'कृपया आहेर बिटकॉईनमध्येच द्यावा'

  • इमरान कुरेशी
  • बीबीसीसाठी बंगळुरूहून
फोटो कॅप्शन,

बंगळुरुमध्ये गाजलेलं 'बिटकॉईन वेडिंग'

बंगळुरूमध्ये पार पडलेलं हे लग्न एरवी इतर लग्नांसारखंच आहे. पण, वेगळेपण आहे वधूवरांना मिळालेल्या आहेरात.

प्रशांत शर्मा आणि नीती श्री यांचं शनिवारी दक्षिण बंगळुरूमध्ये लग्न झालं. लग्नाला आलेले पाहुणे रिकाम्या हाताने लग्नाला आले होते.

म्हणजे त्यांच्या हातात भेटवस्तू नव्हती. कारण, वर प्रशांतचा तसा आग्रहच होता. त्यांना भेट वस्तूच्या स्वरूपात नव्हे तर क्रिप्टो करन्सीच्या रूपात हवी होती.

विशेष म्हणजे प्रशांत यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

लग्नात बिटकॉईनचा आहेर

'190 पैकी 15 जणांनी भेटवस्तू बरोबर आणल्या होत्या. इतरांनी आम्हाला बिटकॉईन दिले', प्रशांत यांनी बीबीसीला सांगितलं.

पुढचा प्रश्न अर्थातच होता त्यांना किती बिटकॉईन मिळाले?

"मी रक्कम उघड करणार नाही. पण, मला लाखभर रुपये नक्कीच मिळाले आहेत", आपल्या बिटकॉईनच्या कल्पनेवर प्रशांत खूश आहेत.

प्रशांत आणि त्यांची पत्नी निती बंगळुरूमध्ये एक स्टार्टअप कंपनी चालवतात. ही कंपनी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असल्यामुळे त्यांना क्रिप्टो करन्सीची कल्पना सुचली.

"लग्नाला आलेले आमचे बहुतेक मित्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच काम करतात. त्यामुळे तंत्रज्ञान आणि भेटवस्तू देण्याची परंपरा यांचं मीलन घडवून आणण्याचं आम्ही ठरवलं."

"आमच्या पालकांनाही आम्ही विश्वासात घेतलं. त्यांनाही पटलं. मग आम्ही ते प्रत्यक्षात आणलं,' प्रशांत यांनी त्यांची कल्पना बीबीसीला समजावून सांगितली", प्रशांत म्हणाले.

फोटो कॅप्शन,

लग्नात लाखोंचा आहेर. पण, बिटकॉईनच्या रुपात

"काही मित्र होते, ज्यांनी पारंपरिक भेटवस्तूंना अगदीच फाटा दिला नाही. त्यांनी भेटवस्तूही आणली आणि बिटकॉईनही जमा केले", ते सांगतात.

प्रशांत मूळचे जमशेदपूरचे आहेत. तर नीती यांचं जन्मगाव आहे बिहारमधील पाटणा.

लग्नासाठी जमलेल्या काही मित्रांशीही बीबीसीने संवाद साधला. अनेकांना ही कल्पना आवडली होती.

"बिटकॉईन भेट म्हणून देण्याची कल्पना सरकारला कितपत आवडेल माहीत नाही. पण, कल्पना फक्त अभिनवच नाही तर उपयुक्त आहे", एक जण म्हणाला.

"क्रिप्टो करन्सीचा वापर भविष्यात आणखी वाढू शकेल", एका नातेवाईकांनं आम्हाला नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितलं.

बिटकॉईनच का?

वधू नीती जिथे आधी काम करत होती, त्या कंपनीचे कार्यकारी संचालक रवी शंकर एन यांनी झेबवे नावाच्या ऑनलाईन एक्सचेंजमधून खरेदी केलेले बिटकॉईन प्रशांत यांना भेट दिले.

त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली.

"अगदी एका आठवड्यापूर्वी बिटकॉईन चर्चेत आले. पण, प्रशांत आणि नीती यांनी भेटवस्तू म्हणून बिटकॉईन स्वीकारण्याचा विचार दोन महिन्यांपूर्वीच केला होता", रवी शंकर एन यांनी माहिती दिली.

मागच्या पंधरा दिवसात बिटकॉईनबद्दल जगभर बोललं जात आहे. खासकरुन प्रतिक्रिया अशी आहे की, बिटकॉईनचा फुगवटा कोणत्याही क्षणी फुटेल आणि त्याची किंमत घसरेल.

