टर्कीमधले हे लोक एकमेकांशी चक्क शिटी मारून बोलतात!

काळा समुद्र Image copyright Turkish ministry of Culture and tourism
प्रतिमा मथळा कुसकोय या गावात लोक अजुनही एकमेकांशी शीळ घालून बोलतात

उत्तर टर्कीमध्ये काळ्या समुद्राच्या काठावर आहे एक 'पक्ष्यांची भाषा बोलणारं गाव'. इंग्रजीतलं नाव आहे बर्ड व्हिलेज. या गावाला असं नाव का बरं पडलं?

कारण खरंच या भागातले जवळपास 10 हजार लोक पक्ष्यांची भाषा बोलतात. म्हणजे ते एकमेकांशी चक्क शीळ घालून बोलतात.

कुठे आहे हे बर्ड व्हिलेज?

या गावाबद्दल युनेस्कोनं एका माहितीपत्रकात बरंच काही लिहिलं आहे. त्यानुसार टर्कीतल्या गेरासून परिसरात कनाकचिली भागात बऱ्याच वर्षांपासून ही परंपरा आहे. ओबडधोबड पर्वतरांगांमध्ये लोक दूरवर असलेल्या लोकांशी शीळ घालूनच संवाद साधतात.

शीळ किंवा शिटीची ही भाषा तिथला अमूर्त सांस्कृतिक ठेवा मानला जातो. आणि युनेस्कोनेही तशा आशयाची वर्गवारी आपल्या माहितीपत्रात दिली आहे. त्याचबरोबर या भाषेकडे लक्ष देण्याची, त्याचं संवर्धन करण्याची गरज असल्याचंही युनेस्कोनं म्हटलं आहे.

आणि नवल म्हणजे युनेस्कोनुसार या भाषेच्या अस्तित्वासाठी मोबाईल फोन धोकादायक आहे.

पण पक्ष्यांच्या भाषेची गरज का पडली?

टर्कीत ब्लॅक सीजवळ ट्रॅबझॉन, राईस, ओरडू, अर्टविन आणि बेबीबर्ट हा भाग पर्वतरांगांचा आहे. तिथं मुख्यत्वे मेंढपाळांची वस्ती आहे.

दिवसभर पर्वतरांगांमध्ये फिरताना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हे मेंढपाळ शिट्यांचा वापर करतात, आणि अशीच ही भाषा इथं रुजली. पण अलीकडच्या काळात बदललेलं जीवनमान आणि मोबाईल फोनच्या वापरामुळे या भाषेचा वापर कमी होत चालला आहे.

भाषेचं संवर्धन कसं करणार?

पक्षीभाषा आता इथला स्थानिक वारसा आहे. या भाषेला दशकांची परंपरा आहे. म्हणूनच जागतिक वारसा संघटनेनं या गावांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे. युनायटेड नेशन्स कल्चरल एजन्सीनं या कामात पुढाकार घेतला आहे.

बर्ड व्हिलेज किंवा पक्ष्यांची भाषा बोलणारं गाव हे नामकरणही त्यासाठीच झालं आहे. शिवाय 2014 पासून इथल्या शाळांमध्ये ही भाषा शिकवण्यात येत आहे, असं हुर्रियत न्यूजपेपरनं म्हटलं आहे.

कुस्कोय या प्रदेशातलं एक खेडं आहे. तिथली पक्ष्यांची भाषाही कुसकोय नावानेच ओळखली जाते. हुर्रियत डेली न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, या भाषेच्या संवर्धनासाठी आता इथं वार्षिक पक्षीभाषा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

Image copyright Turkish Ministry of culture and tourism
प्रतिमा मथळा या शिटी भाषेचा प्रसार पुढच्या पिढीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

टर्कीचे सांस्कृतिक मंत्री नुमान कर्टलमस यांनी निर्णयाचं स्वागत केलं आहे. आणि पक्ष्यांची भाषा जतन केल्याबद्दल त्यांनी रहिवाशांचं अभिनंदनही केलं आहे.

टर्की हा एक देश झाला. पण जगभरात अनेक भागांमध्ये पक्ष्यांची भाषा किंवा शीळभाषा बोलली जाते. आणि या भाषांचं अस्तित्वही अंधारात असल्याचा इशारा युनेस्कोनं दिला आहे.

(बीबीसी मॉनिटरिंगच्या सौजन्याने)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)