प्रेस रिव्ह्यू : कर्जमाफी देताना चूक झाली : मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली

देवेंद्र फडणवीस Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

"शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या भावनेतून 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'च्या अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली. पण या अमंलबजावणीत आमच्याकडून चुका झाल्या. काही चुकीच्या लाभार्थ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रं देण्यात आली," अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिल्याचं वृत्त 'लोकसत्ता'ने दिलं आहे.

पण ही कबुली देताना मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं, "त्याच वेळी पूर्वीच्या कर्जमाफीतील घोटाळे टाळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. आतापर्यंत २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यात आली आहे."

2. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी दिवंगत संसद सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अधिवेशन स्थगित होण्याची दाट शक्यता आहे.

सोमवारी गुजरात विधानसभांच्या निकालांच्या दिवशी खऱ्या अर्थानं पूर्ण वेळ अधिवेशनास सुरुवात होऊ शकेल. या अधिवेशनात नऊ प्रमुख विधेयकं सादर होणार आहेत. यात मुस्लिमांमध्ये तीन वेळा तलाक देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाचा समावेश आहे.

Image copyright Getty Images

तसंच दोन्ही सभागृहात अडकलेली २४ विधेयकं या अधिवेशनात पुन्हा चर्चेला येणार असल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'नं प्रसिद्ध केलं आहे.

'मुंबईतली मोनोरेल अव्यवहार्य'

मुंबईतल्या मोनोरेलचे दोन्ही टप्पे अव्यवहार्य आणि गैरसोयीचे असल्याचा निष्कर्ष लोकलेखा समितीनं काढला आहे. तसंच समितीनं मोनोरेलच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Image copyright Getty Images

'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदार अग्रवाल यांनी गुरुवारी लोकलेखा समितीचा 27वा अहवाल विधानसभेत सादर केला. हा अहवाल 'कॅग'ने 2012-13 मध्ये सादर केलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित अहवालाचा अभ्यास करून तयार करण्यात आला होता.

पारसी महिलांना अंत्यविधीची परवानगी

इतर धर्मांमध्ये लग्न होऊन गेलेल्या पारसी महिलांनाही आता पारसी समाजाच्या 'टॉवर ऑफ सायलेंस'मध्ये प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी एका पारसी ट्रस्टने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.

'द हिंदू' वृत्तानुसार, 'हिंदू स्पेशल मॅरेज अॅक्ट' अंतर्गत ही परवानगी दिल्याची माहिती सरन्यायाधिश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाकडे देण्यात आली.

गुलरुख गुप्ता या महिलेनं आपल्या अधिकारांसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणानंतर वलसाड पारसी अंजुमन ट्रस्टने ज्येष्ठ धर्मगुरूंशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Image copyright Getty Images

'शिवसेना वर्षभरात सत्तेतून बाहेर पडणार'

"येत्या वर्षभरात शिवसेना राज्याच्या सत्तेचा त्याग करेल आणि याचा निर्णय स्वतः उद्धव साहेब घेतील. यासाठी आपल्या सगळ्यांना तयार रहावं लागेल," असं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अहमदनगर येथील एका सभेत सांगितलं.

Image copyright TWITTER

राज्यातलं राजकीय वातावरण तापलं असून निवडणुका वर्षभरात कधीही होण्याची शक्यता असल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाल्याचं वृत्त NDTVनं प्रसिद्ध केलं आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)