आसाराम बापू प्रकरणातला साक्षीदार सचिव दोन वर्षांपासून बेपत्ता?

आसाराम, नारायणसाई, पोलीस, गुन्हे, धार्मिक Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे प्रवचनात बोलताना आसाराम बापू.

तुरुंगवासात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू असुमल सिरुमलाणी उर्फ आसारामचे खाजगी सचिव राहुल सचान दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. मात्र याप्रकरणी तपास संथ गतीने सुरू आहे.

आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर जोधपूर, अहमदाबाद आणि सुरतमधल्या न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या खटल्यांमध्ये राहुल सगळ्यांत महत्त्वाचे साक्षीदार आहेत.

नोव्हेंबर 2015 मध्ये ते बेपत्ता झाले, तेव्हा ते 41 वर्षांचे होते. 2003 ते 2009 या कालावधीत आसाराम यांचे खासगी सचिव म्हणून राहुल काम पाहत होते.

फेब्रुवारी 2015 साली जोधपूर न्यायालयात साक्ष दिल्यानंतर राहुल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात ते बचावले होते. या हल्ल्याच्या नऊ महिन्यानंतर एका रात्री लखनौच्या केसर बाग बस स्टँडवरून ते गायब झाले.

आसाराम आणि नारायण साई यांच्याशी निगडित प्रकरणात अमृत प्रजापती (मे 2014), अखिल गुप्ता (जानेवारी 2015) आणि कृपाल सिंह (जुलाई 2015) यांची हत्या झाली आहे. अन्य सहा साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.

हत्येची शंका

अलाहाबाद उच्च न्यायालयात राहुलच्या बेपत्ता होण्यासंदर्भातला खटला बेनेट कॅस्टेलिनो हे वकील सध्या लढत आहेत.

न्यूझीलंड आणि भारतात काम करणाऱ्या बेनेट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आसाराम बापूचा खाजगी सचिव असल्यामुळे राहुलना आसाराम बापूबद्दल सगळी माहिती होती. आसारामांच्या दिनचर्येचा बारीकसारीक तपशील त्यांना ठाऊक होता. तसंच आसाराम यांच्या आवडीनिवडी आणि आगामी वाटचालीबद्दल त्यांना संपूर्ण माहिती होती."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा बलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी आसाराम बापू यांना अटक करण्यात आली होती.

बेनेट सांगतात, "म्हणूनच जोधपूरसोबतच अहमदाबाद येथे सुरू असलेल्या सुनावणीसाठी ते सगळ्यांत महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहेच."

बेपत्ता होण्याआधी त्यांनी सुरक्षेसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात त्यांनी जीवाला धोका आहे हे स्पष्ट केलं होतं. मरण्याच्या आधी सगळ्या न्यायालयात आपली साक्ष पूर्ण करण्याची इच्छा आहे असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.

पोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास नव्हता

ऑगस्ट 2015 साली बेनेट यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुलचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. हे प्रतिज्ञापत्र या खटल्यात अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

प्रतिज्ञापत्रात राहुल म्हणतात, "माझं आयुष्य रोज माझ्या हातून निसटतं आहे. मी न्यायाच्या बाजूने उभा राहिलो जेणेकरून यापुढे स्त्रियांवर आणि मुलींवर अत्याचार होऊ नये. ज्या गतीनं साक्षीदारांचे मृत्यू होत आहेत ते पाहता माझा मृत्यूदेखील निश्चित आहे."

यानंतर न्यायालयानं राहुलला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा आसारामप्रकरणी साक्ष दिलेल्या साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.

बेनेट सांगतात, "आधी राहुलना फक्त आठ तासांसाठी उत्तर प्रदेश सरकारने एक सुरक्षारक्षक दिला होता. पण राहुलचा उत्तर प्रदेश पोलिसांवर भरवसा नव्हता कारण सुरक्षारक्षक सारखा फोनवर किंवा व्हॉट्सअपवर व्यग्र असायचा."

"जोधपूर न्यायालयात झालेल्या हल्ल्यामुळे राहुल इतका घाबरला होता की, तो रात्रभर जागा असायचा आणि सकाळी गार्ड आल्यावरच तो झोपत असे."

व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या राहुल यांचे कानपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबाशी सख्य नव्हते. कुटुंबीय लखनौच्या बालगंज परिसरात भाडेकरू म्हणून एका घरात राहत होते.

