निर्भया लढ्याची पाच वर्षं : तो भारतातला #metoo चळवळीचा क्षण होता का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : दिल्लीतल्या महिलांना सुरक्षित वाटतं का?

16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत एका 23 वर्षांच्या फिजिओथेरेपीच्या विद्यार्थिनीचा एका बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आला. आज पाच वर्षांनंतर भारत महिलांसाठी किती सुरक्षित आहे? बीबीसीच्या गीता पांडेय यांनी घेतलेला हा आढावा.

सर्वप्रथम जी घटना घडली होती, ती जाणून घेऊया - एक तरुणी आणि तिचा मित्र 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री नऊ वाजता दक्षिण दिल्लीत एका बसमध्ये बसले. त्या बसमध्ये पाच-सहा पुरुषच होते.

नंतर त्या युवतीवर ड्रायव्हर आणि पाच माणसांनी बसमध्येच सामूहिक बलात्कार केला. त्यांचा विरोध करणाऱ्या तिच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. आणि दोघांनाही नग्न करून, रक्ताच्या थारोळ्यात रसत्यावर फेकून देण्यात आलं.

रस्त्यावरच्या काही लोकांनी त्यांना बघितलं. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि त्यांना रुग्णालयात नेलं. तिनं मृत्यूशी पंधरा दिवस झुंज दिली. पण ती अयशस्वी ठरली.

तिचा मित्र वाचला पण मनावर आयुष्यभराचं ओरखडे घेऊन.

या घटनेच्या क्रौर्यानं संपूर्ण देश हादरला आणि प्रसारमाध्यमांनी तिचं नाव निर्भया (कोणतंही भय नसलेली), असं ठेवलं.

एक होती निर्भया

दहा वर्षांपूर्वीच मी अशाच एका निर्भयाला भेटले होते. त्यावेळी मी बीबीसी रेडिओसाठी भारतातील बलात्कारांवर एक फीचर करत होते.

एका सेवाभावी संस्थेतर्फे मध्य दिल्लीत स्त्रियांसाठी असलेल्या एका निवाऱ्यात मी तिला भेटले होते. ती गुजरातमधल्या एका गरीब कुटुंबातून आली होती.

ती एका भटक्या आदिवासी जमातीची भाग होती आणि आपल्या पतीसोबत आणि मुलाबरोबर राजधानीत आली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आज पाच वर्षांनंतर भारत महिलांसाठी किती सुरक्षित आहे?

काही महिने दिल्लीत रोजंदारीवर काम केल्यावर ती सहकुटुंब गुजरातला निघाली होती. पण रेल्वे स्थानकावर गोंधळात ती आपल्या कुटुंबापासून वेगळी झाली. कुटुंबातले बाकी सर्वजण ट्रेनमध्ये बसले पण ती मात्र मागे राहिली.

तिला प्लॅटफॉर्मवर रडताना बघून एका दयाळू माणसाने तिला मदत देऊ केली. त्यानं तिला सांगितलं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि तिला घरी घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं. तिच्याकडे अजिबात पैसा नसल्यानं ती त्याच्यासोबत गेली.

पुढच्या चार दिवसांत तिला ट्रकमधून नुसतं फिरवण्यात आलं. आणि ड्रायव्हर आणि तीन माणसांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

ती आता मरेल असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तिला रस्त्यापाशी फेकून दिलं. तिथे तिला काही लोकांनी पाहिलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

मी जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा तिला अनेक महिन्यांच्या उपचारानंतर घरी आणण्यात आलं होतं.

तिच्या शरीराची चाळणी झाली होती. तिच्या गुप्तांगांना इतक्या वाईट पद्धतीने दुखापत झाली होती की तिच्या पोटाला एक पाईप लावला होता आणि त्याला एक बॅग लावली होती.

Image copyright Getty Images

तिनं तिच्यावर स्तनांवर जळण्याच्या खुणा दाखवल्या. बलात्काऱ्यांनी तिला तिथं सिगारेटचे चटके दिले होते.

तिचं कुटुंब कुठे आहे याची तिला कल्पना नव्हती. सेवाभावी संस्थेच्या म्हणण्यानुसार त्यांना शोधण्याचे सगळे प्रयत्न फसले होते. मी तिच्याशी एका तासापेक्षा जास्त वेळ बोलले.

एखादा माणूस किती क्रूर असू शकतो, हा विचार करून मला प्रचंड संताप आला.

हजारो आंदोलकांची फौज

मी सुन्न झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मला अशी भीती वाटत होती. ही भीती मी माझ्या बहिणीला आणि बीबीसीमधल्या एका सहकाऱ्याला बोलून दाखवली. या दोघीही एक स्वतंत्र आणि निर्भीड स्त्रिया आहेत.

