शशी कपूर आणि जेनिफर यांचं लग्न कसं झालं?

शशी कपूर

शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 साली कोलकातामध्ये झाला होता. त्यावेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर न्यू थिएटरमध्ये काम करत होते.

शशी कपूर यांचं डोकं लहानपणापासून मोठं होतं. त्यामुळे त्यांच्या आईला त्यांना जन्म देताना खूप त्रास झाला होता. पण त्यावेळेला रूग्णालयात घेऊन जावं अशी स्थिती नव्हती.

त्यांचं डोकं मोठं असल्यामुळे त्यांच्या आईनं शशींचे केस कुरळे ठेवले होते, जेणेकरून त्यांचं डोकं मोठं दिसणार नाही.

शशी यांच्या आजीनं त्यांचं नाव बलबीरराज कपूर ठेवलं होतं. त्यांच्या आईला हे नाव अजिबात आवडायचं नाही. त्यांना लहानपणापासूनच चंद्र बघायला आवडायचं म्हणून त्यांनी त्यांचं नाव शशी ठेवलं.

शशी यांच्या जन्मानंतर पृथ्वीराज कपूर यांचं कुटुंब मुंबईत आलं. शशी जेव्हा सहा वर्षांचे झाले तेव्हा त्यांना डॉन बॉस्को शाळेत घातलं. सुरुवातीच्या दिवसांत फारूख इंजिनिअर यांच्याबरोबर एका बाकावर ते बसत. नंतर इंजिनिअर हे प्रसिद्ध क्रिकेटपटू झाले.

हे दोघंही शाळेत शेवटच्या दोन तासांना उपस्थित नसायचे. एकाला रॉयल ऑपेरा हाऊसला अभिनय शिकायला जायचं होतं तर एकाला क्रिकेटच्या अॅकॅडमीमध्ये.

शशी कपूर यांनी 1948 साली आग या चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी त्यांचं वय फक्त नऊ वर्षं होतं.

'आवारा' चित्रपटात राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका त्यांनी केली. या भूमिकेनं त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की, त्यांचं अभ्यासातलं मनच उडालं.

मधू जैन यांनी 'द कपूर-द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात संपूर्ण कपूर घराण्याच्या चित्रपट कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला आहे.

शशी कपूर यांनी आपल्या अभ्यासाविषयी त्यांना सांगितलं, "मी अभ्यासात चांगला नव्हतो. मी जेव्हा मॅट्रिकला नापास झालो तेव्हा कोणीही रागावलं नाही. मी आपल्या वडिलांना सांगितलं की, मी कॉलेजच्या कँटीनमध्ये बसून तुमचे पैसे वाया घालवणार नाही."

अभ्यास आणि ड्रामा कंपनी

यानंतर फक्त 15 वर्षांच्या वयात शशी यांना त्यांच्या वडिलांनी पृथ्वी थिएटरला नोकरी दिली. पगार होता फक्त 75 रुपये महिना. 1953 साली हा पगार खूपच जास्त होता.

त्यानंतर तीन वर्षांनी ते 'शेक्सपियरानाशी' जोडले गेले. ते एक फिरतं थिएटर होतं जे शशी यांचे सासरे जेओफ्रे कँडलर चालवायचे. ते 18 वर्षांचे असतांना जेनिफरला पहिल्यांदा भेटले.

जेनिफर यांची धाकटी बहीण आणि ब्रिटिश रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार फॅलिसिटी कँडल यांनी आपल्या 'व्हाईट कार्गो' या पुस्तकात शशी आणि जेनिफर यांच्या नात्याबद्दल सुरूवातीला लिहिलं आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा शशी कपूर आणि त्यांची पत्नी जेनिफर

त्या लिहितात, "जेनिफर आपला मित्र वँडीबरोबर दीवार नाटक बघायला रॉयल ऑपेरा हाऊसला गेल्या होत्या. शशी तेव्हा अठरा वर्षांचे होते आणि त्या नाटकांत त्यांची छोटीशी भूमिका होती. प्रेक्षकांचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी पडद्याआडून वाकून बघितलं आणि त्यांची नजर चौथ्या रांगेत असलेल्या एका मुलीवर गेली. काळा पोशाख आणि पोलका डॉट्स घातलेली ती मुलगी अतिशय सुंदर होती. ती आपल्या मैत्रिणीबरोबर हास्यविनोद करत होती. जेनिफर यांना पाहताच शशी त्यांच्यावर मनापासून फिदा झाले."

