हार्दिक पटेल यांची गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

  • सौतिक बिस्वास
  • बीबीसी

पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेले नेते हार्दिक पटेल यांची गुजरात काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावर आधी लिहिण्यात आलेला हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

गुजरातच्या एका छोट्या शहरातल्या धुळीनं भरलेल्या रस्त्यावर हिवाळ्यातल्या थंडीत काही माणसं एका तरुणाची वाट पाहत होती. सध्या या तरुणाची इथं अशी काही चर्चा आहे की, त्यामुळे भारताच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे.

पोक काढून चालणारा आणि चेहऱ्यावर काहीसा राग असलेला हा तरुण म्हणजे हार्दिक पटेल. वाणिज्य शाखेचा पदवीधर आणि एका व्यायसायिकाचा मुलगा असलेला हार्दिक पूर्णतः मध्यमवर्गीय विचारांचा आहे.

भारतीय नियमांनुसार 24 वर्षांचा हार्दिक पटेल आमदारकीची निवडणूकही लढवू शकत नाही. पण केवळ 2 वर्षांतच मोदींसाठी हार्दिक डोकेदुखी ठरला आहे, असं काही अभ्यासकांच मत आहे.

गुजरातमध्ये त्याला पाटीदार समाजाचा सर्वांत लोकप्रिय नेता मानलं जातं. पाटीदार समाजाला आरक्षण मिळवून त्यांचे शिक्षण आणि नोकरीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यानं छेडलेल्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबाही मिळत आहे.

पिछाडीवर पडल्याची भावना

गुजरातमध्ये पटेल समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि शेतीतही पुढारलेला आहे. तसंच तो भाजप आणि विशेषतः मोदींचा गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनचा पारंपरिक मतदार आहे.

महाविद्यालयं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये गुणवत्ता हा मुख्य निकष असला पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या हार्दिकनं गेल्या काही काळात हिंसक आंदोलनं केली आहेत. पण, आता गोष्टी बदलल्या आहेत.

हरियाणामध्ये जाट आणि महाराष्ट्रात मराठा या त्या-त्या राज्यातल्या बहुतांश जमिनींचे मालक असलेल्या जातींना आपण शिक्षणाच्या सोयी आणि नोकरीपासून लांब राहिलो असं वाटतं.

तरुणांचा पाठिंबा

गुजरातमध्ये राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयांची संख्या फार थोडी आहे. राज्यातली खासगी महाविद्यालयं सामान्यांना परवडणारी नाहीत. तसंच शेतीतलं घटलेलं उत्पन्न या समाजाला शहराकडे ढकलत आहे.

मात्र, शहरात आधीच कमी असलेल्या नोकरीच्या संधींमुळे त्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे. गुजरातमध्ये 48,000 लघु आणि मध्यम स्वरुपाचे कारखाने बंद झाले आहेत. यातले बहुतांश कारखाने हे गुजराती समाजाच्या मालकीचे आहेत. स्वस्तातल्या चिनी उत्पादनांनी बाजारपेठ काबीज केल्यानं हे कारखाने बंद झाले आहेत.

त्यामुळे आपल्या भविष्याबाबत चिंताक्रांत झालेला हा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी करत आहे. "पटेल समाजात पिछाडीवर पडल्याची भावना निर्माण झाली आहे." असं पेशानं वकील असलेल्या आनंद याज्ञिक यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्यासह अनेक जण पटेल आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देतात.

2012 मध्ये भाजपनं गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी 115 जागा मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या. या निवडणुकीच्या दोन वर्षांनंतर मोदींनी दिल्लीतल्या केंद्रीय सत्तेला धडक दिली. मात्र, त्यानंतर गुजरातची धुरा मोदी यांच्याइतकी उंची नसलेल्या नेतृत्वाकडून वाहिली जात आहे.

त्यामुळे आता गुजरात भाजपसाठी पहिल्यासारखं राहिल्याचं वाटत नाही. त्यातच पटेल समाजाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनं छेडली गेल्यानं मोदींचा पक्ष आता काहीसा 'बॅकफूट'वर आला आहे.

गुजरात विधानसभेच्या जवळपास 70 जागांवर पटेल समाज चांगला प्रभाव टाकू शकतो. आपल्या रणनीतीच्या जोरावर या समाजाला हाताळण्यात भाजपकडून चूक झाल्याचंही बोललं जात आहे.

दोन वर्षांपूर्वी पटेल समाजाच्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला होता. हार्दिक पटेलवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला 9 महिने तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तसंच सुटका झाल्यानंतर गुजरातमधून त्याला सहा महिने तडीपार करण्यात आलं होतं.

फोटो कॅप्शन,

गुजरातमध्ये पटेल समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे.

या घटनेनंतर हार्दिकचा उदय पटेल समाजाचा हिरो म्हणून झाला. तलाला या लहानशा उपनगरात हार्दिकला त्याचे समर्थक मसिहा मानतात. या समर्थकांनी त्याला गुजरातमधल्या गिर सिंहाचं छायाचित्र असलेली फोटोफ्रेम भेट दिली होती. "तो आमच्यासाठी खरा सिंह आहे." असं या समर्थकांपैकी एकानं सांगितलं.

