पाहा व्हीडिओ : '...आणि बघता बघता पाच वाघांनी आम्हाला घेरलं!'

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्ही़डिओ : ….अन् उमरेड-कऱ्हांडलाच्या जंगलात भरली वाघोबांची शाळा!

वाघ पाहण्यासाठी तुम्ही अनेक जंगल सफारींचे प्लॅन आखले असतील. कधी कधी वाघ दिसतो, तर बऱ्याचदा फक्त नीलगाय, रानडुक्करसारख्या प्राण्यांचंच दर्शन होतं. पण प्रतीक जैस्वाल नावाच्या एका तरुणाच्या नशिबात काही औरच होतं.

नुकतेच प्रतीक नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सफारीवर गेले होते. या अभयारण्याची महाराष्ट्रातभर ख्याती आहे ती जय नावाच्या एका सेलेब्रिटी वाघामुळे. वन्यजीवप्रेमींचा लाडका जय गेल्या वर्षी याच जंगलातून बेपत्ता झाला आणि या अभयारण्याची जणू शानच गेली.

या अभयारण्यात प्रतीक एका उघड्या जीपमधून आपल्या कॅमेऱ्याने निसर्गाची कमाल टिपत होते. आणि तेव्हाच त्यांना दिसले तब्बल पाच वाघ! एक वाघीण आणि तिचे चार बछडे!

प्रतीक जैस्वाल यांनी हा व्हिडिओ तसंच तो टिपतानाचा थरार 'बीबीसी'च्या वाचकांशी शेअर केला आहे -

Image copyright Prateek Jaiswal
प्रतिमा मथळा 'राई' वाघिणीचे हे बछडे जंगलातल्या रस्त्यावर बिनधास्त पहु़डले होते.

मी वन्यजीव छायाचित्रकार असल्याने भटकंती नेहमीचीच असते. पण उमेरड कऱ्हांडला अभयारण्यात त्यादिवशी मी जे बघितलं ते एखाद्या स्वप्नासारखंच होतं.

जय वाघ बेपत्ता झाल्यापासून मी इथं जाणं बंद केलं होतं. पण जयचा मुलगा 'जयचंद' इथे बऱ्याच जणांना दिसल्याचं मला कळलं. मग मलाही तिथे जावंसं वाटलं.

3 डिसेंबरच्या सकाळी मी या अभयारण्याच्या पवनी गेटजवळच्या जंगलात होतो. मी आणि माझे तीन मित्र खास जयचंदला पाहण्यासाठी तिथं गेलो होतो. आम्ही जिप्सीमधे होतो. माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं जयचंद कोणत्याही क्षणी तिथं येईल, असं आम्हाला वाटत होतं.

आम्ही इथं जयचे फोटो काढण्यासाठी यायचो ते क्षण मला आठवले. कधी ना कधी तरी जयचंदही इथे येईल आणि जयची उणीव भरून काढेल, असं वाटत होतं. पण त्यादिवशी काय झालं होतं कुणास ठाऊक… जयचंद काही दिसला नाही.

वेळ पुढेपुढे जात होता तसतशी आमची हुरहूर वाढत होती. एवढ्यात साडेसहाच्या सुमाराला जंगलातून 'अलार्म कॉल' ऐकू यायला लागले. एक सांबर जवळच वाघ असल्याचा इशारा ते देत होतं. या जंगलात साधारण अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर एक तलावही आहे.

सांबराच्या कॉलवरून आम्हाला वाटलं, आता जयचंद दिसणार. तेवढ्यात तिथं वाघाचा एक बछडा जंगलातून बाहेर आमच्या समोरच्या रस्त्यावर येऊन दिमाखात बसला. त्याच्यामागून दुसरा, मग तिसरा, असं करत तब्बल पाच वाघांनी आमच्या जीपला घेराव घातला! आमचा थरकाप उडाला!

Image copyright Prateek Jaiswal
प्रतिमा मथळा 'जय' वाघाच्या या नातवंडांनी उमरेड कऱ्हांडला अभयारण्याची शान राखली आहे.

साधारण दहा महिन्यांचे ते चार बछडे होते! आणि त्यांच्यासोबत त्यांची आईही आली. पण ती आमच्यापासून दूर अंतरावर जंगलात जाऊन बसली आणि तिथून ती तिच्या बछड्यांवर नजर ठेवून होती.

ती राई वाघीण होती, हे आम्ही ओळखलं. याआधीसुद्धा राई आणि तिचे हे चार बछडे आम्हाला दिसले होते. पण तेव्हा एवढा छान व्हिडिओ मिळाला नव्हता. आज मात्र हे बछडे अगदी आमच्या जिप्सीच्या जवळ आले होते.

जयचंद आणि राई यांच्या या चार बछड्यांपैकी तीन माद्या आहेत आणि एक नर आहे.

या चार बछड्यांना आमची भीती नव्हती, आणि काही वेळानं आमची भीती थोडी कमी झाली. असंच अर्धा-पाऊण तास सगळं चाललं होतं, जणू आम्ही एकमेकांच्या ओळखीचे आहोत.


कऱ्हांडलाच्या या बछड्याला पाहून प्रतीक जैस्वाल यांना पुन्हा एकदा जयची आठवण आली. मूळ भंडाऱ्याचे राहणारे प्रतीक अंधारी-ताडोबा, पेंच, उमरेड, नागझिरा या अभयारण्यात नेहमी जातात. त्यांनी जयला तो या बछड्यांच्या वयाचा असल्यापासून पाहिलं होतं. नागझिरा ते उमरेड कऱ्हांडला या जयच्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत.

म्हणूनच हा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करताना त्यांच्या मनात धाकधूक आहे. "जय बेपत्ता झाला, त्याचं नेमकं काय झालं, याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. जयचे भाऊ वीरू आणि बिट्टू हे वाघही गायब झाले. त्याचा आणखी एक भाऊ श्रीनिवास इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून मृत्युमुखी पडला. तसं आता या बछड्यांचं व्हायला नको," ही चिंता त्यांना सतावते आहे.

"जय नसला तरी त्याच्या या तिसऱ्या पिढीतल्या बछड्यांची आपण काळजी घ्यायला हवी. ताडोबा, पेंच, नागझिरा या अभयारण्याप्रमाणेच उमरेड कऱ्हांडला या अभयारण्यातही वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे," असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)