"प्रशांत आणि नीती स्वत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना बिटकॉईनच्या व्यवहारात नाही, तर त्याच्याशी संबंधित वेबब्लॉक या तंत्रज्ञानात रस आहे", रवी शंकर सांगतात.

फोटो कॅप्शन,

क्रिप्टो करन्सीच्या प्रसारासाठी प्रयत्न

लग्नात मिळालेल्या बिटकॉईनचं काय करणार, असं विचारल्यावर "आम्ही बिटकॉईन खरेदी केले आहेत. आम्हाला पुढे जाऊन हे तंत्रज्ञान कसं आकार घेतं, कुठलं वळण घेतं, हे बघायचं आहे," प्रशांत आणि नीती सांगतात.

लग्नात आहेर म्हणून आलेल्या बिटकॉईनचं प्रशांत आणि निती काय करणार? तर लवकरात लवकर हे बिटकॉईन ते विकणार आहेत. कारण, आलेल्या पैशातून वंचित मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांना करायची आहे.

बिटकॉईन किंवा कुठल्याही क्रिप्टो करन्सीबद्दल केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं वारंवार सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यावर प्रशांत यांनी आपलं मत व्यक्त केलं.

"कुठलंही नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा सरकारला त्यावर नियंत्रण आणायचं असतं. भारतातच नाही तर जगभर हाच वाद आहे. वेबब्लॉक तंत्रज्ञान खुलं आहे. त्यावर सध्यातरी नियंत्रण नाही."

मूळात बिटकॉईनला सरकारचा विरोध का आहे?

पूर्णपणे विरोध आहे असं नाही म्हणता येणार. कारण, स्वत: रिझर्व्ह बँक वेबब्लॉक हे तंत्रज्ञान वापरण्याबाबत उत्साही आहे. पण, बिटकॉईनचं ट्रेडिंग म्हणजे त्यात रोजच्या रोज व्यवहार होणार असतील तर केंद्रीय बँक नक्कीच जागरुक आहे.

"क्रिप्टो करन्सीची मालकी आणि व्यवस्थापन याबाबतीत पारदर्शकता नसते. शिवाय ऑनलाईन एक्सचेंजची संख्याही अगणित आहे. त्यावर नियंत्रण नसल्याने गुंतवणूकदारांची फसगत होण्याची शक्यता असते. या मुद्द्यांमुळेच सरकार सावध भूमिका घेतं", अर्थतज्ज्ञ प्रांजल शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं.

"अनेक देश आता क्रिप्टो करन्सीच्या वापरासाठी तयार झाले आहेत. मॉल आणि मोठ्या दुकांनांमध्येही क्रिप्टो करन्सी स्वीकारली जाते. त्यासाठी बँकांची परवानगी आहे."

"त्यामुळे सरकार जुनाट विचारांची आहेत असं नाही. पण, त्यांना गुंतवणुकदारांचं हितही जपायचं आहे. म्हणून ते सावध आहेत", प्रांजल शर्मा स्पष्ट करतात.

बिटकॉईन आणि परदेशी चलन कायदा

भारतातल्या गुंतवणुकदारांसाठी एक धोकाही आहे. कारण, भारतात बिटकॉईनमध्ये व्यवहार करणारं एकही एक्सचेंज नाही.

त्यामुळे भारतात बिटकॉईन खरेदी करताना पैसे आपण भारतीय चलनामध्ये मोजतो. पण, खरेदी होते परदेशी एक्सचेंजवर.

यावर सायबर लॉचा अभ्यास असलेले वकील पवन दुग्गल यांना आम्ही याबाबत विचारलं. ते म्हणाले, "परकीय चलन नियामक कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं."

"यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. बिटकॉईन हा विषय महत्त्वाचा आहे. आताही त्याचा वापर होतोय. भविष्यात तो वाढत जाणार आहे", दुग्गल सांगतात.

ही सगळी चर्चा सुरू असताना आणि प्रशांत आणि नीतीच्या लग्नात बिटकॉईनचा आहेर आला असताना रिझर्व्ह बँकेनं नवा इशारा गुंतवणुकदारांना दिला आहे.

भारतात बिटकॉईनच्या चलन म्हणून वापराला मान्यता नाही याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)