पाहा व्हीडिओ : जात्यावरच्या ओव्या जेव्हा बाबासाहेबांचं गुणगान गातात...

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : ओव्यांमधून बाबासाहेबांविषयीच्या व्यक्त झालेल्या भावना

लोकसंगीताच्या आणि लोकवाङ्मयाच्या परंपरेत मौखिक साहित्याला खूप मोठं स्थान आहे. जात्यावरच्या ओव्या याच मौखिक परंपरेचा भाग आहेत.

धान्य दळता-दळता महिला एका लयीमध्ये ओव्या गातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या भावना अशाच काही ओव्यांमधून व्यक्त होतात.

ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या बाबासाहेबांविषयीच्या ओव्या PARI म्हणजेच पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाने संकलित केल्या आहेत.

लीलाबाई शिंदे यांनी म्हटलेल्या जात्यावरील ओवीत बाबासाहेबांविषयीचा जिव्हाळा आणि आदर व्यक्त होतो. PARIने यावर्षी एप्रिलमध्ये लीलाबाईंची भेट घेतली.

Image copyright SAMYUKTA SHASTRI/PARI
प्रतिमा मथळा डॉ. आंबेडकरांविषयीच्या भावना लीलाबाईंनी ओवीतून मांडल्या

लीलाबाईंचं आज वय ६० वर्ष आहे. लीलाबाईंना हा ओव्यांचा वारसा आई जाई साखळे यांच्याकडून मिळाला. बाबासाहेबांविषयी आदर आणि कृतज्ञता सांगणाऱ्या या ओव्या-

भीम भीम म्हणू भीम माझा गुरुभाऊ

सोन्याच्या सळई देते तांदळाला घाव

भीम भीम म्हणू भीम साखरेचा खडा

ध्यान येता मनी गोड झाल्यात दातदाढा

भीम भीम म्हणू भीम साखरेची पुडी

नाव घेतल्यानी सुद झाली माझी कुडी

बुद्धाच्या मंदिराला सोन्याची कवाड

माझ्याही बाळाला लई बुद्धाची आवड

पांढऱ्या साडीला नेसते गं घाई घाई

बाबासाहेबांची दीक्षा घेती माझी आई

या ओव्यांमध्ये बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना बाबासाहेबांचं त्यांच्या आयुष्यात असलेलं महत्त्व ओवीत अधोरेखित होत जातं.

बाबासाहेबांना प्रेमाने संबोधताना भीम, भीमबाबा तर कधी भीमराया म्हटलं आहे. लीलाबाईंना बाबासाहेब हे गुरुस्थानी आहेत, मार्गदर्शक आहेत. त्या त्यांचा उल्लेख गुरुभाऊ म्हणून करतात.

याच मार्गदर्शनामुळे बौद्ध धम्माची दीक्षा आणि त्यामुळे आयुष्यावर झालेला प्रभाव त्यांना महत्त्वाचा वाटतो.

'महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेब हे स्वर्गात जाऊन इंद्रसभेचे राजे झाले आहेत', असं वर्णन करताना हिंदू पुराणातील मिथकांचा वापर ओव्यांमध्ये करण्यात आला आहे.

शेवटी 'बाबासाहेबांना गाडीतून नेत असताना त्यांच्या मागे आम्ही चालत राहणार आहोत', असं सांगताना लीलाबाई बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरणा घेत, शिक्षणाचा मार्ग निवडत तसंच बौद्ध धर्माच्या शिकवणीने चालत राहू असं सुचवतात.

(छायाचित्र सौजन्य : संयुक्ता शास्त्री/PARI)

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पंजाबमधील दलित समाज शिक्षणात अग्रेसर

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)