प्रेस रिव्ह्यू : मोदींवरील टीका भोवली, अय्यर निलंबित

अय्यर Image copyright FREDERIC J. BROWN

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली होती. ती त्यांना आता भोवली असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

या टीकेमुळे राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं हे वृत्त आहे.

काँग्रेसनं मणिशंकर अय्यर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि पक्षातून हकालपट्टी केली आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

"माझी मातृभाषा हिंदी नसल्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक झाली," अशी सारवासारव मणिशंकर अय्यर यांनी केली. असं बीबीसी हिंदीच्या यासंदर्भातल्या वृत्तात म्हटलं आहे.

"पंतप्रधान मोदी हे फारच 'नीच' आहेत. ते सुसंस्कृत नाहीत. ते घाणरेडं राजकारण करत आहेत," असं वक्तव्य अय्यर यांनी केलं होतं.

"मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. "शब्दाचा नेमका अर्थ माहीत नसल्यामुळं आपल्याकडून ही चूक झाली," असं अय्यर यांनी म्हटलं आहे.

कथित प्रेमप्रकरणावरून मजुराला जिवंत जाळलं

बीबीसी हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानमध्ये एका मजुराची जिवंत जाळून हत्या करण्यात आली. ही हत्या करताना आरोपीनं व्हीडिओ बनवला. हा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

Image copyright video grab
प्रतिमा मथळा आरोपी शंभूलाल

या व्हीडिओमध्ये आरोपी कथित 'लव्ह जिहाद' आणि राष्ट्रवादावर बोलताना दिसत आहे. या आरोपीचं नाव शंभूलाल आहे, अशी पोलिसांनी माहिती दिली.

आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असल्याचं वृत्त आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी या हत्येचा कठोर शब्दांत निषेध केला आहे.

राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. 'व्हीडिओ पाहून कुणीही हादरून जाईल,' असं ते म्हणाले.

राजस्थान मानव हक्क आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे. "मानव ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे असं समजलं जातं. पशूदेखील मानवाहून अधिक चांगले आहेत. या घटनेनं मला धक्का पोहचला आहे," असं मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश टाटिया यांनी म्हटलं आहे.

आता हवे ते खाद्यपदार्थ सिनेमागृहात न्या...

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी असते असं आपल्याला वाटतं. कारण सिनेमागृहात जाताना बाहेरचे खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावरचं काढून ठेवायला सांगितलं जातं.

Image copyright Getty Images

"पण प्रेक्षकांना हवं ते अन्न सिनेमागृहात नेण्याचा अधिकार आहे," अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.

"खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेताना केवळ सुरक्षेच्या दृष्टीने त्याची सर्व प्रकारची पडताळणी होणं गरजेचं आहे. मात्र खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेण्यापासून मज्जाव करण्याचा व्यवस्थापनाला अधिकार नाही," असं अरुण देशपांडे यांनी एबीपीला सांगितलं.

आंतरधर्मीय विवाह केला तरी स्त्रियांचा धर्म बदलणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने लग्नानंतर स्त्रियांचा धर्म बदलू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री, ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

एका पारशी स्त्रीने आंतरधर्मीय लग्न केल्यास तिची धार्मिक ओळख बदलेल का? असा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम वलसाड पारसी ट्रस्टची बाजू मांडत होते. गुलरोख गुप्ता या पारशी स्त्रीनं हिंदू व्यक्तीशी लग्न केलं. आता गुलरोख त्यांच्या पालकांच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहू शकतील का याबाबतची भूमिका सुब्रमण्यम यांना येत्या 14 डिसेंबरपर्यंत मांडण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

आईला नाही तर मग काय अफझल गुरूला सॅल्यूट करणार का?

आईला नाही तर मग काय अफझल गुरूला सॅल्यूट करणार का? असं वक्तव्य उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादाची व्याख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या लोकांचा संदर्भ देत ते म्हणाले, "वंदे मातरम म्हणजे मातेचा सन्मान करण्यासारखं आहे. तो करायचा नसेल तर मग अफजल गुरूचा सन्मान करणार का?"

जेव्हा कोणी 'भारत माता की जय' म्हणतं तेव्हा फोटोतल्या देवीदेवतांकडे बघून नसतं तर धर्म, जात, वर्ण यांच्यापलीकडे असणाऱ्या 125 कोटी जनतेला उद्देशून असतं" असंही ते पुढे म्हणाले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)