संसद हल्ला : आणि आमच्यासमोर ग्रेनेड आदळलं....

संसद, राजकारण, हल्ला.
प्रतिमा मथळा संसदेवर हल्ला झाला आणि संपूर्ण देशभरात काळजीचं वातावरण पसरलं होतं.

'मोबाइल बंद होते. तेवढ्यात एका मोठा धमाका झाला. संसदेचा एखादा भाग कोसळला असंच आम्हाला वाटलं. तेवढ्यात गोळीबार सुरू झाला. एक ग्रेनेड आमच्यासमोर येऊन आदळलं. सुदैवाने ते फुटलं नाही'.... संसदेवर सोळा वर्षांपूर्वी झालेला हल्ला अनुभवलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधीचा हा कटू अनुभव.

सोळा वर्षांपूर्वी 13 डिसेंबर 2001 रोजी दिल्लीतली एक थंडीने गारठलेली सकाळ. सूर्याची किरणं दाट धुक्याच्या पडद्याला छेदण्याचा प्रयत्न करत होती.

विरोधकांच्या वाढत्या विरोधाने संसदेचं हिवाळी सत्र गाजत होतं. तेरा तारखेची याला अपवाद नव्हती.

महिला आरक्षणाच्या विधेयकावरून संसदेत गोंधळ उडणं अपेक्षित होतं. संसदेच्या परिसरात नेत्यांशी बोलून काही बातमी मिळवता येते का हे पाहण्यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मग्न होते.

सरकारी गाड्यांचा ताफा

संसदेत त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह शेकडो संसदपटू उपस्थित होते. अकरा वाजून दोन मिनिटांनी संसदेचं कामकाज तहकूब झालं. यानंतर पंतप्रधान वाजपेयी आणि सोनिया गांधी आपापल्या गाडीतून बसून निघून गेले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संसदेवर हल्ला झाला तेव्हा मोठे नेते उपस्थित होते.

आपापल्या नेत्यांना घेण्यासाठी गेटच्या बाहेर गाड्यांची रीघ लागली होती. उपराष्ट्रपती कृष्ण कांत यांच्या गाड्यांचा ताफा 12 क्रमांक गेटमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. गाडी गेटजवळ घेऊन येत सुरक्षारक्षक उपराष्ट्रपतींची वाट पाहत होते.

सदनातून बाहेर पडणारे नेते आणि पत्रकारांमध्ये कामकाजासंदर्भात अनौपचारिक बोलणं होत होतं.

अॅम्बॅसिडरमधून कट्टरवादी संसदेत घुसले

वरिष्ठ पत्रकार सुमीत अवस्थी त्यावेळी सदनाच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुराणा यांच्याशी बोलत होते.

अवस्थी यांनी बीबीसीशी बोलताना त्या प्रसंगाचं वर्णन केलं. 'काही सहकाऱ्यांसह मी केंद्रीय मंत्री मदनलाल खुराणा यांच्याकडून महिला आरक्षणासंदर्भात माहिती घेत होतो. विधेयक संसदेत मांडलं जाईल की नाही यावर आम्ही बोलत होतो. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला. तो आवाज बंदुकीच्या गोळीचा होता'.

साडेअकरा वाजत असतानाच उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक पांढऱ्या रंगाच्या अॅम्बॅसिडरची प्रतीक्षा करत होते. तेवढ्यात DL-3CJ-1527 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची अॅम्बॅसिडर वेगाने गेट क्रमांक 12च्या दिशेने निघाली. सरकारी गाड्या नेहमी ज्या वेगाने धावतात त्यापेक्षा या गाडीचा वेग जास्त होता.

गाडीचा वेग पाहून ड्युटीवर असणाऱ्या जगदीश प्रसाद यांनी हाती शस्त्रं न घेताच गाडीच्या दिशेने धाव घेतली.

संसदेत बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी

लोकशाहीचं मंदिर असं वर्णन होणाऱ्या संसदेत तेव्हा शस्त्रास्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात नसत. संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षकांना 'पार्लमेंट हाऊस वॉच' आणि 'वॉच स्टाफ' असं संबोधण्यात येत असे.

