रोहित अद्भुत शर्मा : विश्वविक्रमी तिसरं द्विशतक

रोहित शर्मा Image copyright Twitter/BCCI

मुंबईकर रोहित शर्माने तिसऱ्या द्विशतकासह क्रिकेटमधल्या एका अद्भुत विक्रमाला गवसणी घातली.

श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली एकदिवसीय सामन्यात रोहितने 153 चेंडूत 13 चौकार आणि 12 षटकारांच्या आतषबाजीसह नाबाद 208 धावांची विक्रमी खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकी खेळी करणारा रोहित पहिलावहिला खेळाडू ठरला आहे. योगायोग म्हणजे लग्नाच्या वाढदिवशी विश्वविक्रमी खेळी साकारत पत्नी रितिकासह देशवासीयांना रोहितनं अनोखी भेट दिली आहे.

डावाच्या शेवटच्या षटकात, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेत रोहितने द्विशतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे रोहितने 115 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. यानंतर चौकार, षटकारांची लयलूट करत दीडशतक अवघ्या 18 चेंडूत गाठलं.

सुरंगा लकमलच्या एका षटकात 26 धावा चोपून काढण्यात आल्या. 47व्या षटकाच्या सुरुवातीला रोहित 137 चेंडूत 161 धावांवर होता. षटकाअखेरीस तो 177 धावांवर होता. दोन षटकांत म्हणजे 12 चेंडूत रोहितने 25 धावा कुटून द्विशतक पूर्ण केलं. दुसरं शतक रोहितनं अवघ्या 35 चेंडूत गाठलं.

Image copyright Getty Images

रोहितच्या या विक्रमी खेळीच्या बळावर भारतीय संघाने 50 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 392 धावांचा डोंगर उभारला. चार धावांवर असताना रोहितला श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने जीवदान दिलं होतं.

याआधी रोहितने श्रीलंकेविरुद्ध 13 नोव्हेंबर 2014 रोजी 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांसह 264 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. एकदिवसीय क्रिकेटमधली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 नोव्हेंबर 2013 रोजी 158 चेंडूत 12 चौकार आणि 16 षटकारांसह 209 धावांची खेळी केली होती.

दमदार पल्लेदार खेळींसाठी प्रसिद्ध रोहितच्या 16 एकदिवसीय शतकांपैकी तीन द्विशतकांचा तर दोन दीडशतकी खेळी आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकवीर

धावा खेळाडू विरुद्ध शहर दिनांक
200* सचिन तेंडुलकर दक्षिण आफ्रिका ग्वाल्हेर 24 फेब्रुवारी 2010
219 वीरेंद्र सेहवाग वेस्ट इंडिज इंदूर 8 डिसेंबर 2011
209 रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया बेंगळुरू 2 नोव्हेंबर 2013
264 रोहित शर्मा श्रीलंका कोलकाता 13 नोव्हेंबर 2014
215 ख्रिस गेल झिम्बाब्वे कॅनबेरा 24 फेब्रुवारी 2015
237* मार्टिन गप्तील वेस्ट इंडिज वेलिंग्टन 22 मार्च 2015
208* रोहित शर्मा श्रीलंका मोहाली 13 डिसेंबर 2017

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)