सोशल : 'इथं आम्हाला मराठी पुस्तकं मिळत नाहीत आणि हे सरकार परिपत्रक काढतंय!'

सरकारी कार्यालय Image copyright Getty Images

महाराष्ट्रात असणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये सरकारी कामकाज आणि अन्य माहितीसाठी मराठी भाषेचा आणि देवनागरी लिपीचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

केंद्र सरकारच्या कार्यालयांसह रेल्वे, राष्ट्रीयकृत बँका, टपाल, विमा कंपन्या, भारत संचार निगमसह अन्य दूरध्वनी सेवा कंपन्या, विमान सेवा, गॅस आणि पेट्रोलियम कंपन्या, आयकर आणि महसूल विभाग, मेट्रो, मोनो रेल या ठिकाणीही मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

पण अशा परिपत्रकांनी मराठीचा वापर वाढेल का? बीबीसी मराठीच्या वाचकांना आम्ही हेच विचारलं होतं.

अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया.

कौस्तुभ जोशी यांची ही सविस्तर प्रतिक्रिया - "सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होणं जरा कठीण आहे. म्हणजे उद्या या इस्पितळात जठरात्रं शल्यचिकित्सक कुठे आहे? डिसेंबर मध्ये रोकडसुलभता असण्यासाठी नेमकी किती तरतूद असावी? असे प्रश्न विचारले तर उत्तर देताना जरा अवघड होईल. बाकी सगळं सोप्प हवं. आपल्याकडे भावनिकदृष्ट्या बरेच निर्णय घेतले जातात."

Image copyright Facebook

आणखी एक वाचक प्रकाश धुमाळ यांचं म्हणणं आहे की "सुरुवात व्हायला हवी. हळूहळू परिणाम दिसतील."

Image copyright Facebook

अविनाश पाटील लिहितात की, सरकारी कार्यालयात मराठीचा वापर नक्कीच सुरू होईल. पण त्यासाठी मराठी माणसांनी पुढाकार घ्यायला हवा.

Image copyright Facebook

कुणाल रोहेकर म्हणतात की, "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे."

Image copyright Facebook

आर. संदीप पाटील यांच मतं मात्र थो़डं वेगळं आहे. ते "भाषा कोणतीही असो, आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचणं, दुसऱ्याला समजणं महत्त्वाचं आहे. मराठी भाषा सक्तीची करणाऱ्या याच सरकारनं कर्जमाफीचा अर्ज मात्र इंग्लिशमध्ये काढला आहे."

Image copyright Facebook

"इथं आम्हाला मराठी पुस्तकं मिळत नाहीत आणि हे सरकार परिपत्रक काढतंय," असं लिहिलं आहे सचिन सुर्यवंशी यांनी.

Image copyright Facebook

दिलीप डोणगावकर यांनी ट्वीट केलं आहे की, मराठीचा वापर सरकारी कार्यालयात सुरू होईलही पण लोक वापरणार नाहीत. एका बँकेत इंग्लिश ऐवजी मराठी बऱ्याच वर्षांपासून आहे. पण लोक वापरत नाहीत.

सुभाष जोशी म्हणतात, हे म्हणजे 'आज रात्री बारापासून सर्वांनी आपल्या आईवर प्रेम करावं', असं परिपत्रक काढण्यासारखं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)