जगदीश यादव याच तुकडीचा भाग होते. आणि गाडीचा चक्रावून टाकणारा वेग पाहून ते त्या दिशेने धावले. त्यांना पाहून त्यांचे सहकारीही गाडी थांबवण्याच्या उद्देशाने धावले. या सगळ्या गोंधळात पांढऱ्या रंगाची अॅम्बॅसिडर उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या गाडीवर जाऊन आदळली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संसदेत त्यावेळी शस्त्रास्त्रंधारी सुरक्षारक्षक तैनात नसत.

उपराष्ट्रपतींच्या गाडीशी टक्कर होताच कट्टरवाद्यांनी अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. त्यांच्या हातात एके 47 आणि हँडग्रेनेड अशी हत्यारं होती.

गोळ्यांचा आवाज येताच विस्तीर्ण पसरलेल्या संसदेच्या परिसरातील लोक चक्रावून गेले. हा आवाज नक्की कसला याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं. जवळच्या गुरुद्वारामध्ये गोळीबार झाला असं काही लोकांना वाटलं तर काहींना हा फटाक्याचा आवाज वाटला.

पहिल्या गोळीचा आवाज आला अन्...

गोळीचा आवाज ऐकून कॅमेरामनपासून वॉच अँड वॉर्ड टीमची माणसं आवाजाच्या दिशेने रवाना झाले. हा आवाज नक्की कसला हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं.

'पहिल्या गोळीचा आवाज ऐकताच मी खुराणा यांना हा कसला आवाज आणि कुठून येतोय असं विचारलं.

ते म्हणाले, 'हा आवाज भयंकर आहे. संसदेसारख्या संवेदनशील परिसरात असा आवाज कसा? त्यावेळी वॉच अँड वॉर्ड तुकडीतील एक सुरक्षारक्षकाने हा आवाज म्हणजे पक्ष्यांना हाकलून लावण्यासाठी हवेत फायरिंग केलं जात असावं अशी शक्यता व्यक्त केली', असं अवस्थी यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संसद परिसरात उपस्थित संसदपटूंना सुरक्षित राखण्यात सुरक्षायंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ते पुढे म्हणाले, तितक्यातच राज्यसभा गेटमधून लष्करासारखी पँट आणि काळा टीशर्ट घातलेला एक मुलगा हातात मोठी बंदूक घेऊन हवेत अंदाधुंद गोळीबार करत गेट क्रमांक 1च्या दिशेने जाताना दिसला.

संसदेच्या दिशेने

संसदेवरच्या हल्ल्यावेळी तिथे अनेक पत्रकार उपस्थित होते. ओबी व्हॅनच्या मदतीने नेत्यांच्या मुलाखती घेण्यात ते व्यग्र होते.

2001मध्ये स्टार न्यूजसाठी काम करणारे मनोरंजन भारती संसदेतून वार्तांकन करत होते. संसदेत हल्ला झाला तेव्हा मी ओबी व्हॅनमधून लाइव्ह रिर्पोटिंग करत होतो. माझ्याबरोबर शिवराज सिंह चौहान आणि काँग्रेसचे आणखी एक असे 2 नेते होते. या दोघांना आत सोडण्यासाठी मारुती व्हॅनमध्ये बसून मी निघालो. त्यांना सोडून मी गेटमधून बाहेर पडू लागलो तेव्हा गोळीचा आवाज ऐकला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संसदेवर झालेल्या हल्ल्याने सुरक्षायंत्रणांवरील जबाबदारी वाढली आहे.

गोळीचा आवाज ऐकताच मी बाहेरच्या दिशेने धावत निघालो. माझ्या पाठोपाठ मुलायमसिंह यादव यांचं ब्लॅक कॅट कमांडो सुरक्षारक्षकांचं पथक होतं.

त्यांना मी म्हणालो, 'मी लाइव्ह रिर्पोटिंग करतो आहे आणि संसदेची इमारत माझ्यामागे आहे. मागून कोणी कट्टरवादी येताना दिसले तर मला तात्काळ सांगा. त्यांनी ठीक आहे म्हणून सांगितलं, पण गोळ्यांचा आवाज वाढतच गेला. गोळ्यांच्या फैरी सतत झडत होत्या.

साडेअकरा वाजता आलेला आवाज

संसद परिसरात कट्टरवाद्यांच्या हातातल्या एके47 मधून निघणाऱ्या गोळ्यांच्या आवाजाने नेते मंडळींसह उपस्थित सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत झाले. संसद परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण होतं. नक्की काय घडलंय हे कुणालाच समजत नव्हतं.

