प्रेस रिव्ह्यू : ओखी चक्रीवादळाचा कोकणपट्टीला तडाखा बसण्याची शक्यता, धोक्याचा इशारा

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ ओखीच्या प्रभावामुळं महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय तटरक्षक दलानं दिला आहे.

पुढील 48 तास मासेमारीसाठी जाऊ नका, अशी सूचना मासेमारांना देण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

ओखी वादळामुळं आतापर्यंत 19 बळी गेले आहेत. मासेमारीसाठी गेल्यानंतर समुद्रात अडकलेल्या 690 मासेमाऱ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ओखी चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असताना दिसत आहे, पण पुढील दोन दिवसात किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असं भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक के. नटराजन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

14 किमी प्रति तासांच्या वेगानं हे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीच्या दिशेनं येत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी भरणार अर्ज

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठी नामांकन भरणार असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

या वृत्तानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग आणि इतर ज्येष्ठ नेते त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त कुणीही अध्यक्षपदासाठी काँग्रेस निवड समितीकडं नामांकनाचा अर्ज भरणार नसल्यामुळं राहुल गांधी यांची पदोन्नती ही औपचारिकता असल्याचं म्हटलं जात आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची ही निवडणूक दिखावा असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान केली आहे.

नोटबंदीमुळं काँग्रेसवर रडण्याची वेळ आली - मोदी

काँग्रेसमुळं समाजात दुही पडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये केल्याचं वृत्त NDTVने दिलं आहे.

Image copyright Getty Images

"भ्रष्टाचार असो वा जातिभेद, या काँग्रेसचं नातं या सर्वांसोबत आहे. म्हणून गुजरातचे तरुण काँग्रेसचा कधीही स्वीकार करणार नाही," असं मोदी म्हणाले.

नोटाबंदीमुळं काँग्रेसच्या नेत्यांवर रडण्याची पाळी आल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

"केंद्र सरकारनं नोटबंदी केल्यामुळं काँग्रेसची व्होटबंदी झाली आहे," असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे म्हणाल्याचंही NDTVने या वृत्तात म्हटलं आहे.

'हादिया यांचे पती ISISच्या संपर्कात होते'

हादिया यांचे पती शाफीन जहान हे कथित इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती राष्ट्रीय गुप्तचर विभागनं (NIA) कडून मिळाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

ओमर अल-हिंदी या प्रकरणात चार्जशीटमध्ये नोंदणी झालेल्या मंसीद आणि पी. सफावन या दोघांच्या संपर्कात जहान होता.

एका फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते, असं NIAच्या तपासात समोर आल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

केरळवरून देशभरात गाजलेल्या हदिया प्रकरणातली हदिया ही एका मल्याळी हिंदू कुटुंबात जन्मली होती. तिचं नाव अखिला असं होतं. शाफीन जहानसोबत लग्न केल्यानंतर तिनं इस्लाम स्वीकारला.

तिच्या या निर्णयानंतर तिच्या वडिलांनी हे प्रकरण न्यायालयात नेलं. निकाल तिच्या वडिलांच्या बाजूनं लागला. पण हादियानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं.

तिचा ताबा तिच्या वडिलांकडं राहू शकत नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

भायखळामध्ये येऊन तोडफोड करून दाखवा, MIMचे मनसेला आव्हान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं मुंबईतलं एक ऑफीस फोडल्यानंतर ओवेसींच्या MIM पक्षाच्या एका आमदारानं राज ठाकरेंच्या पक्षाला टीकावजा आव्हान दिलं आहे.

"हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करून दाखवा. मग तुम्हाला दाखवतो," असं आव्हान MIMचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

Image copyright PAL PILLAI/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा राज ठाकरे

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहेत," असं पठाण बोलले आहेत.

मुंबईतील अनाधिकृत फेरीवाल्यांवरून मनसे आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेच. त्या वादात एमआयएमने उडी घेतली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)