जयललिता : त्यांना ना अभिनेत्री व्हायचं होतं ना राजकारणी

जयललिता Image copyright AFP

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांची कमतरता तामिळनाडूच्या राजकारणात ठसठशीतपणे जाणवते.

त्यांच्या पश्चात त्यांचा पक्ष आणि तामिळनाडूचं सरकार फारसं सावरलेलं दिसत नाही. जयललिता जोपर्यंत होत्या तोपर्यंत अम्मा या एकमेव वलयाभोवती अख्खं तामिळनाडूचं राजकारण फिरत होतं.

ज्या ज्या क्षेत्रांत जयललिता यांनी पाऊल ठेवलं त्या त्या क्षेत्रांत त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्या. पण, त्यांचा हा जीवन प्रवास वाटतो तेवढा सोपा अजिबात नव्हता.

बालपणापासूनच झाली संघर्षाची सुरुवात

त्यांना खरं तर अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तरीही त्या एक आघाडीच्या अभिनेत्री झाल्या. त्यानंतर राजकारणी तर त्यांना नक्कीच व्हायचं नव्हतं. पण त्या लोकनेत्या झाल्या.

म्हणूनच जयललिता या नावाला समानार्थी शब्द काय असेल तर तो संघर्ष हाच आहे. बालपणापासून ते शेवटपर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्षच करावा लागला.

बालपणी आईचं प्रेम आणि वेळ मिळवण्यासाठी... तारुण्यात साथीदाराची साथ मिळवण्यासाठी... नंतर उत्तराधिकारी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी... राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी... आणि उतार वयात निर्दोष राहण्यासाठी... संघर्ष हा जलललिता यांच्या पाचवीलाच पुजला गेला होता.

बालपणातच वडील गेल्यानं जयललिता यांच्या आई वेदावल्ली यांना सिनेमात काम करावं लागलं. त्याची परिणती आई आणि मुलीच्या ताटातुटीत झाली. म्हैसूरला आजी-आजोबांकडे राहणाऱ्या जयललिता यांच्या बालमनावर त्याचा मोठा परिणाम झाला.

आईच्या सहवासासाठी त्या सतत आतुर असायच्या. पण आईची आणि त्यांची नियमित भेट कठीणच होत गेली. नंतर शिक्षणासाठी आईबरोबर चेन्नईत येण्याची संधी तर मिळाली, पण आईच्या कामामुळे तिचा सहवास जयललितांसाठी दुर्मिळच होता.

एकलकोंड्या जयललिता यांनी स्वतःला अभ्यास आणि पुस्तकांच्या हवाली करून टाकलं. अभ्यासामध्ये त्या हुशार होत्या. यांना नोकरी करायची होती. खूप शिकायचं होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं.

वाढलेल्या वयामुळे आई वेदावल्ली यांना सिनेमात काम मिळणं जवळपास बंद झालं होतं. घर चालवणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं. जयललिता यांचं शिक्षण सुरू होतं. अशात जयललिता यांना सिनेमाची ऑफर आली.

जयललिता यांनी सिनेमात काम करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. आईला तसं स्पष्ट सांगितलं. पण आईनं मात्र तदागा लावला. कुटुंब आणि भावंडांची जबाबदारी पेलवण्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे हे सांगून मुलीची समजूत काढली. शेवटी जयललिता तयार झाल्या आणि त्यांनी सिनेमात काम करणं सुरू केलं.

आईच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी बऱ्यापैकी वाटचाल सुरू केली. पण त्याच क्षणी त्यांचा तो आधार गळून पडला. आईचं निधन झालं. जयललिता पोरऱ्या झाल्या.

आईचं प्रेम नाही आणि कुणाचा आधार नाही अशा स्थितीत जयललिता यांची गाठ तत्कालीन प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी पडली. १२५ पैकी तब्बल ४०पेक्षा जास्त सिनेमे जयललिता यांनी एमजीआर त्यांच्याबरोबर केले आहेत.

सिनेमात काम करणं बंद केल्यानंतर खरंतर त्यांना आता एका हाऊसवाईफचं जीवन जगायचं होतं. पण, त्यांच्या वाट्याला ते आलंच नाही. एमजीआर यांनी त्यांना कधीच अधिकृत पत्नीचा दर्जा दिला नाही. पण तरीसुद्धा त्यांनी एमजीआर यांची पदोपदी साथ दिली.

राजकारणात प्रवेश

पुढे एमजीआर राजकारणात आले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्याबरोबर जयललिता यांचीसुद्धा राजकारणात एंट्री झाली. पण, त्यावेळीही त्यांना फार मानाचं स्थान नव्हतं. जयललिता यांचा संघर्ष सुरूच होता.