त्या मला कधीही भेटायला यायच्या तेव्हा घरी पोहोचल्यावर मी त्यांना न विसरता मेसेज करायला सांगायचे.

Image copyright Getty Images

सुरुवातीला त्या हे फार गांभीर्यानं घेत नव्हत्या. कधी त्या विसरल्या तर मी सकाळी फोन करून त्यांना रागवायचीही. कधीकधी त्या माझ्यावर हसायच्या आणि कधीकधी त्यांना याचा वैताग यायचा.

आणि मग 16 डिसेंबर 2012 ची घटना घडली.

भारतातील प्रसारमाध्यमांनी या निर्घृण घटनेचं तपशीलवार वार्तांकन केलं आणि घटनेची तीव्रता संपूर्ण देशाला कळली. पंधरा दिवस निर्भया मृत्यूशी झुंज देत होती. टीव्ही चॅनल आणि वर्तमानपत्रांनी जे झालं त्याचा लेखाजोखा मांडला.

पण सगळ्यांत मोठा बदल हा वृत्तीत बघायला मिळाला. लैंगिक अत्याचार आणि बलात्कार हे घरगुती चर्चेचे विषय झाले. हे नवल होतं, कारण आपल्या देशात सेक्स आणि सेक्सशी निगडीत गुन्हे निषिद्ध मानले जातात. अशा विषयांची चर्चा मोकळेपणाने होत नाही, कुणीच त्याबद्दल फारसं बोलताना दिसत नाही.

भारतात अशा विषयांवर संवाद होणं, हे स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सगळ्यांत पहिलं पाऊल आहे. पण हा संवाद फक्त सोशल मीडियावर होताना दिसत आहे. नोबेल विजेते व्ही. एस. नायपॉल यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आता हजारो आंदोलक झाले आहेत.

पुरेशी जागरुकता नाही

असं नाही की आधी स्त्रिया बोलत नव्हत्या. पितृसत्ताक पद्धतीत अडकलेल्या प्रत्येक विचार आणि संकलपनेशी गेल्या अनेक दशकांपासून खूप लोक लढत आहेत.

पण आता स्त्रियांबरोबर होणाऱ्या लहानसहान घटनांबाबत आता बोललं जातं, लिहिलं जातं. स्त्रियांची सुरक्षितता आणि आणि समानता, यावर बारकाईने लक्ष दिलं जातं.

गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अशा काही अभियांनाबद्दल लिहिलं आहे.

पण प्रश्न हा आहे की, त्यांना खरंच यश मिळालं आहे का?

नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या 2016 च्या आकडेवारीने एक निराशावादी चित्र उभं केलं आहे. स्त्रियांच्या बाबतीतल्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.

आपल्याकडे अनेक स्त्रियांचा हुंड्यासाठी खून होतो, हजारो स्त्रियांवर घरगुती हिंसाचार होतात, स्त्रीभृण हत्या होतात.

गेल्याच आठवड्यात आम्ही एका सहा वर्षांच्या मुलीच्या निर्घृण बलात्काराची आणि हत्येची बातमी दिली होती. त्याचबरोबर कॅन्सरने बचावलेल्या एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची आणि एका विमानात एका सहप्रवाशानं लैंगिक अत्याचार केलेल्या बॉलिवुडमधल्या एका कलाकाराचीदेखील बातमी दिली होती.

Image copyright Getty Images

नुकतंच हॉलिवुडमधल्या एका अभिनेत्रीनं एका मोठ्या दिग्दर्शकाकडून झालेल्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवला होता. मग आणखी महिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली आणि बघता बघता हे प्रकरण आणखी मोठं झालं.

असेच आरोप काही अन्य अनेक सेलिब्रिटींवर झाले.

जगभरातल्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या छळाविषयी सोशल मीडियावर जाहीर उलगडा केला. #MeToo ट्रेंड झाला आणि या जागतिक समस्येची तीव्रता कळली.

जे आज सोशल मीडियावर घडत आहे, ते दिल्लीनं, किंबहुना अख्ख्या भारतानं पाच वर्षांपूर्वी निर्भयाच्या दुर्दैवी घटनेनंतर अनुभवलं होतं.

पण हा लढा न थांबवणं, हे सर्वांत जास्त आश्वासक आहे आणि तिथेच स्त्रियांच्या भविष्याप्रती आशा जागृत होतात.

पुढच्या काही दिवसांत आम्ही अशा काही स्त्रियांच्या कथा आपल्यासमोर आणणार आहोत, ज्यांनी एक उत्तम, सुरक्षित आणि सर्वसमावेक्षक जगाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)