जात्यावरच्या ओव्या जेव्हा बाबासाहेबांचं गुणगान गातात...

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : जात्यावरच्या ओव्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

लोकसंगीताच्या आणि लोकवाङ्मयाच्या परंपरेत मौखिक साहित्याला खूप मोठं स्थान आहे. जात्यावरच्या ओव्या याच मौखिक परंपरेचा भाग आहेत.

धान्य दळता-दळता महिला एका लयीमध्ये ओव्या गातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या भावना अशाच काही ओव्यांमधून व्यक्त होतात.

ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या बाबासाहेबांविषयीच्या ओव्या PARI म्हणजेच 'पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया'नं संकलित केल्या आहेत.

लीलाबाई शिंदे यांनी म्हटलेल्या जात्यावरील ओवीत बाबासाहेबांच्या विषयीचा जिव्हाळा आणि आदर व्यक्त होतो. PARIनं यावर्षी एप्रिलमध्ये लीलाबाईंची भेट घेतली.

Image copyright SAMYUKTA SHASTRI/PARI
प्रतिमा मथळा डॉ. आंबेडकरांविषयीच्या भावना लीलाबाईंनी ओवीतून मांडल्या.

पुणे जिल्ह्यातल्या लव्हार्डे गावच्या लीलाबाई शिंदेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून काही ओव्या गायल्या आहेत.

पारीच्या 'ग्राईंडमिल साँग्ज डेटाबेस' प्रोजेक्टसाठी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा या ओव्या आमच्या कॅमेऱ्यासमोर गाण्याची आम्ही त्यांना विनंती केली.

आधी त्यांनी थोडे आढेवेढे घेतले. मात्र नंतर त्या तयार झाल्या. घराबाहेरच्या पडवीत ठेवलेल्या जात्याजवळ त्या आम्हाला घेऊन गेल्या आणि त्या जात्याजवळ बसल्या.

Image copyright SAMYUKTA SHASTRI/PARI
प्रतिमा मथळा आंबेडकर हे माझे गुरू आहेत, भाऊ आहेत, असं लीलाबाई ओवीतून सांगतात.

जातं फिरवण्यासाठी खुंटा हातात घेऊन त्यांनी आंबेडकरांचं कौतुक करणाऱ्या ११ ओव्या आमच्यासाठी गायल्या.

"भीम माझा गुरुभाऊ"

भीम भीम म्हणू भीम माझा गुरुभाऊ

सोन्याच्या सळई देते तांदळाला घाव

भीम भीम म्हणू भीम साखरेचा खडा

ध्यान येता मनी गोड झाल्यात दातदाढा

भीम भीम म्हणू भीम साखरेची पुडी

नाव घेतल्यानी सुद झाली माझी कुडी

'भीम माझा गुरुभाऊ' या पहिल्या ओवीत लीलाबाई डॉ. आंबेडकरांबद्दल म्हणतात, ते त्यांच्यासाठी गुरू आहेत, विश्वासातले आहेत आणि भाऊ आहेत.

या ओवीत लीलाबाई म्हणतात, त्या मोठ्या भाग्याच्या आहेत, जणू तांदूळ कांडणारं त्यांचं मुसळ सोन्याचं झालं आहे. भीमाचं नाव घेतल्यानं त्यांचं तोंड गोड होतं आणि त्यांचा विचार केल्यानं शरीर शुद्ध होतं.

माझ्याही बाळाला बुद्धाची आवड

बुद्धाच्या मंदिराला सोन्याची कवाड

माझ्याही बाळाला लई बुद्धाची आवड

पांढऱ्या साडीला नेसते गं घाई घाई

बाबासाहेबांची दिक्षा घेती माझी आई

"बुद्धाच्या मंदिराला सोन्याचं कवाड आहे," असं लीलाबाई त्यांच्या चौथ्या ओवीत सांगतात.

त्यांच्या मुलाला बुद्धाचीच खूप आवड आहे, असंही पुढच्या ओळीत गातात.

बाबासाहेबांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी आपली आई घाईघाईनं पांढरी साडी नेसत असल्याबद्दल लीलाबाई या ओवीत गातात.

