ओशोंच्या गूढ मृत्यूविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
ओशो

फोटो स्रोत, osho international foundation

आध्यात्मिक गुरू ओशो यांचं जीवन जितकं रहस्यमय होतं तितकाच त्यांचा मृत्यू देखील गूढ ठरला. 19 जानेवारी 1990 रोजी त्यांचं पुण्यात निधन झलं.

'ओशो - कधी जन्माला आले नाहीत, कधी वारले नाही. त्यांनी केवळ पृथ्वी ग्रहावर 11 डिसेंबर 1931 ते 19 जानेवारी 1990 या काळात येऊन गेले,' असं ओशोंच्या समाधीवर लिहिलेलं आहे.

जीवनाचा प्रवास मृत्यूमुळेच पूर्ण होतो, त्यामुळं मृत्यूचा शोक नाही तर उत्सव साजरा करायला हवा अशी ओशोंची शिकवण होती. त्यांच्या निधनाला 28 वर्षं उलटली तरी त्यांच्या वारशावरून कोर्टात केस सुरू आहे.

चंद्रमोहन झाला रजनीश

11 डिसेंबर 1931 रोजी मध्यप्रदेशातल्या कूचवाडामध्ये ओशोंचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव चंद्रमोहन जैन. लहानपणापासूनच आपल्याला तत्त्वज्ञान आणि अगम्याचा शोध घेण्याची आवड होती, असं ओशोंनी आपल्या 'ग्लिंप्सेस ऑफ माय गोल्डन चाइल्डहुड' या पुस्तकामध्ये म्हटलं आहे.

जबलपूर येथे त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पुढं ते जबलपूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले.

फोटो स्रोत, osho international foundation

वेगवेगळे धर्म आणि विचारधारांचा अभ्यास करून त्यांनी देशभर प्रवचनं द्यायला सुरुवात केली. त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप कुणावरही पडत असे. त्यावेळी त्यांना 'आचार्य रजनीश' असं म्हणत असत.

प्रवचनासोबतचं त्यांनी ध्यानधारणेची शिबिरं घ्यायला सुरुवात केली. नोकरी सोडल्यानंतर ते एक प्रभावी धर्मगुरू म्हणून नावारूपाला आले. त्यांनी नव-संन्यासाची चळवळ सुरू केली आणि 'ओशो' हे नाव धारण केलं.

अमेरिकेतून पलायन

1981 ते 1985 या काळात त्यांचं अमेरिकेत वास्तव्य होतं. ओरेगॉन या ठिकाणी त्यांनी कम्युन (आश्रम) स्थापना केला. ओरेगॉन या भागात सुमारे 65,000 एकरांमध्ये त्यांचा हा आश्रम पसरला होता.

त्यांचं अमेरिकेतलं वास्तव्य वादग्रस्त ठरलं. रोल्स रॉयस कार, महागडी घड्याळं, दागिने आणि डिझायनरकडून तयार करून घेतलेले कपडे यामुळे त्यांची माध्यमांमध्ये चर्चा झाली होती.

"ओशोंच्या कम्युनमध्ये येणाऱ्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. आम्हाला वाटत होतं यावर काही नियंत्रण असावं," असं त्यावेळी ओरेगॉनमध्ये काम करणारे अमेरिकन अधिकारी डॅन डेरो यांनी 'बीबीसी विटनेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

फोटो स्रोत, osho.com

फोटो कॅप्शन,

ओशो कम्यून (संग्रहित छायाचित्र)

पुढं डेरो सांगतात, "सुरुवातीला हे लोक आमच्यासोबत खूप विनम्रतेनं वागत. आम्हाला फक्त शेती करून शांततापूर्ण जीवन जगायचं आहे असं ते म्हणत."

नंतर ओशोंच्या शिष्यांनी त्या भागात दुकानं, ग्रीन हाऊस उघडले. या आश्रमाला 'रजनीशपूरम' असं नाव देऊन त्याची नोंदणी करण्याचा त्यांच्या शिष्यांचा विचार होता, पण त्याला स्थानिक लोकांनी विरोध केला.

त्यांचं वास्तव्य अनेक कारणांसाठी वादग्रस्त ठरल्याचं तिथले अधिकारी म्हणतात. त्यांच्या आश्रमात सुरू असलेल्या गोंधळामुळे सरकारनं चौकशीचे आदेश दिले. विरोधाची तीव्रता वाढल्यानंतर 1985मध्ये ओशो आपल्या अनेक शिष्यांसह भारतात परतले, असं अधिकाऱ्यांनी बीबीसी विटनेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

पुण्यात गूढ मृत्यू

भारतात आल्यावर पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये ते राहू लागले. 19 जानेवारी 1990ला त्यांचं निधन झालं.

