गुजरात मुख्यमंत्री मोदींना मिस करत आहे का?

गुजरात, नरेंद्र मोदी, विजय रुपाणी, आनंदीबेन पटेल, भाजप, निवडणुका.
प्रतिमा मथळा गुजरातचे तीन मुख्यमंत्री.

नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी - गुजरातने गेल्या तीन वर्षांत पाहिलेले तीन मुख्यमंत्री. पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानंतर गुजरातला त्यांची उणीव भासतेय का? या प्रश्नाच्या निमित्ताने राजकीय समीकरणांचा घेतलेला आढावा.

2010 मधली ही घटना आहे. गुजरात राज्याचा पन्नासावा वर्धापनदिन काही दिवसांवर येऊन ठेपला होता. गुजरातशी निगडीत जवळपास सगळे कॉर्पोरेट्स 1 मे रोजी होणाऱ्या महासोहळ्याकरिता झटत होते.

देशातल्या एका अग्रगण्य उद्योगसमूहाने देशातल्या प्रसिद्ध संगीतकाराकडून जिंगल तयार करून घेतली होती. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेली ही जिंगल मुख्यमंत्री मोदींना ऐकवण्यासाठी उद्योगसमूहाचे मुख्य पदाधिकारी भेटले.

Image copyright Dan Kitwood/GETTY

जिंगल ऐकण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी विचारलं, "जिंगल तयार करणारे कुठे आहेत?"

ते अधिकारी म्हणाले, "सर, ते येऊ शकणार नाहीत."

मुख्यमंत्री मोदींना जिंगल फारशी पसंत पडली नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, "आणखी कलाकार शोधा. आपल्या गुजरातमध्ये असंख्य प्रतिभावान कलाकार आहेत."

अखेर एका युवकाची जिंगल निवडण्यात आली. तो कोण होता, कुणास ठाऊक?

प्रदीर्घ काळ गुजरात राज्याची धुरा वाहणाऱ्या नरेंद्र मोदींची कार्यशैली ही अशी होती. बॉलीवूडच्या संदर्भात सांगितलं तर "मैं जहाँ खडा हो जाता हूँ, लाईन वहीं से शुरू होती है."

आनंदीबेन यांची कार्यप्रणाली

या घटनेच्या बरोबर पाच वर्षांनी 2015 मध्ये त्याच दालनात गुजरातच्या पहिल्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल काही फाइल्स चाळत होत्या.

अचानक त्यांनी एका कर्मचाऱ्याला बोलावून पुस्तकांना कव्हर कसं घालावं जेणेकरून ती फाटणार नाहीत, डाग पडणार नाहीत, याविषयी त्याला तपशीलवार सांगितलं. याव्यतिरिक्त फाइल्स काळजीपूर्वक कशा जतन करायच्या, हेही सांगितलं.

राजकारणात येण्यापूर्वी आनंदीबेन एका शाळेत शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या.

रुपाणी यांना विजयाची खात्री नव्हती

या घटनेच्या एक वर्षानंतर गुजरातचे आताचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक आठवण जागवली होती.

"दक्षिण राजकोट मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन, असं मला कधीही वाटलं नव्हतं. जिंकण्याचा विचार तर फारच दूरची गोष्ट होती."

Image copyright Sean Gallup/Getty

रुपाणी यांचा दक्षिण राजकोट मतदारसंघ म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते वजुभाई यांचा बालेकिल्ला. 1985पासून ते या मतदारसंघातून जिंकत आले होते.

मग 2002 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा त्याग केला होता.

Image copyright VIJAY RUPANI/INSTAGRAM
प्रतिमा मथळा विजय रुपाणी यांना सामान्य गुजराती माणूस भाजप कार्यकर्ता म्हणून ओळखतो.

केंद्रात मोदीप्रणीत भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर वजुभाई यांची कर्नाटकाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. वजुभाई कर्नाटकात गेल्याने रुपाणी यांना वजुभाईंचा मतदारसंघ मिळाला आणि दीड वर्षातच मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

तीन वर्षांत गुजरात मुख्यमंत्री कार्यालयात नक्की काय बदल झाले आहेत, याची झलक या तीन प्रसंगांतून मिळते.

मुख्यमंत्री मोदींचा कार्यकाळ कसा होता?

नरेंद्र मोदींच्या काळात प्रशासन त्यांच्याभोवती केंद्रित असे. मात्र आनंदीबेन आणि रुपाणी यांच्या कार्यकाळात ही प्रतिमा हळूहळू बदलली.

पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी 4,610 दिवस गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. यामुळे गुजरातमध्ये त्यांचं प्रस्थ चांगलंच वाढत गेलं.

