पाहा व्हीडिओ : आपल्या पूर्वजाचा हा सांगाडा आहे 36 लाख वर्षं जुना

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : आपल्या पूर्वजाचा हा सांगाडा 36 लाख वर्षं जुना

मनुष्याच्या उत्क्रांतीबद्दल मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिलं आहे. यातूनच मानवाच्या पूर्वजांबद्दल सतत संशोधन सुरू आहे. या संशोधनाचा महत्त्वाचा टप्पा दक्षिण आफ्रिकेतल्या एका उत्खननात सापडला.

दक्षिण आफ्रिकेत मनुष्याचा सर्वांत जुना सांगाडा सापडला आहे. या सांगडा 36 लाख वर्षं जुना असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

माणसाच्या या पूर्वजाला 'लिटिल फूट' असं नाव देण्यात आलं आहे. या सांगाड्याचं उत्खनन, त्याची स्वच्छता आणि या हाडांची एकत्र मांडणी करण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागला.

या सांगाड्याच्या कालखंडाबद्दल वाद आहेत. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी हा सांगाडा 36 लाख वर्षांपेक्षा जुना असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वी मिळालेल्या सर्वांत जुन्या सांगाड्याचं नाव लुसी आहे. 'लुसी' इथिओपियामध्ये मिळाली होती.

याचाच अर्थ असा की लुसीच्याही आधी 5 लाख वर्षं 'लिटिल फूट' अस्तित्वात होती.

'लिटिल फूट' आणि 'लुसी' ऑस्ट्रॅलोपिथेकस या मनुष्याच्या वंशाशी संबंधित आहेत. पण ते वेगवेगळ्या प्रजातींमधील आहेत.

हा शोध विविध कारणांनी महत्त्वाचा मानला जात आहे. मनुष्याचे पूर्वज आफ्रिका खंडाच्या मोठ्या भूभागावर वास्तव्यास होते. तसेच या पूर्वजांच्या प्रजातींमध्ये मोठं वैविध्य होतं, असं यातून दिसतं.

'लिटिल फूट' स्टर्कफोंटाईन गुहांत सापडली. या गुहा जोहान्सबर्गच्या वायव्येला आहेत.

Image copyright PAUL MYBURGH
प्रतिमा मथळा हे संशोधनाचं काम 20 वर्ष सुरू होतं

ही लहान मुलगी असावी आणि ती गुहेच्या कड्यावरून पडली असावी, असं संशोधकांना वाटतं.

मुख्य संशोधक प्रा. रॉन क्लर्क म्हणाले, "हा सांगडा लहान आहे. पण याचं महत्त्व मोठं आहे. एका लहान हाडापासून या संशोधनाची सुरुवात झाली. आपली उत्क्रांती समजून घेण्यात हे संशोधन मदत करत आहे."

"या गुहांतून ही जीवाश्म मिळवणं फारच कष्टाचं काम होतं. ही हाडं फारच नाजूक आहेत आणि ती नैसर्गिक गाळात दबलेली होती," असं त्यांनी सांगितलं.

"सुई इतक्या लहान साधनांचा वापर करूनही यातलं काही उत्खनन करण्यात आलं आहे. म्हणूच याला इतका कालावधी लागला," असं त्यांनी सांगितलं.

विश्लेषण : अॅंड्र्यु हार्डिंग, बीबीसी न्यूज, जोहान्सबर्ग

लिटिल फूटच्या संशोधनावरून असं दिसतं की, ती एप किंवा माकडांच्या जवळची नव्हे तर माणसांसारखी होती. तिचे बाहू, हाताचा पंजा लहान असणं हेच दाखवत. बहुधा ती झाडांवर झोपत असावी.

मानवाच्या 'फॅमिली ट्री'मध्ये लिटिल फूटचं नेमक स्थान शोधण्याचं काम सुरू आहे. पण लुसीपेक्षा तिचा कालावधी नक्कीच जुना आहे. इथिओपियामध्ये लुसीचं जीवाश्म सापडलं होतं, पण तो पूर्ण सांगाडा नव्हता.

याचाच अर्थ असा की आपले प्राचीन पूर्वज संपूर्ण आफ्रिकेत विखुरले होते.

दक्षिण आफ्रिकेतील या गुहा संशोधकांसाठी खजिना ठरत आहेत आणि मानवी उत्क्रांतीबद्दल आपली समज वाढवण्यात मदत करत आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)