पाहा व्हीडिओ : 'कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी झाली, माझ्या नितीनला न्याय कधी?'

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - ज्यांनी गुन्हा केला त्यांना सजा मिळायलाच पाहिजे : राजू आगे. (मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट, शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे.)

23 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा न्यायालयानं नितीन आगे प्रकरणातल्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या काही दिवसांनंतरच कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोपर्डीप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा नितीन आगेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगरहून जामखेड ओलांडून पुढे साधारण २० किलोमीटर अंतरावर खर्डा गाव लागतं. 2014 नंतर या गावाचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही कानाकोपऱ्यात पोहोचलं.

त्याचं कारण अहमदनगर जिल्ह्यात दडलं आहे. मुख्य खर्डा गावाच्या अलिकडे एक किलोमीटरवर एक तिठा आहे. तिठ्यावर बाजूला पत्र्याचं एक खोपटं आहे, जे नितीन आगेचं घर आहे.

28 एप्रिल 2014 रोजी 11वीत शिकणाऱ्या नितीनची निर्घृण हत्या झाली. दुसऱ्या जातीच्या एका मुलीवर त्याचं प्रेम होतं, असा संशय होता.

या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. खर्डा आणि आसपासच्या परिसरातून १३ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातले तीन आरोपी अल्पवयीन होते तर एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला.

या खटल्यात एकूण 26 साक्षीदार होते. त्यातल्या 14 जणांनी पोलिसांसमोर दिलेले जबाब नंतर न्यायालयात बदललं.

त्यामुळे 23 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं या खटल्याच्या सर्व आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं.

आज साडेतीन वर्षांनंतर या खोपट्याच्या बाहेर, मातीनं सारवलेल्या अंगणात बसून नितीनचे वडील राजू आगे प्रश्न विचारतात, "जर कोर्ट म्हणतं आरोपी निर्दोष आहे, मग नितीनला मारलं कोणी?"

Image copyright SHARAD BADHE
प्रतिमा मथळा नितीन आगे

राज्यभर गाजलेल्या या खटल्याचा निकाल असा लागेल, ही अपेक्षा आगे कुटुंबीयांना नव्हती. आता ते न्याय न मिळाल्याच्या भावनेसह दहशतीत जीवन जगत आहेत.

पण 29 नोव्हेंबरनंतर कोपर्डीप्रमाणेच आम्हाला सुद्धा न्याय मिळावा, अशी अपेक्षा नितीन आगेच्या वडील राजेंद्र उर्फ राजू आगे यांनी व्यक्त केली आहे.

"त्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढेन," अशी त्यांची तयारी आहे.

निकाल ऐकल्यावर आत्महत्या करावी वाटली...

राजू आगेंसाठी मागची तीन वर्षं खडतर होती. मुलगा गेल्याचं दु:ख होतंच. त्यात कोर्टातूनही न्याय न मिळाल्याची त्यांची भावना आहे.

निकालाचा दिवसाबद्दल राजू आगे सांगतात, "न्यायदेवतेच्या हातात चार्जशीट गेल्यानंतर वकील काही जरी म्हणाले आणि काही जरी झालं, कमीत कमी 164 कलमाअंतर्गत दिलेल्या जबाबांमुळे माझ्या नितीनला न्याय मिळणारच, हे असं प्रत्येकाला वाटत होतं."

"पण अचानकच असं झालं की, नितीनला न्याय नाही. ऐकल्यावर मला असं वाटलं की, मी आता घरी पळत जाऊन कुठंतरी आत्महत्या करावी."

Image copyright SHARAD BADHE
प्रतिमा मथळा नितीनचं हत्याप्रकरण घडल्यावर, न्यायालयीन लढाई सुरु असण्याच्या काळातच, आगे दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचं नावही त्यांनी 'नितीन' ठेवलं.

ते थोडे हळवे होतात, तेव्हा त्यांना धीर हेत त्यांच्या पत्नी, नितीनच्या आई रेखा आगे लगेच पुढे येतात.

