अशोक खळे : सायकल चालवणारा 'घाटाचा राजा' घाटातच हरपला!

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : घाटाच्या राजासाठी खंडाळ्याचा घाट केला पार

'घाटाचा राजा' म्हणून ओळखले जाणारे सायकलपटू अशोक खळे यांचा ऐन सायकल चालवतानाच अपघाती मृत्यू झाला. रविवारी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी खंडाळा घाटात सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने...

फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरामध्ये 1800 फुट उंची गाठणारा खंडाळा घाट हा सायकलस्वारांसाठी सर्वांत आव्हानात्मक घाट मानला जातो. पण वयाच्या 62व्या वर्षीही केवळ 35 मिनिटांमध्ये हा घाट चढणारे जागतिक किर्तीचा सायकलपटू म्हणजे अशोक खळे.

'घाटाचा राजा' म्हणून ओळख असणारे खळे यांचा सायकलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कारकीर्द थक्क करणारी आहे. उत्कृष्ट सायकलपटूसोबतच आशियातले 'बेस्ट व्हील बाईंडर' म्हणूनही त्यांचा लौकिक होता.

पण 11 नोव्हेंबर 2017 रोजी सायकल चालवतानाच त्यांचं एका अपघातात निधन झालं.

त्यांना आदरांजली म्हणून रविवारी खंडाळा घाटात सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 70 सायकलस्वारांनी घाटात सायकलिंग करून 'शिंग्रोबा'च्या या लाडक्या सायकलपटूच्या स्मृतींना उजाळा दिला.

'मुंबई-पुणे' सायकल स्पर्धेमध्ये अशोक खळे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले पण स्पर्धा संपल्यावर आनंदाने मिठी मारणारे अशोक कॅप्टन हे देखिल आपल्या मित्राच्या आठवणी जागवायला आवर्जून उपस्थित होते.

देशोदेशी कामगिरी

23 मार्च 1955 रोजी जन्माला आलेले अशोक खळे यांनी सत्तरच्या दशकात स्पर्धात्मक सायकलिंगला सुरुवात केली.

महाराष्ट्र राज्य सायकलिंग चॅम्पियनशीप, सातारा-मालेगाव-सातारा, मेडन सायकल रेस, बरोडा बॉम्बे सायकल रेस, या सारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रम प्रस्थापित केले.

Image copyright BBC/ Ashok Khale Archive
प्रतिमा मथळा अशोक खळे

1979 साली हैदराबादमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला. म्हणूनच 1980 साली राज्य सरकारने त्यांचा शिवछत्रपती पुरस्कार हा खेळातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला.

राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवत असतानाच त्यांनी 1983 साली इटली येथे पार पडलेल्या '38व्या ग्रान प्री मिओ डेल्ला लिबरेझिन' आणि '80व्या जिरो डेल्ले रेगिओनि रोड बायसिकल रेस'मध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलं होतं.

१९८६ साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग चॅम्पियनशीपमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी होते.

मुंबई-पुणे सायकल स्पर्धा

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात खळे यांनी 'मुंबई-पुणे' सायकल रेस अक्षरश: गाजवली.

अशोक कॅप्टन, प्रमोद वाघमारे, बापू माल्कम, कमलाकर झेंडे, अभय जोशी, केरमन फ्रामना, यझदी खंबाटा, होमी भातेना, राजासाहेब अत्तार यांसारख्या पट्टीच्या सायकलपटूंसोबत स्पर्धा करत अनेक विक्रम प्रस्थापित केले.

या स्पर्धेत खंडाळा घाट प्रथम सर करणाऱ्या सायकलपटूला 'घाटाचा राजा' या पुरस्काराने सन्मानित केलं जायचं. त्यावेळी २२ मिनिटांत घाट चढण्याचा त्यांचा विक्रम होता.

अशोक खळे यांनी दोन वेळा हा पुरस्कार पटकावला.

दुर्दैवी अपघात

तारुण्यात एखादा खेळ गाजवणाऱ्यांना अनेकदा वयोमानानुसार तो खेळ सोडताना बघितलं जातं. पण अशोक खळे यांनी वयाचा कुठलाही ब्रेक त्यांच्या सायकलला लागू दिला नाही. ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सायकलिंग जगले.

प्रत्येक रविवारी खळे 'दादर-खंडाळा-दादर' हे अंतर सायकलने पार करायचे.

अलीकडेच ते गुजरातच्या साबरमती सायक्लोथॉन स्पर्धेची तयारी करत होते. सलग दोन वर्षे ही स्पर्धा त्यांनी जिंकली होती.

Image copyright BBC/Ashok Khale Archive
प्रतिमा मथळा अशोक खळे

5 नोव्हेंबर रोजीही ते खंडाळ्याला सायकलने जात असताना सायन-पनवेल हायवेदरम्यान एका वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते जखमी झाले.

अपघातानंतर वाशीच्या महापालिका रुग्णालयात तब्बल 12 तास खळेंना योग्य उपचारांविना ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना परळच्या KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, आणि मग बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले.