त्या प्रयोगानंतर शशी धावत जेनिफरकडे गेले आणि त्यांना बॅकस्टेजला येण्याची गळ घातली. शशी यांचा विचार होता की, तिथं जेनिफरबरोबर गप्पा होतील. जेनिफरसुद्धा त्यांच्याबरोबर जायला लगेच तयार झाली.

21 वर्षांची जेनिफर त्यांच्या वडिलांच्या ड्रामा कंपनीत मुख्य अभिनेत्री होत्या आणि त्यांचा पगार शशी यांच्यापेक्षा तिप्पट होता.

जेनिफरच्या प्रेमात

पहिल्या भेटीतच ते जेनिफरच्या प्रेमात पडले. 1966 मध्ये जेनिफर यांच्यामुळेच ते शेक्सपियरानामध्ये देखील सामील झाले. जेनिफर यांच्या वडिलांसमोर चांगली प्रतिमा तयार व्हावी म्हणून इंग्रजी बोलण्याचा अंदाज आणि चालण्या बोलण्याच्या पद्धतीवर त्यांनी खूप कष्ट घेतले. पण, या सगळ्याचा काही फायदा झाला नाही.

20 वर्षांचे शशी आणि 23 वर्षांच्या जेनिफर यांचं लग्न अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत झालं. शशी कपूर त्यावेळी तेव्हा शेक्सपियराना समुहासोबत नाटक करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. एक दिवस जेनिफर यांनी त्यांचे वडील शशीसोबत त्यांचं लग्न करून देण्यास तयार नाहीत म्हणून घर सोडण्याचा निर्णय घेतला.

शशी आणि जेनिफर नाटक कंपनीतून बाहेर पडले. पण त्यांच्याकडे काहीच पैसै नव्हते. लग्नाला विरोध असल्यामुळे जेनिफर यांच्या वडिलांनी शशींना मानधन देण्यास नकार दिला होता.

अशा परिस्थितीत शशी कपूर एअर इंडियाच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी राज कपूर यांना ट्रंक कॉल करून तिकिटाचे पैसै पाठवायला सांगितलं. राज कपूर यांनी मुंबईसाठी प्रिपेड ट्रॅवल अॅडवान्स द्वारे तिकिटाची व्यवस्था केली.

मधू जैन यांनी या लग्नाबद्दल लिहिलं आहे की, परदेशी मुलीशी लग्न करण्याबाबत कपूर घराण्यात फारसा उत्साह नव्हता. लग्न तीन तासात आर्य समाजाच्या रीतीप्रमाणे 2 जुलै 1958 साली राज कपूर यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी झालं.

पृथ्वीराज कपूर तेव्हा 'मुगल-ए-आजम' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र होते. तीन चार तासांच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. के. आसिफ यांनी खासगी विमानानं त्यांना पाठवलं होतं.

जेव्हा निर्माते पैसे परत मागता

लग्नाच्या एका वर्षांच्या आतच शशी कपूर यांना अपत्यप्राप्ती झाली. 1960 साली त्यांच्या वडिलांची थिएटर कंपनी आर्थिक अडचणींमुळे बंद झाली होती. त्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न केला होता.

पण हे इतकं सोपं नव्हतं. चित्रपटसृष्टी आणखी एका कपूरसाठी तयार नव्हती. तेव्हा राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांपैकी कोणीच त्यांना मदत करू शकलं नाही.

यानंतर शशी कपूर मुंबईत आलेल्या प्रत्येक तरुणाप्रमाणे फिल्मीस्तानच्या बेंचवर वाट बघत बसत.

Image copyright Shemroo

शशी कपूर यांनी याबाबत मधू जैन यांच्याशी बोलताना सांगितलं, "पिकनिक चित्रपटासाठी मी, धर्मेंद्र आणि मनोज कुमार आम्ही तिघं याच बेंचवर बसलो होतो. चित्रपट मनोज कुमारला मिळाला."