त्यांच्याबरोबर अनेक वर्षं काम करणारे लोक सांगतात की, "मोदी खूप कमी बोलायचे. ठरलेल्या गोष्टी निर्धारित वेळेत पूर्ण झाल्या नाही तर त्यांच्याइतकं वाईट कोणी नसे."

आपलेसे वाटणाऱ्या IAS अधिकाऱ्यांशी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळातच ओळख करून घेतली होती. याच अधिकाऱ्यांना गांधीनगरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाण्याची परवानगी होती.

याठिकाणी जायला मंत्री, आमदारही कचरायचे. मोदी यांच्याआधी मुख्यमंत्री असलेले केशुभाई पटेल यांच्या कार्यकाळात ही सगळी मंडळी याठिकाणी नियमितपणे जायची.

2006च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या एका नेत्यानं एक खंतवजा तक्रार केली होती, "साडेतीन वर्षांनंतर मोदींशी वैयक्तिक भेट होऊ शकली!"

"मुख्यमंत्री होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. म्हणून निवडून आलेल्या प्रतिनिधींवर पूर्ण विश्वास ठेवताना त्यांच्या मनात साशंकता होती," असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

मोदी यांची गुजरातवरची पकड मजबूत

म्हणूनच कदाचित पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही आपल्या लाडक्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोदी यांची गुजरात सरकार आणि प्रशासनावरची पकड आजही घट्ट आहे.

के. कैलाशनाथन हे मोदी यांचे लाडके मानले जातात. 2013 मध्ये सरकारी सेवेतून ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची 'चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरी' या विशेषपदी नियुक्ती करण्यात आली.

कैलाशनाथन हे आनंदीबेन आणि रुपाणी यांच्या कार्यकाळातही कार्यरत आहेत. ते 'केके' या टोपणनावाने ओळखलं जातं. गुजरातमध्ये अमित शहा यांचं जेवढं प्रस्थ आहे तेवढेच केके पॉवरफुल आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजही गुजरातवर मजबूत पकड आहे.

अनेक मर्जीतल्या अधिकाऱ्यांना मोदी यांनी राजधानी दिल्लीत बोलावून मोठ्या पदांवर नियुक्त केलं.

राजस्व सचिव हसमुख अढिया, अॅडिशनल प्रिन्सिपल सेक्रेटरी पी. के. मिश्रा आणि पंतप्रधान कार्यालयातील मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत जे. एम. ठक्कर हे मोदी यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांपैकी आहेत.

मोदी यांचे वैयक्तिक सचिव आणि IAS अधिकारी राजीव टोपनो गुजरात केडरचेच आहेत. काही अधिकारी मोदी यांच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत.

मोदींकडून शून्य गुण

एका महत्त्वाच्या विभागाचे सचिव जे पुढे मोदींच्या मर्जीतले अधिकारी झाले ते त्यावेळी रोज एक प्रेझेंटेशन द्यायचे. त्यांच्या विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा त्यांनी प्रेझेंटेशनमध्ये संदर्भ दिला.

सगळं ऐकून घेतल्यानंतर मोदींनी अभिप्राय दिला. ते म्हणाले, "तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे पण मी तुम्हाला शून्य गुण देईन."

ते पुढे म्हणाले, "हे चांगलं काम जोपर्यंत नागरिकांना कळत नाही तोपर्यंत माझ्या सरकारला त्याचा काय फायदा? या कामाची प्रसिद्धी काय?"

अशी मोदींची कार्यपद्धती होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, मोदी दिल्लीत गेल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण त्यांच्या कार्यकाळात दडपण खूपच जास्त होतं.

आनंदीबेनचा कार्यकाळ

आनंदीबेन यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर आजूबाजूच्या वातावरणात बदल झाल्याचं अधिकारी सांगतात. त्यांच्याशी संलग्न काम करणाऱ्या व्यक्तींचे विचार, मग ते चांगले असो की वाईट, साधारण एकाच धाटणीचे असायचे.

मोदी यांच्यानंतर राज्याची धुरा सांभाळण्यासाठी आनंदीबेनच याच खऱ्या वारसदार आहेत, असं अनेकांना वाटतं. खुद्द मोदींनीच त्यांना निवडलं होतं.

आनंदीबेन यांना याआधी राज्य सरकारमध्ये शिक्षणासह महत्त्वाची खाती सांभाळली होती. आनंदीबेन यांच्या कार्यकाळात विधानसभेत मंत्री आणि पक्ष नेत्यांचं येणंजाणं वाढलं.

मात्र त्यांचा स्वभाव ही खरी अडचण होती. त्यांना क्षणार्धात राग यायचा. मात्र दुसऱ्याच मिनिटाला तो राग शांतही होत असे.

Image copyright PIB
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी गुजरातचं नेतृत्व केलं.