प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काय घडलं असू शकतं याचा अंदाज बांधत होता. त्यावेळी सदनात केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. मात्र काय घडतंय याबाबत कोणालाही पक्कं काही ठाऊक नव्हतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सोळा वर्षांपूर्वी 13 डिसेंबरलाच संसदेवर हल्ला झाला होता.

गेट क्रमांक एकच्या बाहेर तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुराणा यांच्याशी बातचीत करणाऱ्या सुमीत अवस्थी यांनी कटू आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, 'मदनलाल खुराणा यांच्या सुरक्षारक्षकांना नक्की काय होतंय हे विचारायला सांगितलं. सुरुवातीला मला तो मुलगा एखाद्या नेत्याचा बॉडीगार्ड वाटला.

खुराणासाहेब मागे वळून परिस्थितीचा अंदाज घेणार तोपर्यंत वॉच अँड वॉर्ड कर्मचाऱ्यांनी त्यांना मागे ओढलं. ते त्यांच्या गाडीच्या दरवाज्यावर हात ठेऊन माझ्याशी बोलत होते.

अचानक मागे ओढण्यात आल्याने ते जमिनीवर पडले. त्यांच्या सुरक्षारक्षकाने मलाही मागे खेचलं. गोळ्यांच्या फैरी झडत आहेत. खाली वाका, नाहीतर गोळी लागेल असं त्यांनी ओरडून सांगितलं.

कसं मारलं पहिल्या कट्टरवाद्याला

संसद परिसरात गोळीचा आवाज ऐकून खळबळ उडाली. त्यावेळच्या परिस्थितीबद्दल मनोरंजन भारती यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, 'संसदेत तोपर्यंत शस्त्रास्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात नसत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संसदेच्या परिसरात गोळ्यांच्या आवाजाने खळबळ उडाली.

संसदेच्या परिसरात सीआरपीएफ जवानांची तुकडी असायची. मात्र गोळीबाराचा आवाज येत होता तिथे पोहोचायला या तुकडीला अर्धा किलोमीटर ओलांडून जावं लागलं असतं. गोळ्यांचा आवाज येऊ लागल्यावर सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक आणि आणि कट्टरवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सुरक्षारक्षक मातबर सिंह यांनी जीवाची पर्वा न करता अकरा क्रमांकाचं गेट बंद केलं. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतंही शस्त्रं नव्हतं.

गेट क्रमांक एक 1वरचा थरार

कट्टरवाद्याने मातबर सिंह आपल्या दिशेने येत असल्याचं पाहताच त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या. मात्र अशाही परिस्थितीत मातबर यांनी प्रसंगावधान राखत वॉकीटॉकीवरून अलर्टचा इशारा दिला.

त्यांच्या सूचनेमुळे संसदेचे सगळे दरवाजे तात्काळ बंद करण्यात आले. कट्टरवाद्यांनी संसदेच्या गेट क्रमांक एकच्या दिशेने मोर्चा वळवला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी हल्ल्याचा थरार अनुभवला.

गोळ्यांच्या आवाजानंतर गेट क्रमांक एकच्या सुरक्षारक्षकांनी तिथे असणाऱ्या लोकांना खोल्यांमध्ये बंद केलं आणि कट्टरवाद्यांचा सामना केला.

काळजीचं कारण

पत्रकार सुमीत अवस्थी यांनी त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन केलं. मंत्री मदनलाल खुराणा यांच्यासह मलाही गेट क्रमांक एकच्या इथे बंद खोलीत नेण्यात आलं. लालकृष्ण अडवाणी यांना जाताना पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. नक्की काय झालं असं मी त्यांना विचारलं पण काहीही उत्तर न देता ते निघून गेले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहताना.

त्यानंतर नेत्यांना सेंट्रल हॉल आणि अन्य ठिकाणी हलवण्यात करण्यात आलं. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी हे सुरक्षित आहात याची मला काळजी वाटली. कारण अडवाणी सुरक्षित असल्याचं मी पाहिलं होतं. कट्टरवाद्यांवर होणारी कारवाई अडवाणी यांच्या नेतृत्वामध्येच सुरू असल्याचं मला समजलं.