डॉ. गोकुल गोकाणी, जे ओशोंचं शिष्यत्व पत्करलं होतं, यांनी शपथपत्रामध्ये म्हटलं आहे, "ओशोंवर उपचार करण्याची संधी मला मिळालीच नाही. मी दुपारी दोन वाजता पोहोचून देखील मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही."

गोकाणींनी पुढे लिहिलं आहे, "19 जानेवारी 1990ला मला दुपारी फोन आला. तुमचं लेटरहेड आणि इमरजन्सी किट घेऊन तातडीनं या, असं मला सांगण्यात आलं. मी दोनच्या सुमारास तिथं पोहचलो. तिथं ओशो यांचे शिष्य अमृतो (डॉ. जॉन अॅंड्र्यूज) हजर होते. त्यांनी मला मिठी मारली आणि म्हटलं ओशो त्यांचा देह सोडत आहेत. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर अमृतो म्हणाले 'ओशोंना असा निरोप देऊ नका. सर्व धैर्य एकवटून काम करा. ओशोंना वाचवा."

फोटो स्रोत, osho international foundation

फोटो कॅप्शन,

ओशो कम्यून (संग्रहित छायाचित्र)

"जर ओशो मरणासन्न होते, तर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न का करण्यात आले नाहीत? आश्रमात एवढे डॉक्टर असताना त्यांना हे काम का सांगितलं गेलं नाही. ओशो अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात का नेण्यात आलं नाही? त्यांच्या आजाराबाबत इतकी गुप्तता पाळण्याचं काय कारण होतं," असे अनेक प्रश्न गोकाणींना पडले होते, असा उल्लेख शपथपत्रात आहे.

डॉ. गोकाणी पुढे लिहितात, "मृत्यूचं कारण काय लिहू, असं मी अमृतो आणि जयेश यांना विचारलं. त्यांच्या सांगण्यानुसार मी त्यांच्या मृत्यूचं कारण हे 'मायोकार्डियल इंफ्राक्शन' म्हणजे हृदयविकाराचा झटका असं लिहिलं."

"हृदयाशी संबंधित रोगाचं नाव लिहिल्यास पोस्टमार्टमची आवश्यकता राहणार नाही म्हणून तेच लिहा असं जयेश यांनी मला म्हटलं होतं," असा उल्लेख शपथपत्रात आहे.

अंत्यसंस्कारांची घाई का?

'मृत्यूनंतर लवकरात लवकर माझं दहन करावं,' अशी ओशोंची इच्छा आहे, असं जयेश आणि अमृतो म्हणू लागले.

त्यांच्या पार्थिवाचं दर्शन दुरून घ्या असं सांगण्यात आलं होतं. ओशोंच्या मृत्यूची घोषणा झाल्यानंतर एका तासाच्या आत त्यांचं दहन करण्यात आलं.

"एरव्ही आश्रमातल्या कोणत्याही संन्यासाचा मृत्यू झाला तर ओशो आश्रमात आनंदोत्सव साजरा केला जातो. पण ओशोंच्या मृत्यूनंतर इतक्या लवकर दहन करण्याची घाई करण्यात का आली हे समजण्या पलीकडं होतं?" असं गोकाणी यांनी वैद्य यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

ओशोंच्या पार्थिवाला त्यांच्या भावाच्या हस्ते अग्नी देण्यात आला होता. वेदांत भारती हे ओशोंच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.

"चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळानंतर त्यावर खूप सारं केरोसीन ओतण्यात आलं होतं. ते पाहून मी आश्चर्यचकित झालो," असं वेदांत भारती यांनी वैद्य यांना सांगितलं होतं.

जयेश आणि अमृतो यांनी ओशोंचा मृत्यू झाला हे त्यांच्या आईला सांगण्याची जबाबदारी ओशो यांच्या सचिव नीलम यांच्याकडे दिली.

"ओशो यांच्या आई सरस्वती जैन आश्रमातचं राहत. पण त्यांना त्यांच्या मृत्यूची बातमी तासाभराने कळविण्यात आली होती. इतकंच नाही तर ओशो यांच्या आजारपणात त्यांना भेटण्याची परवानगी अमृतो यांनी दिली नव्हती," असं नीलम यांनी 2011 मध्ये एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

फोटो स्रोत, osho international foundation

जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या आईंना कळली तेव्हा त्या नीलम यांना म्हणाल्या "त्यांनी माझ्या मुलाला मारलं."

"ओशो यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्या सारखं म्हणत होत्या - उन्होंने तुझे मार डाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्या तसं बोलत आहे असं काही जणांनी त्या वेळी म्हटलं," असं नीलम यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

मृत्युपत्राबाबत गुप्तता का?

