अध्यक्ष राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेसला संजीवनी देणार का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : राहुल गांधी यांच्याबद्दल तीन शब्दांत काय सांगाल?

देशात राजकीय गणितांची जुळवाजुळव तीव्र झालेली असताना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात खांदेपालट होत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या आईकडून अर्थात सोनिया गांधी यांच्याकडून आज पक्षाची धुरा स्वीकारली आहे.

132 वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाला संजीवनीची गरज होती.

देशातला सगळ्यांत मोठा विरोधी पक्ष अशी बिरुदावली मिरवणाऱ्या काँग्रेसला 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वीस टक्क्यांपेक्षाही कमी मतं मिळाली होती. याच निवडणुकीत नरेंद्र मोदीप्रणित भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत सत्ता संपादन केली होती.

या निवडणुकांमध्ये एकूण 543 जागांपैकी काँग्रेसला 44 म्हणजे दुसऱ्या शब्दांत जेमतेम आठ टक्के मते मिळाली. काँग्रेसची आतापर्यंतची ही सगळ्यांत वाईट कामगिरी ठरली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा 2014 निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेली मतं.

त्या निवडणुकीनंतर अर्ध्या डझन राज्यांमध्ये काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली. आता केवळ कर्नाटक आणि पंजाब या मोठ्या राज्यांसह तीन छोट्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता धुसर आहे.

"2009 ते 2014 या कालावधीत शहरी तसंच ग्रामीण अशा दोन्ही प्रदेशांतला मतदार काँग्रेसपासून दुरावला. काँग्रेसने लोकप्रिय मतांपैकी नऊ टक्के मतं गमावली. समाजातील विविध घटक तसंच अल्पसंख्य घटकांपासून काँग्रेसची नाळ तुटली आहे," असं राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी सांगितलं.

ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा त्याठिकाणी विजयपथावर परतण्यात काँग्रेसला अपयश येतं, हा समज रुढ झाला आहे. तामिळनाडूसारख्या राज्यात काँग्रेसने शेवटची निवडणूक 1962 मध्ये जिंकली होती.

पश्चिम बंगालसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात 1977 नंतर काँग्रेसला निवडणुकांमध्ये बाजी मारता आलेली नाही. ही उदाहरणं काँग्रेसच्या पीछेहाटीचं द्योतक आहेत.

उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये काँग्रेसला नुकताच पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्याची सुतराम शक्यता नाही.

राहुल काँग्रेसला तारणार?

अशा परिस्थितीत 47 वर्षीय राहुल गांधी ओढग्रस्तीला लागलेल्या काँग्रेस पक्षाला तारू शकतील का?

अमेठी या गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघातून विजय मिळवत राहुल गांधींनी 13 वर्षांपूर्वी राजकारणातील मुख्य प्रवाहात प्रवेश केला.

गांधी घराण्यातील पाचव्या पिढीचे प्रतिनिधी असणाऱ्या राहुल यांना राजकारण मनापासून आवडत नाही. सुरुवातीच्या काळात राजकारणापासून त्यांनी सुरक्षित अंतर ठेवलं होतं. राजकारणातला जांगडगुत्ता, धावपळ यात त्यांना विशेष रस नाही.

2013 पासून राहुल गांधी काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या नशिबात काहीही बदल घडला नाही. राहुल गांधी यांनी युवा आघाडी बळकट करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचं कामकाज एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्याने काँग्रेसच्या कामगिरीवर विशेष परिणाम जाणवला नाही. काँग्रेसची घसरण सुरूच राहिली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा गेल्या काही वर्षात काँग्रेसची मतदारांशी नाळ तुटली आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी बदल घडला. सप्टेंबर महिन्यात राहुल विचारपूर्वक अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात ते विद्यार्थी, प्रशासक, पत्रकार, डिप्लोमॅट्स अशा विविध क्षेत्रांतील धुरिणांना भेटले.

सोशल मीडियावरची मोहीम यशस्वी

या दौऱ्यात त्यांनी स्वत:च्या मर्यादा मान्य केल्या. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात केलेल्या भाषणात राहुल यांनी पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा उत्तम संवादक असल्याचं मान्यही केलं होतं.

सोशल मीडियावरील त्यांची मोहीम अखेर फळली. सोशल मीडियावर ते आता अधिक मोकळेपणाने वावरतात. सोनिया गांधींच्या तब्येतीसंदर्भात राहुल यांनी ट्वीट अपडेट केलं होतं. राहुल यांचा कुत्रा पिडीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

गटातटाचं राजकारण आणि गाव-तालुका पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली दुफळी मोडून काढत राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये प्रचारात जम बसवला. (2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व 26 जागांवर विजय मिळवला होता.)

गुजरातमधल्या नाराज मतदारांना आकृष्ट करण्याची किमया राहुल यांनी साधली. नोकऱ्या आणि व्यवसायांच्या अपुऱ्या संधी, नोटबंदी, वाढती असहिष्णुता, मंद गतीने मार्गक्रमणा करणारी अर्थव्यवस्था, मोदीप्रणित सरकारने पूर्ण न केलेली आश्वासनं या सगळ्याबाबत राहुल यांनी ठामपणे मते मांडली.

'नव्या अवतारात ते मतदारांशी संलग्न होण्यादृष्टीने अधिक कटिबद्ध आहेत', असं आरती रामचंद्रन यांनी सांगितलं. आरती यांनी राहुल यांच्या चरित्राचं लेखन केलं आहे.