शशी कपूर यांना जेव्हा काम मिळालं तेव्हा त्यांचे सुरुवातीचे 'चार दीवारी', बी. आर. चोप्रा यांचा 'धर्मपूत्र' आणि विमल राय यांचा 'प्रेमपत्र' हे सगळे चित्रपट आपटले.

त्यावेळी अशी परिस्थिती होती की निर्माता, दिग्दर्शक शशी कपूर यांना साईनिंग अमाऊंट परत मागू लागले. 1965 साली त्यांनी 'जब जब फुल खिलें'च्या रुपात यशाची चव घेतली.

पण असुरक्षिततेची भावना इतकी होती की, 1966 साली साईनिंग अमाऊंट म्हणून शशी यांना पाच हजार रुपये मिळाले. पण निर्माते परत मागतील या भीतीनं जेनिफर यांनी सहा महिने या पैशाला हात लावला नाही.

यशाचा प्रवास

'जब जब फुल खिले' नंतर शशी यांनी एक काळ गाजवला. 'प्यार का मौसम', 'प्यार किए जा', 'नींद हमारी ख्वाब तुम्हारे', 'हसीना मान जाएगी', 'शर्मिली', 'आ गले लग जा', 'चोर मचाए शोर', आणि 'फकीरा' या चित्रपटाच्या रुपात त्यांच्या आयुष्यात यशाची पहाट उगवली.

'दीवार', 'कभी कभी', 'रोटी कपडा और मकान', 'सिलसिला', अशा मल्टी स्टारर चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला.

राज कपूर यांनी शशी कपूर यांच्यासाठी कोणत्याच चित्रपटाची निर्मिती केली नव्हती. ते 'सत्यम शिवम सुंदरम' साठी अभिनेत्याच्या शोधात होते. तो शोध शशी कपूर यांच्या रुपात पूर्ण झाला.

या चित्रपटाच्या थीमनुसार एक कुरूप मुलीच्या प्रेमात पडलेल्या एका अतिशय देखण्या मुलाला राज कपूर शोधत होते. त्यावेळी त्यांना शशी कपूर शिवाय कोणीच देखणा नट मिळाला नाही.

पण ऋषी कपूर यांनी आपल्या खुल्लमखुल्ला या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे की, या चित्रपटासाठी राज कपूर आधी राजेश खन्ना यांना घेणार होते.

कधी बच्चन यांच्याबरोबर एक्स्ट्रा म्हणून काम केलं

याचवेळी शशी कपूर हे असे पहिले भारतीय होते, की ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयवरी यांच्याबरोबर 'द हाऊसहोल्डर', 'शेक्सपिअरवाला', 'बाँबे टाकी', 'हीट अँड डस्ट' अशा चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

खूप कमी लोकांना माहिती आहे की 'बाँबे टाकी' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक्स्ट्रा अभिनेत्याची भूमिका केली होती.

'शशी कपूर द हाऊसहोल्डर द स्टार' या पुस्तकात असीम छाबरा यांनी एक प्रसंग लिहिला आहे. 'दीवार' चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळी अमिताभ बच्चन म्हणाले, "आम्ही कधी एकमेकांशी बोललो नाही. पण जेव्हा मेरे पास मां है. या डायलॉगचा क्षण आला तेव्हा मला एका नाजूक हाताचा स्पर्श जाणवला. तो हात शशींचा होता. ते काहीच बोलले नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं माझा हात पकडला त्यातच सगळं आलं. हे एका कलाकाराला सगळं काही मिळण्यासारखं होतं. ज्यांनी जेम्स आयवरी यांच्या 'बॉम्बे टाकी' चित्रपटात कलाकार म्हणून काम केलं, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं."

गंमत म्हणजे 'बाँबे टाकी' चित्रपटात ज्या दृश्यात अमिताभ एक्सट्रा कलाकार म्हणून दिसले ते दृश्य चित्रपटातून काढून टाकलं होतं.

जेंटलमन म्हणून ओळखले जाणारे शशी कपूर आणि अभिनायाच्या बाबतीतलं त्यांचं गांभीर्य दोन कामात दिसून येतं. त्यातलंच एक म्हणजे पृथ्वी थिएटरची पुर्नस्थापना.