"ओशोंच्या पुण्याच्या आश्रमाची संपत्ती 1,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर कॉपीराइटमधून वर्षाला अंदाजे 100 कोटी रुपयांची कमाई होते. ओशोंच्या प्रवचनांच्या आधारावर अंदाजे 600 पेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे," असं योगेश ठक्कर सांगतात.

"जगातल्या सर्व प्रमुख भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झाली आहेत. ओशोंच्या नावे 'कथित' मृत्यूपत्र सादर करून जयेश (मायकल बायर्न) यांनी आपल्याकडे बहुतांश पुस्तकांचे हक्क ठेवले आहेत," असं ठक्कर सांगतात.

योगेश ठक्कर या ओशोंच्या शिष्याने ओशोंच्या मृत्युपत्राची सत्यता पडताळून पाहावी, अशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

ओशोंच्या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी बनावट आहे, असा संशय ठक्कर यांना आहे. ओशोंच्या मृत्युपत्राची पडताळणी व्हावी, यासाठी योगेश ठक्कर यांनी हे मृत्युपत्र तज्ज्ञांकडं पाठवलं होतं. "या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी ही बनावट असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे," असा ठक्कर यांचा दावा आहे.

"त्यांच्या मृत्यूनंतर आश्रमाच्या कोट्यवधी रुपयांची संपत्तीचं नियंत्रण त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आपल्या हातात घेतलं. ओशोंचं साहित्य हे सर्वांसाठी खुलं असायला हवं पण ओशोंच्या 'कथित' मृत्युपत्रामुळे या अध्यात्मिक संपत्तीचं नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हाती गेलं. म्हणून या मृत्युपत्राला मी न्यायालयात आव्हान दिलं," असं योगेश ठक्कर यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, osho international foundation

त्यांच्या याचिकेसोबत डॉ. गोकुल गोकाणी यांचं शपथपत्र देखील जोडण्यात आलं आहे.

ओशोंच्या मृत्यूमध्ये काहीतरी संशयास्पद आहे असं गोकाणी यांना वाटतं. "ओशोंच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतरही काही प्रश्न अनुत्तरित आहेत," असं गोकाणींनी शपथपत्रात म्हटलं आहे.

"डॉ. गोकाणी यांची मुलाखत घेऊन त्यांचं ओशोंच्या मृत्यूबाबत काय म्हणणं आहे हे मी समजून घेतलं," असं 'व्हू किल्ड ओशो' या पुस्तकाचे लेखक आणि हिंदुस्तान टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक अभय वैद्य यांनी बीबीसीला सांगितलं.

"अनेक वर्षं आपण याबाबत बोललो नाही, पण अनेक गोष्टींची उत्तरं सापडत नव्हती म्हणून मला अस्वस्थता वाटत होती असं गोकाणींनी मुलाखतीदरम्यान मला म्हटलं होतं," अशी आठवण वैद्य यांनी सांगितली.

फोटो स्रोत, OSHO INTERNATIONAL FOUNDATION

'आरोपांमध्ये तथ्य नाही'

या दाव्यांची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसीनं पुण्याच्या ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनला संपर्क साधला. फाउंडेशनच्या अमृत साधना यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अमृत साधना या 'ओशो टाइम्स इंटरनॅशनल'च्या संपादक आहेत.

हे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं. "कुणी काही म्हटलं तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा का? ओशोंच्या मृत्यूबाबत अथवा त्यांच्या मृत्युपत्राबाबतच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही," असं अमृत साधना यांनी म्हटलं.

'ओशो' या ट्रेडमार्कच्या नोंदणीसाठी 'ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन' आणि 'ओशो लोटस कम्यून' या दोन संस्थांमध्ये वाद झाला.

फोटो स्रोत, OSHO INTERNATIONAL FOUNDATION

जनरल कोर्ट ऑफ युरोपियननं या ट्रेडमार्कची मालकी ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनकडे असावी असा निर्वाळा 11 ऑक्टोबर 2017 रोजी दिला.

ओशो आश्रमाच्या मा अमृत साधना यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. "त्यांचा संदेश शुद्ध स्वरूपात राहावा यासाठीच ओशोंनी 'ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन'ची निवड केली होती. त्याच उद्देशानं आम्ही काम करत आहोत," असं फाउंडेशननं आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

"ओशोंचे विचार क्रांतिकारक होते आणि ते कालातीत आहेत. त्यामुळे ते आजही तितकेच लागू होतात जितके ते 25-30 वर्षांपूर्वी होते," असं अमृत साधना म्हणाल्या. ओशोंच्या विचारात असलेल्या नाविन्यामुळे त्यांचे विचार आजही तरुणांना आकर्षित करतील," असं अमृत साधना यांनी बीबीसीला सांगितलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)