भीमानी ब्राम्हण गं केलं साले

आमच्या लोकाला कोणं म्हणे वाले वाले

आमच्या भीमानी ब्राम्हण गं केलं साले

पाचव्या ओवीत त्या म्हणतात, "आम्हाला वेगळं, परकं कोण म्हणतं?" आम्ही तुमच्यासारखे नाही, जातीबाह्य आहोत असं कोण म्हणतं?

भीमानं तर ब्राह्मण मेव्हणे केले, याची आठवण त्या करून देतात. (बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता ब्राह्मण होत्या, त्याचा हा संदर्भ आहे.)

भीमाच्या तुऱ्याला इकत घेते जाई

माळीण बाई तुझ्या टोपलीत काई

भीमाच्या तुऱ्याला इकत घेते जाई

आली आगीणगाडी गाडीला तुरकाठी

माझ्या भीमाच्या राज्यात ढोर वढाती मराठी

या सहाव्या ओवीमध्ये लीलाबाई माळणीला विचारतात, "तुझ्या टोपलीत काय आहे?" भीमाच्या फेट्याला तुरा म्हणून शोभून दिसेल म्हणून तिच्याकडनं जाई घ्यायची आहे, असं त्या कौतुकानं तिला सांगतात.

या ओवीत समृद्धीचं, सन्मानाचं प्रतीक असलेली तुरकाठ्या लावलेली आगगाडी येत असल्याचं त्या सांगतात.

तुरकाठ्यांमधून समृद्धी आणि भविष्यात मिळणारा मान दर्शवला आहे. ज्यांनी आजवर दलितांना ही हीन दर्जाची कामं करायला लावली त्यांना ढोरं ओढायचं काम करावं लागत आहे, असं त्या म्हणतात. यातून जात व्यवस्थेची उलथापालथ या ओवीतून सूचवली आहे.

मेले भीम बाबा, कोणं म्हणे मेले मेले

बाबासाहेब आजही आमच्यात जिवंत असल्याचं लीलाबाई म्हणतात.

Image copyright SAMYUKTA SHASTRI/PARI

भीमराय स्वर्गात जाऊन इंद्रसभेचे राजे झालेत, असं त्या पुढील ओवीतून सूचित करतात.

मेले भीम बाबा कोणं म्हणे मेले मेले

स्वर्गात गेले इंद्रसभेचे राजे झाले

स्वर्गीच्या देवा तुला तांदळाचं वाण

मेले भीम बाबा स्वर्गी आहे आमचं सोनं

मेले भीम बाबा यांचं गाडीत मैत

पुढे चालती गाडी मागं चाललं रहित

शेवटच्या ओव्यांमधून लीलाबाई डॉ. आंबेडकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात. भीमराय गेले असले तरी ते स्वर्गात जाऊन इंद्रसभेचे राजे झालेत, असं त्या म्हणतात.

त्या स्वर्गातल्या देवांना तांदुळाचं वाण देतात आणि म्हणतात, आमचं सोनं, दलितांसाठी सोन्यासारखे असणारे भीमराव आता स्वर्गात आले आहेत.

शेवटच्या ओवीत त्या म्हणतात, "भीमबाबा गेले आणि त्यांचा देह गाडीतून नेला जात होता. जसजशी गाडी पुढे जात होती, तसतसा मोठा जनसागर त्यांच्यामागे चालत होता."

डॉ. आंबेडकरांच्या वाटेनं जाण्याचं दलित समाजानं ठरवलंय हेही यातनं प्रतीत होतं. दलित समाजानं हिंदू धर्म, जात व्यवस्था सोडली आणि बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन, शिक्षण घेण्याचं ठरवलं जेणेकरून शोषणापासून त्यांची मुक्ती होईल, असं शेवटच्या ओळीतून त्या म्हणतात.

(सौजन्य : PARI , ओवी गायिका- लीलाबाई शिंदे, विशेष आभार- लीलाबाई कांबळे, जितेंद्र मैड, अनुवाद- मेधा काळे, कॅमेरा- संयुक्ता शास्त्री, एडिटिंग- ज्योती शिनोली)

हा मूळ लेख People's Archive of Rural India या वेबसाईटवर 5 डिसेंबर, 2017 या दिवशी प्रकाशित करण्यात आला आहे.

(छायाचित्र सौजन्य : संयुक्ता शास्त्री/PARI)

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पंजाबमधील दलित समाज शिक्षणात अग्रेसर

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)