एक्झिट पोलमध्ये अचानक भाजपचे 5 टक्के कसे वाढले?

गुजरात निवडणूक Image copyright @NARENDRAMODI-GETTY IMAGES

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत भाजपला बहुमत मिळेल असं एक्झिट पोलमध्ये सांगितलं जात आहे.

गुजरातमध्ये गुरूवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली.

दोन्ही राज्यांत 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

गुजरात निवडणुकीबद्दल दोन आठवड्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

मग मधल्या काही दिवसांत असं काय झालं ज्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे?

या प्रश्नाचं उत्तर देताना या चाचण्या घेणाऱ्या संस्थेपैकी एक सीएसडीएस या संस्थेचे संचालक संजय कुमार सांगतात,

"दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या अगोदर ओपिनियन पोल घेण्यात आले तर एक्झिट पोल हे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या नंतर. या मधल्या दोन आठवड्यांच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या. भाजपनं खूपच आक्रमकपणे प्रचार केला."

"खासकरून पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रचार केला. याचा परिणाम होऊन लोकांचं मनपरिवर्तन झालं."

एक्झिट पोल किती विश्वासार्ह?

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीसंबंधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा दावा करण्यात आला आहे.

संस्था भाजप काँग्रेस+
ABP-CSDS 117 64
इंडिया टुडे-अॅक्सिस 99-113 68-82
टाइम्स नाऊ-VMR 109 70
न्यूज 24 - चाणक्य 135 47
रिपब्लिक 109 71
TV9 108 74
इंडिया न्यूज- CNX 110-120 65-75

पण एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेला दावा नेहमी खराच ठरतो असं नाही.

बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांसंबंधी आलेला निकाल हा त्यावेळी वर्तवण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळा होता.

बिहारमधल्या महाआघआडीनं भाजपचा पराभव करत सरकार बनवलं तर दिल्लीचा निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला.

दिल्लीत आम आदमी पक्षानं 70 पैकी 67 जागावर विजय मिळवला होता.

अशा अनेक प्रकरणांमध्ये एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहेत.

यावर संजय कुमार सांगतात, "असं नाही की बिहारमध्ये सर्व एक्झिट पोलचा अंदाज हा प्रत्यक्ष निकालाच्या अगदी उलट होता. काही एक्झिट पोलनं भाजप जिंकेल असा दावा केला होता, तर काहींनी महाआघाडी जिंकेल असा दावा केला होता.

जय-पराजयात किती जागांचं अंतर होतं, यावर मात्र जरूर चर्चा होऊ शकते."

ते पुढे सांगतात, "दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल बदलणारा ट्रेंड दाखवत होतं. एक मात्र आहे की, आम आदमी पक्षाचा एवढा मोठा विजय होईल, असं कुणीच म्हणत नव्हतं."

"जास्तीत जास्त त्यांना 50 ते 52 किंवा 38-40 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज लावण्यात आला होता."

कोणताही एक्झिट पोल हा शास्त्रीय पद्धतीनुसार होत असतो, असं संजय कुमार सांगतात.

कसा करतात एक्झिट पोल?

संजय कुमार सांगतात, "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅम्पल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो."

Image copyright GETTY IMAGES

"ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात. आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते जेवढी राज्यात असते."

"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो."

"या सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅम्पलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते."

पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.

यावर संजय कुमार सांगतात, "भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही".

"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते."

Image copyright AFP/GETTY IMAGES

ते आणखी सांगतात, "भारतच नाही तर कोणताही देश तिथं विविधता आणि पक्ष अधिक प्रमाणात आहेत, तिथं एक्झिट पोलचा अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यांच्यात तफावत असण्याची शक्यता जास्त असते."

भाजप खरंच सत्तेत येईल?

"गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपचं संख्याबळ वाढेल, असा इशारा सर्व एक्झिट पोल देत आहेत. हे संख्याबळ कितीनं वाढेल ही वेगळी गोष्ट आहे. पण, हे नक्की आहे की, 22 वर्षांनंतरही गुजरात जिंकण्यात काँग्रेस अपयशी ठरणार आहे."

आता 18 डिसेंबरची वाट तेवढी पाहायची. कारण या दिवशी दोन्ही विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

तुम्ही हे वाचलं का?

तुम्ही हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
वैदर्भीय खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू - रोडगे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)