'मित्रा, पसरू नकोस असा!': Manspreading विरुद्ध कशा लढत आहेत महिला!

manspreading Image copyright Twitter

"ओ! जरा सरकून बसा की" असं जर तुम्ही तुमच्या बस, ट्रेन किंवा अगदी विमानाच्या प्रवासातही शेजारच्या पुरुषाला कधीही म्हणाला नसाल तर एकतर तुम्ही भिडस्त आहात. नाहीतर जगातल्या अत्यंत भाग्यशाली पण मोजक्या स्त्रियांपैकी आहात ज्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळाली आहे.

पण, सर्वच महिलंच भाग्य काही तेवढं चागलं नसतं. अगदी सेलिब्रिटी झायरा वसीम सुद्धा त्यातून सुटू शकलेली नाही. प्रवासादरम्यान होणारी छेडछाड हा एक विषय आहे. पण त्याचवेळी manspreading हा दुसरा विषय आहे ज्यामुळे महिलांचा प्रवासादरम्यान छळ होतो. त्याचा त्यांना संघर्ष करावा लागतो.

माझ्यासकट अनेक जणींच्या वाट्याला हा कालातीत संघर्ष आला आहे. जागेचे पूर्ण पैसै मोजूनही अंग चोरून बसण्याची शिक्षा, आणि समजा जागा मिळवण्यासाठी वाद घातलाच तर, "गाडी काय घरची नाही तुमच्या", नाहीतर "आपली साइझ बघा, चिरडून मरेल एखादा", असली शेलकी शेरेबाजी ठरलेली. तरीही नाही ऐकलं तर मग ब्रह्मास्त्र, "बाई, तुच मला चिकटते आणि कशाला बोंब मारते" इथपर्यंत अपमान होणार.

हे सगळं होण्याचं कारण म्हणजे #manspreading. हा शब्द नवा असला तरी वाद जुनाच आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर manspreading म्हणजे पुरुषांनी आजूबाजूच्यांची पर्वा न करता पाय फाकवून बसणं, विशेषतः सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना. बरं याचा त्रास होतो तो शेजारी बसलेल्या महिलेलाच, कारण पुरुषांना दुसऱ्या पुरुषाच्या मांडीला मांडी लावून बसण्यात कसली आली आहे लाज किंवा असुरक्षितता.

काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या सॅम साइया या महिलेला एका पुरुषानं मेट्रोमध्ये शिवीगाळ आणि मारहाण केली. कारण? तिनं त्या माणसाला पाय जवळ घेऊन नीट बसायला सांगितलं म्हणजे तिलाही बसायला व्यवस्थित जागा मिळेल. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि जगभरातल्या महिलांनी याचा विरोध म्हणून एक मोहिम सुरू केली. #womanspreading.

हजारो महिलांनी #womanspreading या हॅशटॅगसह त्यांचे पाय पसरून बसलेले फोटो ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर टाकले. यात बेला हदिद (अमेरिकन गायिका आणि मॉडेल) सारख्या सेलिब्रिटीजचाही समावेश होता.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा बेला हदिद या अमेरिकन मॉडेलने आपला हा फोटो #womanspreading या हॅशटॅग सह शेअर केला

भारतातून कुठल्या सेलेब्रिटीनं या मोहिमेला पाठिंबा दिला नसला तर हजारो भारतीय महिलांनी असा त्रास नक्कीच अनुभवला असेल.

म्हणूनच बीबीसी मराठीनं त्यांच्या महिला वाचकांना manspreading विषयी त्यांना काय वाटतं ते विचारलं. अनेक महिलांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवातून लक्षात आलं की वरवर शुल्लक वाटणाऱ्या या manspreading चा महिलांना किती त्रास होते ते.

