तिनं नवऱ्याला मारलं आणि प्रियकराचा चेहरा जाळला!

सुधाकर रेड्डी आणि स्वाती
प्रतिमा मथळा सुधाकर रेड्डी आणि स्वाती

तिनं नवऱ्याला मारलं आणि त्याचा मृतदेह जाळून टाकला. त्याच वेळी प्रियकराचा चेहरा जाळला, त्याला नवरा म्हणून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. पुढे त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करायची, आणि मग मेलेल्या नवऱ्याची संपत्ती आणि नवीन नवरा, असा संसार थाटायचा तिचा बेत होता.

सगळं तिनं ठरवल्याप्रमाणे सुरू होतं. पण तसं घडायचं नव्हतं.

तेलंगणाच्या दक्षिण भागात असलेल्या नागरकुर्नुल जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत.

प्रियकराच्या मदतीनं रचलं नाट्य

स्वाती रेड्डी या महिलेच्या या कृत्याची संगती लावणं इतकं कठीण की पोलिसांनाही वेळ लागलाच. पण अखेर स्वातीनंच सत्य समोर आणलं.

नागरकुर्नुलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांननुसार स्वातीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं हा कट रचला होता.

प्रतिमा मथळा राजेश

नागरकुर्नुल जिल्ह्यातल्या बंदापल्ली गावात स्वाती आणि सुधाकर रेड्डी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुलंही होती.

पण सुधाकर यांच्या कामाचा व्याप वाढला आणि स्वातीला त्यांचा वेळ मिळेनासा झाला.

नवऱ्याचा वेळ मिळत नव्हता...

स्वातीच्या आयुष्यात आलेलं हे रिकामपण भरून काढलं ते राजेश या फिजिओथेरपीस्टने.

स्वाती आणि राजेश यांचं प्रेमप्रकरण दोन वर्षांपासून सुरू होतं. हे नातं घट्ट करण्यासाठी त्यांनी लग्न करायचं ठरवलं.

त्यासाठी स्वातीनं सुधाकर यांचा काटा काढायची योजना आखली. राजेशचीही साथ होतीच.

लग्न झाल्यावर दोन्ही मुलांना सांभाळण्याचं आश्वासनही राजेशनं दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून स्वातीनं सुधाकर यांना संपवण्याची योजना आखली.

पण तसं घडलं नाही!

26 नोव्हेंबरच्या रात्री सुधाकर रेड्डी झोपेतच बिछान्यातून खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला.

प्रतिमा मथळा पोलिसांनी स्वातीला अटक केली.

स्वातीनं सुधाकर यांच्या भावाला, अरविंद यांना मदतीसाठी बोलावलं. ते आलेही. पण ती मध्यरात्रीची वेळ असल्यानं सुधाकर यांना सकाळी हॉस्पिटलला नेण्याचं ठरवलं.

दरम्यान, अरविंदला माघारी पाठवून स्वातीनं प्रियकर, राजेशला बोलावून घेतलं. राजेशनं सुधाकर यांना गुंगीचं औषध दिलं. आणि मग लोखंडी सळईचे वार करून ठार मारलं.

त्यांचा मृतदेह गाडीतून फथेपूर मैसम्माच्या जंगलात नेऊन जाळला.

राजेश हाच सुधाकर असल्याचं जगाला भासवण्याचं स्वातीनं ठरवलं होतं. पण त्यासाठी तिनं राजेशला त्याचा चेहरा पेट्रोल टाकून जाळून घेण्यास सांगितलं.

विद्रुप झालेल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून, सुधाकरचाच चेहरा बदलला आहे, असं दाखवण्याचं तिच्या डोक्यात होतं.

म्हणून स्वातीनं राजेशाला सुधाकरच्याच नावानं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

प्रतिमा मथळा राजेशवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मग तिनं सासरच्या मंडळीला आणि नातेवाईकांना सुधाकर यांच्यावर अॅसिड हल्ला झाल्याचं सांगितलं. सुधाकर यांच्या भावानं पोलिसात तशी तक्रारही केली.

आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली.

ICU मध्ये दाखल करण्यात आलेली व्यक्ती ही सुधाकरच असल्याचं स्वातीनं नातेवाईकांना सांगितलं. घरच्यांनी हॉस्पिटलचा पाच लाखांचा खर्चही केला.

असा कसा माणूस बदलणार?

या सगळ्या प्रकाराला वळण मिळालं ते 9 डिसेंबरला. त्या दिवशी, सुधाकर यांचा भाऊ त्यांना पाहण्यासाठी गेला होता.

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेला आपला भाऊ नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसांकडे तत्काळ दुसरी तक्रार नोंदवली.

प्रतिमा मथळा पोलिसांनी अखेर छडा लावला.

त्यामुळे पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली. त्यांनी राजेश यांच्या हातांचे ठसे तपासले, ते सुधाकर रेड्डी यांच्याशी जुळले नाहीत. आणि त्यातून सत्याचा उलगडा झाला.

स्वाती आणि राजेश यांनी गुन्ह्याची कबुली दिली. स्वातीला पोलिसांनी अटक केली आहे. तर राजेशवर अजून उपचार सुरू आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)