प्रेस रिव्ह्यू: ओखी चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा, मुंबईत मुसळधार, उंच लाटांची भरती येण्याची शक्यता

मुंबई Image copyright Getty Images

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'ओखी' चक्रीवादळामुळे ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच लाटांची धडकू शकतात.

समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. मुंबई, सिंधुदुर्ग भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ओखी वादळाच्या प्रभावाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवला. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली.

Image copyright IMD

सोमवारी संध्याकाळी साडेसहापासून मुंबई शहरासह उपनगरात पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाचा जोर वाढला असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

किनारी भागाला इशारा देण्यात येणार आहे. शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.

6 डिसेंबर (बुधवार) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं त्यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो लोक दादर परिसरात आले आहेत. या अवकाळी पावसामुळे त्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

शरद यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द

जनता दल युनायटेड पक्षाविरोधात बंड पुकारलेले नेते शरद यादव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर जनता दलानं राज्यसभा सचिवांकडे अर्ज करून शरद यादव यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी विनंती केली होती. राज्यसभेतील जदयु नेते आर. एस. पी. सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शरद यादव यांची मुदत संपण्यास अजून पाच वर्षांचा कालावधी शिल्लक होता.

'औरंगजेबचं राज्य लखलाभ': मोदींची टीका

Image copyright Getty Images

राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदी झालेल्या निवडीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

राहुल यांच्या निवडीची तुलना पंतप्रधान मोदी यांनी मुघल काळात होणाऱ्या वारस निवड पद्धतीशी केली. "काँग्रेसला त्यांचं 'औरंगजेबचं राज्य' लखलाभ," या शब्दांत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान केलं.

राहुल गांधी यांनी 4 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी नामांकन भरलं. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कुणीही निवडणुकीसाठी नामांकन भरलं नाही त्यामुळं त्यांची बिनविरोध निवड झाली.

त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी असून लवकरच ते अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतील.

"हिंदुस्तान जिंदाबाद" लिहिणाऱ्या पाकिस्तानी युवकावर गुन्हा दाखल

पाकिस्तानातील हरीपूर इथे आपल्या घराच्या भिंतीवर हिंदुस्तान जिंदाबादची घोषणा लिहिणाऱ्या साजिद शाहला पोलिसांनी अटक केली आहे, असं वृत्त बीबीसी हिंदीनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

20 वर्षीय तरुणाला बॉलीवूडचे चित्रपट आणि गाणी आवडतात. आणि त्याला अभिनेता होण्याची इच्छा होती.

त्याला सात वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानी दंड विधानाच्या कलम 505नुसार त्यांच्यावर बंड पुकारणं, राज्याविरोधात हिंसा भडकवणं या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)