स्वाती पाचपांडे लिहितात, "सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना हा अनुभव हमखास येतो. पण सगळेच पुरुष तसे नसतात हे सुद्धा मान्य करावं लागेल. महिला शेजारी असल्यास अंग चोरून बसणारे पुरुष पण असतात. हा ज्याचा-त्याचा संस्काराचा भाग आहे."

"एकदा लोकलच्या भयानक गर्दीतून प्रवास करताना तो किळसवाणा स्पर्श मी अनुभवला आहे. जागा असूनही तो पुरुष ऐसपैस बसला होता, तेव्हा संताप झाला होता. मला वाटतं की, अशा वेळेला इतर महिला सहप्रवाशांनी समजून घेतलं पाहिजे आणि एकी दाखवून दिली पाहिजे," त्यापुढे लिहितात.

Image copyright Facebook

स्वाती पाचपांडे एकट्याच नाही आहेत. त्यांना आलेले अनुभव इतर अनेक जणांना आले आहेत.

दिशा माशेलकर यांनीही असाच अनुभव आला. "मलाही manspreading चा त्रास झालेला आहे. मी सिटीबस मध्ये प्रवास करताना एक माणूस माझ्या शेजारी येऊन बसला. त्याच्यासोबत त्याची बायको सुद्धा होती, पण त्यानं तिला दुसरीकडे बसवलं. तो सारखा त्याचे पाय पसरत होता. त्यानं बहूधा दारूही प्यायलेली असावी. मी त्याला काही बोलू शकले नाही कारण याला मी सांगितलेलं काही कळेल की नाही हा प्रश्न मला पडला होता."

Image copyright Facebook

"शेवटी कंडक्टरला माझा त्रास लक्षात आला आणि त्यानं त्या माणसाला खडसावलं. एकतर नीट बस किंवा इथून उठ. लवकरच माझा स्टॉप आला आणि मी उतरले. मला वाटतं की सार्वजनिक वाहनांमध्ये धुम्रपान करू नये अशा सूचनांच्या जोडीला खास पुरुषांसाठी नीट बसा अशी सूचनाही लावायला पाहिजे."

अपर्णा क्षेमकल्याणी यांनीही त्यांना आलेला अनुभव शेअर केला. "शाळेत असतांना बस मधून प्रवास करताना हा अनुभव यायचा. टगे मुलं किंवा पुरुष असे बसायचे. सगळे नाही, पण मी अशा लोकांच्या पायावर पाय द्यायचे किंवा गुडघ्याने धक्का मारायचे."

Image copyright Facebook

बीबीसी मराठीला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये सगळ्याच जणी म्हणतात की, सगळे पुरुष सारखे नसतात. प्रत्येक पुरुषाला वाईट अर्थानं स्त्रियांना हात लावायचा नसतो. मग तरीही पुरुष असे पाय फाकवून का बसतात?

महिला हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते मिलिंद चव्हाण उलगडून सांगतात. "मर्दानगीची एक संकल्पना पुरुषांच्या मनात घर करून असते. पुरुष आहे म्हणजे एका विशिष्ट प्रकारे बोललं पाहिजे, विशिष्ट प्रकारे वागलं पाहिजे. पित्तृसत्ताक पद्धतीत पुरुषांना सगळं आपल्या मालकीचं आहे असं वाटतं असतं. मग ते घर असो, जमीन असो, बाईच्या जगण्यावरचा हक्क किंवा अगदी बसमधली जागा."

"आपल्याला कोणी जाब विचारत नाही त्यामुळे आपण वागू ते चालत अशी पुरुषांची वृत्ती बनत जाते. म्हणून मग सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना भान राहात नाही की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी त्रास होतो."

Image copyright Getty Images

"यात एक मुद्दा छेडछाडीचा सुद्धा आहे. त्याबाबत पुरुषांशी बोललं जातं, त्याचे परिणाम, स्त्रियांना होणारा त्रास याविषयी पुरुष जागरूक असतात. पण manspreading सारख्या मुद्दयांवर बोललं न गेल्यानं त्याविषयी त्यांच्यात जागरुकता नाही."