"2002 नंतर भाजप सगळ्यांत कठीण निवडणुकीला सामोरी जात आहे. हार्दिक पटेलपासून त्यांना निर्माण झालेला धोका हा गंभीर स्वरुपाचा आहे. तो गुजरातच्या निवडणुकीतली महत्त्वाची बाब झाला आहे." असं उदय माहुरकर या मोदी सरकारवर पुस्तक लिहिलेल्या एका वरिष्ठ पत्रकारानं सांगितलं.

जेव्हा रस्त्यावर हार्दिक पटेलचं चंदेरी रंगाच्या एसयूव्ही गाडीतून आगमन होतं, तेव्हा त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्यात गॉगल लावलेले आणि हातात स्मार्टफोन असलेल्या बाईकस्वारांचा भरणा जास्त असतो.

त्यातल्या काहींना मात्र कमी पगाराच्या तर काहींना नोकऱ्याच नसल्याचं कळलं.

पहिल्यांदाच मतदान करणारा 19 वर्षांचा भावादिब मारडिया सांगतो की, त्याला पदवी मिळाल्यावर खाजगी क्षेत्रात नोकरी मिळेल. पण, सरकारी नोकरीसाठी त्याला आरक्षणाची गरज आहे.

42 वर्षीय किर्ती पनारा हे प्लास्टिकचा व्यवसाय करणारे छोटे व्यापारी सांगतात की, मला माझ्या मुलीला अभियंता किंवा डॉक्टर बनवून या छोट्या शहरातून बाहेर पडायचं आहे.

या भाागातला एकमेव साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. तर दुसरीकडे डिजीटल लाईफ मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीच्या जाहिराती शहरभर लागल्या आहेत.

आपल्या गाडीतून बाहेर आलेला हार्दिक आपल्या समर्थकांना खास शैलीत हात करत त्यांना भेटण्यासाठी पुढे सरसावतो. महिला त्याला ओवाळतात गोडधोड भरवतात, सेल्फीही काढतात. बिनपक्षाचे हे समर्थक मोठ्या संख्येनं "हार्दिक तुम आगे बढो" असा नारा देतात.

या वेळी भाजपला सत्तेतून खाली खेचा असं आवाहन करत हार्दिक पुढे निघतो.

चौकटीचा शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये आलेला हार्दिक एका शाळेच्या मैदानातल्या सभेला हजर होतो. तेव्हा तो शेती आणि नोकरीचे प्रश्न, शहरी-ग्रामीण भागातल्या दरीवर बोलतो.

मोदी आणि भाजपवरही टीका करतो. ज्यावेळी तो आरक्षणाचा मुद्दा काढतो त्यावेळी हातातला मोबाईल वर उंचावत तरुणही त्याला प्रतिसाद देतात.

गेल्या महिन्यात हार्दिकनं काँग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याचं जाहीर केलं. 1985 साली काँग्रेस पक्ष इथं सत्तेवर आला होता. मात्र, एवढ्या काळानंतरही काँग्रेसनं गुजरातमध्ये 30 टक्के मतांवरची आपली पकड कायम ठेवली आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं ओबीसी समाजाचा 40 वर्षांचा नेता अल्पेश ठाकोर यालाही समावून घेत आजमावण्याचं ठरवलं आहे. तर, 36 वर्षांचा जिग्नेश मेवानी हा युवा दलित नेता देखील अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहे. हे सगळ्यांनीच भाजपला मात देण्याचा निश्चय केला आहे.

शहरी मते

गुजरात हे तसं शहरी राज्य आहे. शहरी मध्यमवर्गीय मतदारांनी भाजपला आजपर्यंत मोठी साथ दिली आहे. पाच वर्षांपूर्वी पक्षानं शहरी आणि निमशहरी भागातल्या 84 पैकी 71 जागा मिळवल्या होत्या.

मात्र, या वेळी ग्रामीण भागातल्या 98 जागा भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातली जनता गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीमुळे नाराज झाली आहे. नोटाबंदीमुळे पिकांना हमीभाव मिळाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

" विकासाचा संबंध तरुणांशी आहे, शेतकरी आणि गावांचा विकास म्हणजे विकास आहे. फक्त शहरांचा विकास म्हणजे विकास नाही." असं हार्दिकनं मला सांगितलं.

गेली 20 वर्षं सतत सत्ता उपभोगत असलेल्या भाजपला यावेळी अँण्टी इन्कम्बन्सीला देखील सामोरं जावं लागणार आहे. विकासाचा मुद्दा जातीय ओळख आणि वर्चस्ववादी हिंदू वादाला बाजूला सारेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

पैसा आणि मतदारांचं व्यवस्थापन यात भाजप आघाडीवर आहे. पण, हे सध्या सोपं वाटत नाही. कारण एका ओपिनियन पोलनुसार काँग्रेस आणि भाजप यांच्यातल्या जागांमध्ये फार कमी तफावत राहण्याची शक्यता आहे.

मात्र, तरीही शहरी मतदार भाजपलाच मतदान करतील ही शक्यता देखील आहे.

"भाजपला ही निवडणूक आव्हानात्मक जाणार हे निश्चित असलं तरी भाजप गुजरातमध्ये पुढचं सरकार स्थापन करेल हे नक्की." असं ओपनियन पोलचा अंदाज लावणाऱ्या संजय कुमार यांनी सांगितलं.

मात्र, यावेळी भाजपचा पराभव होईल असं हार्दिक पटेलला वाटतं. "यावेळी भाजपचा पराभव झाला नाही, तर गुजरातचे नागरिक भाजपपुढे हतबल झालेले असतील." अशी पुस्ती पुढे हार्दिकनं जोडली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)