प्रेस रिव्ह्यू : व्यभिचार केल्यास फक्त पुरुषानांच शिक्षा का?- सर्वोच्च न्यायालय

NEW DELHI Image copyright Getty Images

व्यभिचार विषयक कायद्याचा पुनर्विचार करण्यात यावा असं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.

पुरुषानं लग्न झालेल्या इतर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते असा इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेला हा कायदा आहे.

या कायद्यावर पुनर्विचार करण्यात यावा असं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे. या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यात यावी असा विचार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी मांडला आहे.

व्यभिचाराच्या गुन्ह्यात स्त्री आणि पुरुष दोघेही समान प्रमाणातच दोषी असतात. मग फक्त पुरुषांनाच का शिक्षा व्हावी? हा स्त्री आणि पुरुष दोघेही समान असण्याचा काळ आहे. त्यामुळं स्त्रीला देखील शिक्षा व्हावी की नाही यावर विचार करण्यात यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

गुजरातमध्ये 68% मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 68 टक्के मतदान झालं. १९ जिल्ह्यांमधील एकूण ८९ जागांसाठी आज मतदान झालं. २०१२ मध्ये पहिल्या टप्प्यात ७०.७५% मतदान झाले होते. त्यात भाजपनं ६३ आणि काँग्रेसनं २२ जागी विजय मिळवला होता.

ऊर्वरित १४ जिल्ह्यांतल्या ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान होईल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमित शाह आणि नरेंद्र मोदी

निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राहुल गांधी यांना आपला अध्यक्ष म्हणून निवडल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर गेली 22 वर्षं सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आपला गड राखण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसत आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवसांमध्ये 19 सभा घेतल्या आहेत, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

मिलिंद नार्वेकरांवर शिवसेना पक्षप्रमुख नाराज?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला होता.

Image copyright Twitter

नार्वेकर यांनी प्रसाद लाड यांचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं होतं. त्यामुळं नार्वेकरांवर उद्धव ठाकरे नाराज असल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना भाजपविरोधात दंड थोपटत असताना नार्वेकर यांनी भाजप उमेदवारासाठी इतकी सक्रियता दाखवायची गरज नव्हती.

त्यावरून त्यांच्यावर सेनानेतृत्व नाराज झाल्याचं समजतं असं वृत्त देण्यात आलं आहे.

निठारी हत्याकांड : पंधेर आणि कोलीला फाशीची शिक्षा

देशभरात चर्चा झालेल्या निठारी हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयानं मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा नोकर सुरेंदर कोली यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

या दोघांवरही मोलकरणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा निठारी हत्याकांडांतील दोशींना शिक्षा व्हावी म्हणून निदर्शनं करताना एक महिला ( संग्रहित छायाचित्र)

कोलीनं १२ नोव्हेंबर २००६ रोजी पंधेरच्या घरात पीडित महिलेवर बलात्कार करून खून केला होता. या प्रकरणात सीबीआयनं १६ खटले दाखल केले होते. त्यातल्या दहा जणांना शिक्षा सुनावण्यात आली असून, सहा जणांवरील सुनावणी सुरू आहे.

उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये निठारी या ठिकाणी झालेल्या या हत्याकांडानं देश हादरला होता. पंधेरच्या घराच्या अंगणात १6 मृतदेहांचे अवशेष सापडले होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)