कुठून आला हा शब्द?

फक्त भारत किंवा महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या स्त्रियांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच कदाचित या शब्दाचा जन्म झाला असावा.

साधारणतः 2008 च्या सुमारास #manspreading हा शब्द सोशल मीडियावर प्रचलित झाला. अनेक वैयक्तिक युजर्स हा शब्द ट्विटरवर वापरत असले तरीही हा शब्द प्रचलित करण्याच श्रेय जातं ते न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटीन ट्रांझिट ऑथोरिटीला. हा शब्द एकदाही न वापरता या ऑथोरिटीनं तो देशोदेशीच्या सोशल मीडियामध्ये प्रचंड पॉप्युलर करायची किमया साधली.

न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटीन ट्रांझिट ऑथोरिटीनं मेट्रोमध्ये लोकांनी सभ्यपणे बसावे यासाठी एक अभियान सुरू केलं. त्यांचा रोख अर्थातच पुरुषांच्या पसरून बसण्याकडे होता. असे पुरुष जे एका सीटवर बसल्यानंतर शेजारच्या सीटवरची जागा सुद्धा व्यापयचे. त्यामुळे अर्थातच महिलांना बसायला जागा कमी मिळायची.

नोव्हेंबर 2014 मध्ये 'सभ्यपणे बसा' अशी मोहिम या ऑथोरिटीनं राबवायला सुरूवात केली. त्यांनी #manspreading हा शब्द स्पष्टपणे कुठेही वापरला नसला तरी त्यांच्या 'मित्रा, पसरू नकोस असा' यासारख्या घोषणा व्हायरल झाल्या.

त्याआधी न्यूयॉर्क मेट्रोच्या प्रवाशांना मोफत वाटल्या जाणाऱ्या एका कम्युनिटी वर्तमानपत्रानं प्रवाश्यांच्या समस्या मांडताना या शब्दाचा वापर केला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा माद्रिदच्या सार्वजनिक वाहनांमध्ये यावर्षी जुन महिन्यात manspreading वर बंदी घालण्यात आली.

डिसेंबर 2014 पर्यंत हा शब्द जगभरात प्रसिद्ध झाला. अमेरिकतल्या प्रसिद्ध टॉक शो मध्ये याची चर्चा व्हायला लागली. टॉम हँक्स सारख्या सेलिब्रिटीवर #manspreading चे आरोप झाले. सोशल मीडियावर महिला पुढे यायला लागल्या. आपले अनुभव मांडायला लागल्या.

युरोप, आशिया खंडातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी हा मुद्दा उचलून धरला. 2014 चं वर्ष संपता संपता एका इंग्लिश दैनिकानं मुंबईतल्या बायकांना कश्याप्रकारे #manspreading चा त्रास सहन करावा लागतो यावर बातमी छापली आणि भारतातही या विषयाला तोंड फुटलं.

बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार 2015 मध्ये या शब्दाचा समावेश Online Oxford Dictionary मध्ये करण्यात आला. या dictionary प्रमाणे manspreading चा अर्थ आहे 'सार्वजनिक वाहनांमध्ये पुरुषांनी पाय फाकवून बसण्याची कृती.'

टीका आणि विरोध

पुरुषांच्या अशा पाय फाकवून बसण्याला विरोध करणाऱ्या स्त्रियांनाही टीकेला तोंड द्यावं लागलं. हा विरोध अवास्तव आहे, आणि पुरुषांना त्यांच्या गुप्तांगाच्या जागी हवा खेळती ठेवण्यासाठी असं बसणं आवश्यक आहे.

पाय फाकवून न बसल्यानं पुरुषांच्या गुप्तांगाला किती त्रास होतो हे बायकांना कधीच कळणार नाही असं स्पष्टीकरणही याला विरोध करणाऱ्या पुरुषांनी दिलं.