तब्बल 29 तासांनी खळे यांना नेमके उपचार मिळाले. पण तोवर उशीर झाला होता. 11 नोव्हेंबरच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

सायकलींबाबतची अनास्था

अलीकडच्या काळात सायकलिंगचं प्रमाण वाढले असलं तरी आपल्या देशात सायकलिंगला मानाचं स्थान नाही. पूर्वी सायकल स्पर्धांना होतं, तसं महत्त्वही आज नाही. मोठमोठाल्या गाड्यांमधून लोक आता रस्त्यांवरच्या सायकलस्वाराकडे अडचण म्हणून पाहतात.

परदेशात फिरायला गेल्यावर तिथल्या सायकल संस्कृती पाहून अचंबित होणारी मंडळी भारतात आल्यावर मात्र सायकलस्वारांकडे अतिशय तुच्छतेने पाहतात. दररोज अनेक अपघातांमध्ये, कुठलंही सीटबेल्ट किंवा हेल्मेटसारखं संरक्षण नसलेले सायकलस्वार मृत्यूमुखी पडतात. यात काही सामान्य भोळी भाबडी जनता, तर काही हौशी सायकलपटू असतात.

रूमा चॅटर्जी, अजित कांबळींसारख्या नामवंत सायकलस्वारांचं सायकलिंग करताना अपघाती निधन झालं. आणि आता अशोक खळेंचाही अंत तसाच दुर्दैवी झाला!

अशोक खळे यांच्या मृत्यूला अपघातानंतरची अनास्था अधिक कारणीभूत ठरली. राज्य आणि देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या सायकलपटूला जर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल तर इतर सायकलस्वारांनी या समाजाकडून आणि यंत्रणेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, हा मोठा प्रश्न आहे.

सायकलिंगबाबत आपल्याकडे कुठलेच नियम नाहीत. परदेशात इंधन बचतीचा उपाय आणि पर्यापरणपूरक वाहन म्हणून सायकलींसाठी आणि सायकलस्वारांसाठी विविध योजना राबवल्या जात असताना आपल्याकडे सर्वच बाबतीत आनंदीआनंद आहे!

जिथे सायकलस्वारांना वाहतुकीचा भागच मानलं जात नाही, तिथे सायकलींसाठी स्वतंत्र मार्गिका, पार्किंगची सोय, सायकल शेअरिंग या गोष्टी तर फारच पुढचा विचार आहेत.

काय व्हायला हवं?

पुण्यासारख्या शहरात एकेकाळी सायकलवर कर आकारला जायचा, सायकलींना नंबर प्लेट होत्या.

पण काळ बदलला, गाड्या आल्या आणि सायकल चालवणारी व्यक्ती आर्थिक आणि सामाजिक पातळीवर अगदी खालच्या थराला जाऊन पोहोचली. आज त्याच पुण्यात आशियातला सर्वांत जास्त दुचाकी असल्याचं मानलं जातं.

आज सायकलपटू आणि हौशी सायकलचालक या वाहनाप्रती झालेल्या उपेक्षेची तक्रार करतात. धूर ओकणाऱ्या गाड्या बाळगणाऱ्यांकडे समाज मोठ्या आदराने पाहतो. मात्र दररोज आपल्या कामासाठी किंवा दळणवळणासाठी सायकल वापरणाऱ्याला तुच्छतेची वागणूक दिली जाते, अशी त्यांची तक्रार असते.

हे चित्र बदलायला हवं.

खळे यांना सायकलस्वार म्हणून नाही, तरी निदान जखमी म्हणून जरी वेळेवर उपचार मिळाला असता, तरी आज आपण जागतिक किर्तीचा सायकलपटू गमावला नसता.

आज वेगाने आपल्या जगण्याची पकड घेतली आहे. रस्त्यावरील वाहनांचा वेग सायकलस्वारांपेक्षा नक्कीच अधिक आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सायकलस्वारांना दुर्लक्षित करावं. कारण जबाबदारीने वाहने चालवण्याला पर्याय असू शकत नाही. या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.

Image copyright BBC/Ashok Khale Archive

वाहन चालकांप्रमाणे सायकलस्वारांनीही जबाबदारीने सायकलींग करणं महत्त्वाचं आहे.

पहाटेच्या कमी प्रकाशात किंवा रात्रीच्या अंधारात हायवेवरून सायकल चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणं, इतर वाहनांना आपण दिसू, यासाठी लाईट्स वापरणं, रस्त्याच्या एका बाजूने सायकल चालवणं, या गोष्टी पाळणं गरजेचं आहे.

स्पर्धात्मक असो किंवा रोजच्या जगण्यातलं सायकलिंग, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे.

अधिकाधिक लोकं सायकलिंगकडे वळले तर चांगलंच होईल परंतु, जे सायकलिंग करत नाहीत त्यांनी निदान सायकलस्वारांना आदराची वागणूक दिली तर हेही नसे थोडके.

(सर्व छायाचित्रं अशोक खळे यांच्या खाजगी संग्रहालयातून घेण्यात आली आहेत.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)