गांधी यांच्या उत्साहाने काँग्रेस पक्षात चैतन्य पसरलं आहे. मात्र निवडणुकांमध्ये बाजी पालटवण्यासाठी त्यांना अधिक चतुराईने आणि व्यवहार्यपणे वाटचाल करावी लागेल.

तरुणाईला कसं वळवणार?

आर्थिक सुधारणांच्या गप्पांनी युवा वर्ग कंटाळला आहे. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राहुल यांना ठोस आर्थिक मार्ग आखून द्यावा लागेल.

स्थानिक स्तरावर लोकसंग्रह असणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी द्यावी लागेल. प्रादेशिक स्तरावरील पक्षांशी आघाडी करण्यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करावी लागेल. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथे चांगला कारभार करावा लागेल.

"देशाचा बदलता राजकीय नूर ओळखता न आल्याने काँग्रेसला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. एकछत्री अंमलापासून देशात विविध पक्षांचा वावर सुरू झाला. या पक्षांनी राजकीय पटलावर स्वत:ची छाप उमटवली. राजकीय वर्तुळात युती-आघाडीची गणितं लोकप्रिय ठरू लागली", असं डॉ. पळशीकरांनी सांगितलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा सोनिया गांधी यांच्याकडून आता काँग्रेसची धुरा राहुल यांच्याकडे आली आहे.

भ्रष्टाचाराला जराही थारा न देणारा पक्ष म्हणून काँग्रेसला ओळख ठसवावी लागेल. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना भ्रष्टाचाराचे असंख्य घोटाळे उघडकीस आले होते.

कार्यकर्त्यांची मोठी फळी असणाऱ्या भाजप सरकारला आव्हान देण्याकरता काँग्रेस म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा पक्ष अशी ओळख निर्माण करावी लागणार आहे.

घराणेशाहीचं ओझं

गांधी या नावासह येणाऱ्या ऐतिहासिक वारशाचं ओझं राहुल गांधी यांच्या खांद्यावर आहे. कारण आर्थिक परिस्थिती तंगीची असतानाही घेतलेल्या भरारीचा मोदी उल्लेख करतात.

अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारला होता. भारताचं नेतृत्त्व नेहमीच एका घराण्याकडे राहिल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. अशा पद्धतीनेच देश चालवला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं.

"राहुल गांधी यांनी प्रांजळपणे हे सत्य मान्य केलं होतं. विविध राज्यांतले पक्ष एखाद्या विशिष्ट घराण्याद्वारे किंवा कुटुंबाद्वारेच चालवले जातात. भाजपही त्याला अपवाद नाही", असं दिल्लीस्थित 'स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज' (सीसीडीएस) संस्थेचे संचालक आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी सांगितलं.

"देशातला मतदार घराणं किंवा कुटुंबीयांचा विचार करूनच मतदान करतो हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे", असं संजय कुमार सांगतात.

अल्पसंख्याकांचं लांगूलचालन करणारा पक्ष अशी प्रतिमा झाल्याने काँग्रेसपासून अनेक मतदार दूर गेले असं कुमार यांनी स्पष्ट केलं. 2014 मध्ये हिंदू मतदारांपैकी केवळ 16 टक्के मतदारांनी काँग्रेसला मत दिलं होतं.

'हिंदू मनं जिंकावी लागतील'

सीसीडीएस संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार काँग्रेसला मिळालेल्या सरासरी दहापैकी सहा मतं ही मुस्लीम, आदिवासी, शीख किंवा ख्रिश्चन समाजाची होती. भाजपच्या सरासरी दहापैकी केवळ तीन मतं या समाजाची होती.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा विविध राज्यात काँग्रेसला स्थानिक पक्षांसह आघाडी करावी लागणार आहे.

"हिंदुत्ववादाची कास न पकडता हिंदू मतदारांची मनं जिंकणं हे राहुल गांधींसमोरचं मोठं आव्हान आहे. हिंदू समाजापासून दूर न जाता हिंदू राष्ट्रवादाला मोडून काढण्याची अवघड जबाबदारी राहुल यांच्यासमोर आहे", असं दिल्लीस्थित राजकीय विश्लेषक अयाझ अशरफ यांनी सांगितलं.

"पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणार असलेल्या निवडणुका राहुल यांची कसोटी ठरणार आहे. त्यांच्याबद्दलचं मतदारांचं मनपरिवर्तन व्हावं तसंच काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून छबी ठसवण्याकरता राहुल यांना निवडणुकांमध्ये विजय आवश्यक आहे', असं कुमार सांगतात.

काही प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे आहेत. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते स्वत:च काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार का? किंवा दोन वर्षात पक्षाची मोट बांधत एखादा स्वतंत्र पंतप्रधान पदाचा उमेदवार उभा करणार का?

काँग्रेसवर पुस्तक लिहिणाऱ्या झोया हसन यांच्या मते, 'सर्व गुणदोषांचा विचार करता सर्वसमावेशक विचार करून वाटचाल करणारा पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे. कोणतीही विचारधारा न जपणारा आणि विशिष्ट धोरणांद्वारे चालणारा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा आहे. सत्तेची विचारधारा मानणारा पक्ष यावर काँग्रेस ठाम आहे.

इतिहासात काँग्रेसने केलेल्या चुका पंतप्रधान मोदी करतील हे राहुल यांचं नजीकच्या काळात सत्तेपर्यंत जाण्याचं गृहीतक आहे. यामुळेच राहुल यांच्यासमोरचं आव्हान खंडप्राय आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)