अहोभाग्यम्!

पण बाहेर पडताना एक प्रश्न मात्र पडतो - अरेच्चा! सलमान दिसला, अमिताभचंही दर्शन झालं. पण शाहरूख कुठंय? आमिर कुठंय? ऐश्वर्या कुठाय?

प्रतिमा मथळा म्युझियममधले प्रेक्षक अँजलिना जोलीला न्याहाळताना

''शाहरूख येणार आहे," म्युझियम कर्मचारी आपल्याला माहिती देतो. "शाहरूख आपल्या रईस सिनेमातल्या मियाभाईच्या वेशात येणार आहे. आम्ही त्याच्यासाठी मोजमापाचे संस्कार त्याच्या गेल्या महिन्यात झालेल्या वाढदिवशी पार पाडले," असं हा कर्मचारी सांगतो.

मूळ लंडनमधल्या म्युझियमला भेट देणं सगळ्यांना शक्य नाही. पण दिल्लीचं तख्त आपल्याला दूर नाही. मेणाचे असले तरी हुबेहूब आपल्या मनात घर करून राहिलेल्या या पुतळ्यांना अर्थात सेलिब्रेटींना प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा अनावर होऊ शकते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)