त्यांच्या कार्यकाळात शालेय शिक्षणाला चालना देण्यासाठी 'कन्या केलवणी योजना' राबवण्यात आली होती. या योजनेशी संबंधित एक प्रमुख अधिकारी काही कारणांमुळे रजेवर होते.

रजेहून परतल्यानंतर आनंदीबेन यांनी या अधिकाऱ्यासह दोन ज्येष्ठ सचिवांची काहीही प्रश्न न विचारता कानउघडणी केली. सलग 40 मिनिटं आनंदीबेन यांनी अधिकाऱ्यांना झापलं. त्या बोलायचं थांबल्यावर खोलीत शांतता पसरली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारलं, "बैठक संपली? आम्ही जाऊ शकतो का?" आनंदीबेन म्हणाल्या, "हो-हो. तुम्ही जाऊ शकता."

आनंदीबेन यांची सत्ता का गेली?

मुख्यमंत्री म्हणून मोदी यांच्या तीन खेळ्यांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही मोठा आणि थेट आरोप सरकारवर झाला नाही. आनंदीबेन यांच्या काळात अशा आरोपांचं प्रमाण वाढत गेलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : गुजरातमध्ये हा सर्वपक्षीय व्यवसाय

या सगळ्याची चोख माहिती मोदींनी दिल्लीत मिळत होती. अफवा जनतेपर्यंतही पोहोचल्या होत्या. आणि याचा फटका भाजप पक्षाला बसू लागला होता.

दुसरीकडे राज्यातलं पटेल आंदोलन चिघळलं होतं. यातूनच आनंदीबेन यांचा उतारकाळ सुरू झाला आणि रुपाणी यांच्याकडे सत्ताकमान येणार, हे स्पष्ट झालं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा रुपाणींना होता. ते सभ्य आणि स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकतो, असं जनसामान्यांना वाटतं.

गांधीनगरमधली जाणकार मंडळी सांगतात की रुपाणी सगळ्यांना भेटतात आणि मोदी-शहा यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण आहे. तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही, अशी तक्रार दिल्ली दरबारी असलेल्या हायकमांडने केली.

दुसऱ्याच दिवशी रुपाणी कार्यालयात जात असताना एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले, जिथे जेमतेम दीडशे लोक उपस्थित होते.

आजही सामान्य माणूस रुपाणी यांना मुख्यमंत्रिपेक्षाही भाजपचा कार्यकर्ता म्हणून ओळखतात.

मोदी, आनंदीबेन आणि रुपाणी यांच्यात सर्वोत्तम कोण?

मोदी, आनंदीबेन आणि रुपाणी या तिघांची व्यक्तिमत्त्व सर्वस्वी भिन्न आहे, असं सामान्य गुजराती माणूस सांगतो. दुसरीकडे प्रसारमाध्यमांमध्येही या तिघांमध्ये सर्वोत्तम कोण, याविषयी कयास सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतानाच मोदी यांनी प्रसारमाध्यमांपासून सुरक्षित अंतर राखायला सुरुवात केली होती. याचं प्रमुख कारण म्हणजे 2002 मध्ये घडलेलं गोध्रा हत्याकांड आणि यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाची झालेली नाचक्की.

प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी प्रचारादरम्यान

याच कारणामुळे 2003-04 पासून मुख्यमंत्री मोदी यांनी जनसंपर्क आणि ब्रँड मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतली. समाजातल्या आपल्या प्रतिमेविषयी ते अगदीच सतर्क झाले होते.

चित्रीकरणादरम्यान कसा फोटो काढला जाईल हे स्वत: मोदी ठरवत असत. प्रचाराशी संबंधित छायाचित्रं आणि घोषणांना त्यांच्या संमतीशिवाय मंजुरी मिळत नव्हती. अनेक छायाचित्रांना ते नकार द्यायचे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
#BBCGujaratOnWheels : असा गुजरात जिथं जीपमध्ये होतो बाळांचा जन्म

आपला ब्रँड तयार होण्याच्या दृष्टीने त्यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची कार्यपद्धती अंगीकारली. कॉर्पोरेट पद्धतीने प्रचार आणि ब्रँड निर्मिती या गोष्टी मोदींनी मुख्यमंत्री असतानाच अंगीकारल्या, असं जाणकार सांगतात.

याचा फायदा भाजप पक्षापेक्षा मोदींनाच वैयक्तिकरित्या झाला. आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींना आताच्या गुजरात निवडणुकीत प्रचारात स्वत: उतरावं लागलं आहे.

या तीन मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या सरकारचा नेमका प्रभाव काय याचं उत्तर राज्यातली राजकीय समीकरणं आणि मतदारांचा कौल लवकरच ठरवतील.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)