सोशल : "विदर्भाला जाऊ द्या, महाराष्ट्रालाही याचा फायदा होत नाही!"

नागपूर विधान भवन Image copyright Getty Images

नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसंच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला.

शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांसारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

दरम्यान स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरातल्या व्हरायटी चौकात निर्दशनं करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चाही नागपूर शहरात काढण्यात आला.

अधिवेशनाच्या या पार्श्वभूमीवर आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारलं की, त्यांना नागपूर आधिवेशनाने विदर्भाला खरंच फायदा होतो का? असा प्रश्न विचारला होता.

अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली. पण बहुतेक साऱ्यांनी कुठलाच फायदा होत नसल्याचं मत व्यक्त केलं.

राहुल मोरे म्हणतात, "हिवाळी अधिवेशन भरवल्याने विदर्भाचा काय फायदा होतो माहीत नाही, मात्र नेते मंडळींची गंगा जमुना पवित्र होते."

Image copyright Facebook

योगीराम मस्के म्हणतात, "विदर्भाला जाऊ द्या! महाराष्ट्रालासुद्धा नाही होत!"

Image copyright Samruddha

"नागपूरचं हिवाळी अधिवेशन एक वार्षिक सामुदायिक सहलीपुरते मर्यादित झाले आहे", असं मत अजय चौहान यांनी व्यक्त केलं आहे. तर रोहित पवार विचारतात, "10 दिवसाचं अधिवेशन. त्यात विरोधकांचा गदारोळ. सभागृह तहकूब. मग कसा होणार फायदा?"

Image copyright Facebook

अनिरुद्ध जोशी यांनीही "नेतेमंडळींचा तो वर्षभराचा श्रमपरिहार असतो", असं म्हटलंय. तर, अविनाश धर्माधिकारी, वामन सोमकुवर यांनीही स्पष्ट शब्दांत फायदा नाही, असं म्हटलं आहे.

Image copyright Facebook

"थंडीचा गरम गरम हुरडा खायला मिळतो की विदर्भात नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना…" अशी वेगळी प्रतिक्रिया वैभव देशकरी यांनी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)