नेते सुरक्षित

संसदेवर हल्ला झाल्याचं वृत्त एव्हाना टीव्हीच्या माध्यमातून देशभर पसरलं होतं. मात्र संसदपटू सुरक्षित आहेत की नाहीत याविषयी ठोस काही कळत नव्हतं. संसद परिसरात असलेल्या पत्रकारांना केंद्रीय मंत्र्यांसंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

यादरम्यान कट्टरवाद्यांनी गेट क्रमांक एकमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडत एकाला ठार केलं. या गडबडीत कट्टरवाद्याच्या शरीराला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला.

पत्रकारांवरही हल्ला

अवस्थी यांनी सांगितलं, 'आम्ही ज्या खोलीत होतो तिथे आणखी तीस-चाळीसजण होते. जॅमर असल्यानं मोबाइलवरून संपर्क बंद झाला. संसद परिसरात असूनही आमचा जगाशी संपर्क तुटला. दोन-अडीच तासानंतर जोरदार धमाक्याचा आवाज आला. हा आवाज इतका मोठा होती की संसद भवनाचा एखादा भाग कोसळल्यासारखं वाटलं. थोड्या वेळानंतर कळलं की, कट्टरवाद्यानं स्वत:ला गेटक्रमांक एकजवळच उडवून दिलं.'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हल्ल्यानंतर संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली.

संसद परिसरात घडलेला हा संघर्ष चित्रित करणारे कॅमेरामन अनमित्रा चकलादार यांनी त्या कटू आठवणींना उजाळा दिला. गेट क्रमांक एकवरून कट्टरवाद्याला मारण्यात आलं. त्याला मारल्यानंतर दुसऱ्या एका कट्टरवाद्याने पत्रकारांवर गोळीबार करायला सुरुवात केली.

यातली एक गोळी एएनआय वृत्तसंस्थेचे कॅमेरामन विक्रम बिष्ट यांच्या मानेला लागली. दुसरी गोळी कॅमेऱ्याला लागली. आमच्या इथे एक ग्रेनेड आदळलं. पण सुदैवानं ते फुटलं नाही.

सुरक्षायंत्रणांची फौज

हल्ल्यात जखमी झालेल्या एएनआयच्या कॅमेरामनला एम्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्यावेळानंतर त्यांचा मृत्यू झाला. हे सगळं एकीकडे सुरू असताना कट्टरवाद्यांनी गेटक्रमांक नऊच्या दिशेने मोर्चा वळवला.

सुरक्षारक्षकांनी तीन कट्टरवाद्यांना ठार केलं. पाचव्या कट्टरवाद्याने पाचव्या क्रमांकाचं गेट गाठून संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही मारण्यात सुरक्षायंत्रणांना यश आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा देशातील सर्वोच्च वास्तू असलेल्या संसदेवरील हल्ल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले.

संसदेचे सुरक्षारक्षक आणि कट्टरवादी यांच्यात सकाळी साडेअकरा वाजता चकमकीला सुरुवात झाली. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही लढाई सुरूच होती. चार ते पाच या वेळेत सुरक्षा यंत्रणांची मोठी फौज संसद परिसरात दाखल झाली आणि त्यांनी परिसराची छाननी करायला सुरुवात केली.

या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच सुरक्षारक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एक महिला सुरक्षारक्षक, राज्यसभा सचिवालयाचे दोन कर्मचारी आणि एक माळी यांचं निधन झालं.

अफजलला फाशी

संसदेवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी चार कट्टरवाद्यांना अटक करण्यात आली. दिल्लीतल्या पोटा न्यायालयाने 16 डिसेंबर 2002 रोजी मोहम्मद अफजल, शौकत हुसैन, अफसान आणि सय्यद अब्दुल रहमान गिलानी यांना दोषी ठरवण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संसदेवरील हल्ल्याप्रकरण अफजल गुरुला फाशी देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापक सय्यद अब्दुल रहमान गिलानी आणि नवजोत संधू उर्फ अफसाँ गुरू यांना निर्दोष ठरवलं तर मोहम्मद अफजलची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. शौकत हुसैनची फाशीची शिक्षा कमी करून 10 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

यानंतर 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरुला दिल्लीतील तिहार तुरुंगात सकाळी फासावर लटकवण्यात आलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)