Image copyright Twitter

याला समर्पक उत्तर देताना कॅनडातल्या एका स्त्रीवादी पत्रकार आणि लेखिका सारा खान यांनी लिहिलं, "माझ्याही गुप्तांगाभोवती हवा खेळती राहिलेली मला फार आवडेल. विशेषतः जेव्हा माझी मासिक पाळी सुरू असते आणि माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये पॅड असतं तेव्हा पाय फाकवून न बसल्यां मला किती त्रास होतो हे कोणत्याही पुरुषाला कळणार नाही."

"पण बायकांना शिकवलेलंच असं असतं की, सावरून बसा, मोठ्यानं बोलू नका, कोणाच्या नजरेत येईल असं काही करू नका. आपलं अस्तित्व लपवून ठेवा. म्हणून बायका त्यांच्या हक्कांची जागा मागण्यात पण कचरतात."

#womanspreading कितपत योग्य?

Manspreading ला विरोध म्हणून womenspreading ही मोहिम गेल्या काही दिवसांपासून जोमात सुरु आहे. यात प्रत्यक्ष प्रवासात बायका पाय पसरून बसत नसल्या तरी तसे फोटो काढून सोशल मीडियावर टाकत आहेत. पण या 'लोहा लोहे को काटता है' टाईपचा उपाय कितपत योग्य आहे?

बीबीसी मराठीच्या महिला वाचकांना वाटतं की, फक्त पुरुषांसारखं वागून या समस्येचं समाधान होणार नाही.

Image copyright Facebook

विजया पाटील लिहीतात, "मला असं करणं मान्य नाही. असभ्यपणाला असभ्यपणा हेच उत्तर असू शकत नाही. आपलं म्हणणं ठाम शब्दात सांगणे आणि आपण सभ्य रस्ता अवलंबणं हाच यावरील उपाय वाटतो मला. आतापर्यंत आपण बदलासाठी मुलींचे प्रबोधन केलं, तसंच मुलांना प्रबोधन करणं हा ही एक मार्ग आहे".

मग यावर उपाय काय?

अनेक बायका मान्य करताता की, बऱ्याचदा सार्वजनिक वाहनात अशाप्रकारे पाय फाकवून बसणाऱ्या पुरुषांचा हेतू वाईट असतोच असं नाही. बीबीसी मराठीला दिलेल्या प्रतिक्रियांमध्येही महिलांचं हेचं मतं पडलं.

विजया पाटील लिहितात की, "जसं आपण मुलींचं प्रबोधन करतो, तसंच मुलांचंही प्रबोधन केलं पाहिजे."

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा हजारो बायकांनी #womanspreading या हॅशटॅगसह त्यांचे असे फोटो ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर टाकले ज्यात पाय पसरून बसल्या होत्या.

"सिमॉन दे बोहूव्हर यांनी एकदा म्हटलं होतं की, स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडवली जाते. मला पुरुषांच्या बाबतीतही तेच वाटतं," मिलिंद म्हणतात.

"मुलं त्यांच्या आसपासच्या गोष्टींमधून शिकतात. आणि बऱ्याचदा अनावधानानं आपल्या आसपासच्या जागेवर हक्क गाजवतात. कारण लहानपणापासून त्यांना तसंच शिकवलेलं असतं."

"ते मुलींना संकोच करताना पाहातात आणि मुलांना पसरताना, त्यामुळे यापेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते किंवा आपण असं वागून दुसऱ्यावर अन्याय करतोय हे त्यांच्या ध्यानीमनी नसतं."

"याला उपाय एकच. घडवतानाच पुरुषाला योग्य पद्धतीनं घडवणं. महिला घरातली असो किंवा बसमधली जागेवर तिचा तेवढाच हक्क आहे हे त्यांच्या मनावर ठसवणं. बदल दिसायला थोडा वेळ लागेल पण दिसेल नक्की."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)