ज्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी शेवटचा पडदा टाकला होता, त्याच ठिकाणी 1978 साली त्या थिएटरला आपल्या पत्नीबरोबर याच जागेवर पु्न्हा सुरू केलं होतं.

पृथ्वी थिएटरची सुरूवात करण्यासाठी राज कपूर आणि शम्मी कपूर समोर आले नाहीत. हे काम शशी कपूर यांनी केलं आणि त्यासाठी आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये गुंतवला. कारण पृथ्वी थिएटरसाठी त्यांना बजाज कुटुंबीयांकडून जमीन खरेदी करावी लागली होती.

वडिलांचं काम पुढे नेलं

आपल्या वडिलांच्या स्वप्नांना आकार देण्याची गरज आहे, याची शशी यांना जाणीव झाली होती. याची झलक दीपा गेहलोत यांच्याबरोबर लिहिलेल्या 'पृथ्वीपालाज' मध्ये दिसते.

त्यात पृथ्वीराज कपूर यांच्या शेवटच्या काळाचा उल्लेख आहे. पृथ्वीराज यांना कँसरमुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. शशी त्यावेळी इंग्लंडमध्ये होते.

शशी कपूर लिहितात, "जेव्हा पापाजींनी दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते वळले. राज यांनी मला सांगितलं की, ते हलू शकत नाहीत. पण मी येण्याची जाणीव होताच त्यांनी आपलं डोकं हलवलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. मी त्यांच्या बाजुला बसलो. त्या रात्रीसाठी ते जीवंत होते आणि राजजी त्यांच्या कानात पुटपुटत होते की, शशी येतो आहे."

Image copyright Shemroo

शशी यांनी पृथ्वी थिएटर शिवाय आपल्या वडिलांचं समाजसेवेचं कामसुद्धा पुढे नेलं. पृथ्वीराज कपूर मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो विधवांना प्रत्येक महिन्यात काही रक्कम ते पाठवत होते.

शशी कपूर यांनी 'फिल्मवालाज'ची स्थापना करून 'जुनून', '36 चौरंगी लेन', 'कलियुग', 'विजेता', 'उत्सव', 'अजुबा' यासारखे चित्रपट तयार केले. त्यात 'जुनून', '36 चौरंगी लेन', आणि 'कलियुग' या समांतर चित्रपटांना विशेष महत्त्व आहे.

तोट्यात चित्रपट काढले

मधु जैन यांना शशी कपूर यांनी सांगितलं, "मी 'कलियूग'मध्ये दहा लाख, विजेतामध्ये 40 लाख, चौरंगी लेनमध्ये 24 लाख, उत्सवमध्ये दीड कोटी आणि अजुबामध्ये साडे तीन कोटी रूपये गमावले."

शशी कपूर यांची पत्नी जेनिफरचं निधन कँसरमुळे झालं, तोपर्यंत शशी हे बॉलिवूडचे सगळ्यात आकर्षक अभिनेते होते. त्यांच्या शरीरावर एक इंचही चरबी वाढली नव्हती.

पण बायकोच्या निधनानंतर शशी लठ्ठ तर झालेच पण एकाकी सुद्धा झाले. त्यानंतर 'न्यू देहली टाईम्स' सारख्या महत्त्वाच्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

शशी कपूर यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं त्याबद्दल फॅलिसिटी कँडल यांनी व्हाईट कार्गोमध्ये लिहिलं आहे, "ते अतिशय हसतमुख आणि आकर्षक होते. मी त्यांच्यासारख्या रोमँटिक माणसाला आजपर्यंत भेटलेले नाही. प्रेमानं स्तुती करत आणि त्याचबरोबर लोकांना चुचकारत असत. ते सुद्धा इतक्या खुबीनं करत की, त्यांना कोणीही रोखू शकत नसत. ते अतिशय बारीक होते. आपल्या पापण्यांनी ते घायाळ करत असत. त्यांचे पांढरेशुभ्र दात आणि गालावरच्या खळीमुळे ते महिला आणि पुरुषांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करायचे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)