"खटला सुरू असताना अनेकदा अशा परिस्थितीतून गेलो, पण आशेनं आम्ही उभे राहिलो होतो," त्या सांगतात. "हे कुठं असं निघाले की मी म्हणायचे, 'जायचं नाही. आपल्यापाशी लेकरू आहे एक बारकं, एक पोरगी आहे. तुम्ही असं काही वेड्यासारखं करू नका!'"

"ते किती वेड्यासारखं करत होते. पण मी माझ्या मालकांना हलू देत नव्हते. का? तर की आपल्याला न्याय मिळेल म्हणून," रेखा आगे सांगतात.

नितीनचं हत्याप्रकरण घडल्यावर, न्यायालयीन लढाई सुरू असण्याच्या काळातच, आगे दांपत्याला मुलगा झाला. त्याचं नावही त्यांनी 'नितीन' ठेवलं.

"नितीन येऊन मला म्हणाला, 'मम्मी, तू वेडी होऊ नकोस. मी माघारी येणार आहे. तू वेडी झाल्यावर मला सांभाळेल कोण?' मला बोलून माघारी आला हा मुलगा. म्हणून मी त्याचं नाव नितीनच ठेवलं," भावूक होऊन रेखा आगे सांगतात.

त्यांच्या एका मांडीवर लहानगा नितीन होता तर डोक्यात आणि मनावर पहिल्या नितीनला न्याय न मिळाल्याचं दु:ख. आणि निराशा.

गुन्हेगाराला जात नसते...

निकालाच्या याच आठवड्यात अहमदनगर सत्र न्यायालयानं अजून एक महत्त्वाचा निकाल दिला ज्याच्याकडे महाराष्ट्र नजर लावून होता. कोपर्डी हत्या प्रकरणात तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली.

वर्तमानपत्र चाळता-चाळता राजू आगे म्हणतात, "कोपर्डीच्या आरोपींना फाशी झाली. गुन्हेगाराला जात नसते. ज्यांनी गुन्हा केला त्यांना सजा मिळायलाच पाहिजे. तसं माझ्या नितीनला मारणाऱ्या आरोपींना सजा मिळायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे."

Image copyright SHARAD BADHE
प्रतिमा मथळा नितीन आगेचा धाकटा भाऊ नितीन

खर्ड्याच्या या घटनेनंतर अनेक माध्यमांनी, राजकीय नेत्यांनी आणि संघटनांनी आगेंच्या घरी भेट दिली. कालांतरानं या भेटींचा ओघ कमी होत गेला.

गेल्या आठवड्यात आलेल्या निकालानंतर पुन्हा वर्दळ वाढली आहे.

आता महाराष्ट्र सरकार उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे. निकालानंतर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 'बीबीसी मराठी'ला सांगितलं, "हा निकाल विरोधात का गेला, याची आम्ही समीक्षा करू. उच्च न्यायालयात सरकार अपील करून आपली बाजू अधिक सक्षमपणे मांडेल."

सरकारी पक्ष तपासात आणि न्यायालयात बाजू मांडायला कमी पडला, असं आगे कुटुंबीयांना वाटतं. "CBIनं तपास केला तरच आम्हाला नक्की न्याय मिळेल," असं राजू आगेंना वाटतं.

पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेची त्यांना जाणीव आहे. साडेतीन वर्षांनीही आपल्या मुलाला नेमकं कोणी मारलं, याचं उत्तर न मिळालेलं नाही. त्याची निराशा आणि ते उत्तर शोधून काढण्याची जिद्द त्यांच्यात आहे.

"पुढे माझ्या हातात काठी येईपर्यंत या मुलामुळं मी जिवंत राहीन. मला जिथपर्यंत लढता येईल तिथपर्यंत मी लढत राहीन," ते सांगतात.

नितीनच्या आई रेखा शेवटी म्हणतात, "मला दुसरं काहीही नको. मला माझ्या नितीनचा न्याय पाहिजे!"

हे वाचलं का?

हे पाहिलं का ?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : उत्तर कोरियासोबत युद्ध झालं तर कसं असेल?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)