बेपत्ता होण्यासंदर्भात चौकशी संथ

राहुल बेपत्ता झाल्यावर त्यांची विचारपूस करायला कुटुंबीयांपैकी कोणीही पुढे आलं नाही. बेनेटव्यतिरिक्त एकाही मित्राने त्यांच्याबद्दल चौकशीदेखील केली नाही.

'न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय सुरक्षा बलाकडून सुरक्षा मिळण्यासंदर्भात आम्ही निवेदन तयार करत होतो. याच दरम्यान राहुल गायब झाले', असं बेनेट यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पोलीस आसाराम यांना अटक करून घेऊन जात असताना.

नोव्हेंबर 2015 मध्ये राहुल बेपत्ता झाल्यानंतर बेनेट यांनी याप्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) करावी अशी मागणी केली.

सीबीआयने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत अकरा महिन्यांनंतर ऑक्टोबर 2016 मध्ये अपहरणाचा खटला दाखल केला. परंतु राहल बेपत्ता होण्यासंदर्भात पुढे काहीही झालेलं नाही.

बीबीसीला दिलेल्या लिखित उत्तरात सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाळ यांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगितलं. राहुल सचान यांचे नातेवाईक, मित्र यांच्याशी सीबीआय बोलून चौकशी करत आहे. त्यांच्याविषयी माहिती देणाऱ्यांना आम्ही दोन लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.

मात्र सीबीआयच्या चौकशीवर बेनेट संतुष्ट नाही. सीबीआयला वाटतं की, ते सर्वसमावेशक पद्धतीने तपास करत आहेत. मात्र आसारामप्रकरणी अन्य साक्षीदारांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सीबीआयने सुरू देखील केलेली नाही.

पश्चातापाची भावना

साक्षीदारांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्तिक हलधरसारख्या आरोपींनी, राहुल सचान मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आसाराम बापू यांचे खाजगी सचिव राहुल सचान दोन वर्षांपासून बेपत्ता आहेत.

हलधरला 15 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली होती. लखनौमधल्या केसरबाग बसस्टँडमधून सुटणाऱ्या बसमधून राहुल बेपत्ता झाले होते.

त्या बसविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुलच्या फोनचा ठावठिकाणी उत्तर प्रदेशातच सापडला होता. मात्र याठिकाणी कोणतीही बस जात नाही.

'तोतरेपणे बोलणारे राहुल एकलकोंड्या स्वरूपाची व्यक्ती होती. जोधपूर हल्ल्यानंतर ते काही अंशी अपंग झाले होते. बेपत्ता होण्याच्या आधी काही दिवस ते खूप घाबरलेले असत. कायम कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्यांना वाटायचं. त्यांना भीती वाटायची पण त्याहीपेक्षा जास्त आसारामप्रकरणी आधी पुढाकार घेऊन बोललो नाही याचा त्यांना पश्चाताप वाटत होता', अशी आठवण बेनेट यांनी सांगितली.

महिलांच्या किंचाळण्याचा आवाज

आसारामच्या आश्रमातून अनेकदा महिलांच्या किंचाळण्याचा आवाज येत असे, असं राहुल यांनी बेनेट यांना सांगितलं होतं. हे काय सुरू आहे विचारल्यावर या महिलांना मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेलं जात आहे, असं सांगण्यात यायचं, अशी राहुल यांची माहिती होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आसाराम बापूंच्या आश्रमातून महिलांच्या किंचाळण्याचे आवाज येत असत असं राहुल सचान यांनी सांगितलं होतं.

आसारामविरुद्ध बोलण्यासाठी तयार असलेल्या जोधपूर आणि सुरतमधील पीडितांच्या व्यतिरिक्त अन्य कुटुंबीयांना राहुल ओळखत होते.

आसारामविरोधात आधी का बोललो नाही याची खंत राहुल यांना सातत्याने जाणवत असे. म्हणूनच जीवाला धोका असतानाही त्यांना न्यायालयात साक्षीदार म्हणून प्रक्रिया पूर्ण करायची होती. परंतु त्याआधीच ते बेपत्ता झाले.

बलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी आसारामला सप्टेंबर 2013 मध्ये तर नारायण साईला डिसेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून हे दोघेही तुरुंगात आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)