अशात एमजीआर यांच्या मृत्यूनं त्यांना आणखी एक धक्का दिला. एमजीआर यांच्या पार्थिवाजवळ सुद्धा त्यांना बसू देण्यात आलं नाही. त्यांना तिथून अपमानित करून हाकलून देण्यात आलं.

अधिकृत पत्नीचा दर्जा नाही, अधिकृत उत्तराधिकारी म्हणून निवड नाही आणि स्वतःचं असं कुणीच आधार देण्यासाठी जवळ नाही अशा स्थितीत सापडलेल्या जयललिता यांना स्वतःला टिकवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहणं भाग होतं. त्यांनी तेच केलं.

अण्णा द्रमुक या त्यांच्या पक्षात त्यांनी स्वतःची जागा शोधण्याचा संघर्ष नव्यानं सुरू केला. अशातच एमजीआर यांच्या काही निष्ठावंतांनी जानकी रामचंद्रन (एमजीआर यांच्या पत्नी) यांना राजकारणात आणून जयललिता यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण, जयललिताच त्या! आतापर्यंतच्या संघर्षात तावूनसुलाखून निघालेल्या. त्यांनीही कंबर कसली आणि स्वतःला झोकून दिलं.

एक राजकारणी म्हणून ज्या ज्या काही खेळी खेळाव्या लागतात त्या त्या त्यांनी खेळल्या. मुळात गृहिणी असलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या जानकी रामचंद्रन यांचा जयललिला यांच्यापुढे टिकाव लागणं शक्यच नव्हतं.

1989 ची निवडणूक निर्णायक ठरली. जयललिता यांच्या गटानं सर्वाधिक म्हणजे २७ जागा जिंकल्या आणि त्याच एमजीआर यांच्या उत्तराधिकारी आहेत हे सिद्ध केलं. परिणामी पक्षात पडलेली फूट मागे घेण्यात आली आणि सर्वांनी जयललिता यांच नेतृत्व मान्य केलं.

Image copyright AFP

आता जयललिता तामिळनाडू विधानसभेतल्या पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या बनल्या. इथूनच सुरू झाला त्यांचा राजकारणातला खरा संघर्ष. सत्तेत असलेल्या डीएमकेच्या आमदारांनी २५ मार्च १९८९ मध्ये विधानसभेतच जयललिता यांच्यावर हल्ला केला. त्यांची साडी फाडली.

परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री आणि जयललिता यांचे एकेकाळचे सहकारी चित्रपट निर्माते करुणानिधी यांच्याशी त्याचं राजकीय वैर झालं. जे शेवटपर्यंत टिकलं. दोघांनी एकमेकांना भरपूर राजकीय त्रास दिला.

संघर्षानं शेवटपर्यंत पिच्छा पुरवला

जयललिता यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तान्सी घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांनी त्यांचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवला.

घनिष्ठ मैत्रीण शशिकला यांच्या मुलाच्या विवाहात केलेल्या खर्चामुळेसुद्धा त्या अडचणीत आल्या. त्यांच्या राजेशाही राहणीमानावरूनही त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या साड्या, दागिने आणि चपलांची चर्चा अनेक वेळा झाली.

Image copyright AFP

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी त्यांना शिक्षासुद्धा झाली. परिणामी मुख्यमंत्रिपद सोडावं लागतं. पण, त्याच वेळी त्यांची लोकप्रियता मात्र वाढतच होती. सुप्रिम कोर्टानं क्लीनचिट दिली. २०१६ मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांना सत्तेत कमबॅक केलं.

एक-दोन आणि तर तब्बल पाच वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी राबवलेली अम्मा किचन, अम्मा मेडिकल, अम्मा स्टोअर या योजना कमालीच्या लोकप्रिय ठरल्या.

महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली. त्यामुळेच आज तामिळनाडूमधल्या पेट्रोल पंपावर महिला पेट्रोल भरण्याचं काम करू शकत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठीसुद्धा त्यांनी महिला कमांडोंना नेमलं.

एक अभिनेत्री ते लोकनेता हा प्रवास तसा त्यांच्यासाठी खूपच संघर्षमय होता. पण, त्यात त्यांना कायम साथ होती ती लोकांची. आधी पसंतीची अभिनेत्री म्हणून आणि नंतर लोकनेता म्हणून.

अर्धशतक त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. पण, संघर्षानं शेवटपर्यंत अम्मांचा पिच्छा पुरवला.

तुम्ही हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)