मुंबई : साकीनाका आगीनंतर अवैध धंद्यांचा मुद्दा ऐरणीवर

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : मुंबईत आगीचं तांडव, 12 जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारी साकीनाका परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून केली जात आहे. पण, स्थानिक माजी नगरसेवकांनी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास साकीनाका परिसरातल्या खैराणी रोडवरच्या माखरिया कंपाऊंडमधल्या 'भानू फरसाण' या फॅक्टरीला आग लागली. या दुर्घटनेत फॅक्टरीमधला पोटमाळा आणि छतही कोसळलं.

अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नांनी आग लवकर नियंत्रणात आणली. तसंच घटनास्थळी अडकलेल्या १२ जणांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

"पहाटे 4.17 ला अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती देणारा फोन आला. 4.34 वाजता अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि 4 जंबो टँकर्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या," मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी बचावकार्याविषयी माहिती दिली.

"त्याआधी आग आणि धूर कोंडल्यानं १२ जण अडकले होते, परिणामी त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दुकानाचा पोटमाळा आणि कंपाऊंडचं छतही कोसळलं." अशी माहिती रहांगदळे यांनी दिली आहे.

"हे सर्वजण फॅक्टरीतले कामगार होते आणि तिथंच पोटमाळ्यात राहात होते," असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Image copyright Rahul Ransubhe
प्रतिमा मथळा अर्जुन गुप्ता यांना आपल्या भावाच्या मृत्यूविषयी राजावाडी हॉस्पिटलमध्ये कळलं

ओळख पटवणं कठीण

चेंबूरमध्ये राहात असलेल्या मिर्जा नसिम यांचा मुलगा आणि पुतण्या यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. मिर्जा नईम (वय १९) आणि मिर्जा वसिम (वय २१) अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही त्या फॅक्टीरीत काम करत होते.

उत्तर प्रदेशचे मिर्जा नसिम हे त्यांचा मुलगा आणि पुतण्यासह नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते.

"आमच्या गावात काही रोजगाराचं साधन नाही. त्यामुळे मी मुंबईत आलो. माझे काही नातेवाईकही फरसाण फॅक्टरीत काम करत होते. त्यामुळे मी माझ्या मुलालासुध्दा इथं कामाला बोलावून घेतलं. तो सुध्दा या फॅक्ट्रीत राहात होता." मिर्जा नसिम सांगत होते.

मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांचा चेहरा ओळखणं कठीण जात असल्यानं पीडितांच्या नातेवाईकांमध्ये अस्वस्थता होती. गेली ३ वर्ष फॅक्टरीत काम करणाऱ्या २० वर्षांच्या रामनरेश गुप्ताचाही या आगीत होरपळून मृत्यू झाला. त्याचा भाऊ अर्जुन गुप्ता यालाही आपल्या भावाला ओळखणं अवघड जात होतं.

'डोळ्यांसमोर होत्याचं नव्हतं झालं'

60 फूट X 30 फुटांच्या या कंपाउंडमध्ये प्रवेशद्वाराजवळच एक रहिवासी खोलीही होती. तुषार पवार आपला भाऊ तेजस आणि आईसह इथंच राहातो.

दुर्घटना घडली तेव्हा तेजस घरी नव्हता. तुषारनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मला आईनं जागं केलं. सगळीकडे धूर होता. मी लगेच आईसह बाहेर पडलो. आग लागली तेव्हा सगळे झोपेत होते. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी उशीर झाला. दरवाजाजवळ असलेली माणसं बाहेर निघाली, बाकीची आतच राहिल्याने आगीत अडकली."

Image copyright Rahul Ransubhe
प्रतिमा मथळा अग्निशमन दलाचे जवानांनी 12 मृतदेह बाहेर काढले

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली?

आग लागली तेव्हा या कंपाऊंडमध्ये अन्नपदार्थाच्या मोठ्या साठ्यासह फर्निचर आणि इतर वस्तू होत्या. रविवारचा दिवस असल्यानं काम बंद होतं, त्यामुळे विद्युत यंत्रणेतल्या बिघाडामुळेच ही आग लागली असल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे.

अग्निशमन दलानंही विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळेच आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून भानू फरसाण ही फॅक्टरी सुरू असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. पण त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याचा तपास सुरू आहे.

साकिनाक्यातील उद्योगधंद्यांवर प्रश्नचिन्ह!

मखारिया कंपाऊंडमधल्या या दुर्घटनेनं साकिनाक्याच्या गल्लीबोळांतील छोट्या उद्योगधंद्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

खैराणी रोड, श्रीनगर, यादवनगर या परिसरात अनेक उद्योगधंदे अवैधरित्या सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

"अनेकदा शासनाचे नियम पायदळी तुडवून इथं उद्योग चालतात. त्यात तांब्या-पितळेच्या भट्ट्यांचाही समावेश आहे," असं माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी सांगितलं

"माझ्या कार्यकाळातच आम्हाला अशा ३० ते ४० इमारती आढळून आल्या होत्या, त्यांविरुद्ध तक्रारीही केल्या. दोषींना दंड ठोठावला जातो, मात्र कोर्टातून त्यांची सुटका होते. ही व्यवस्थाच बदलण्याची गरज आहे." असं ईश्वर तायडे म्हणाले.

Image copyright Janhavee Moole
प्रतिमा मथळा आगीच्या तांडवानंतरचं दृश्यं

दोषींवर कारवाईचं पालिकेचं आश्वासन

दरम्यान, साकिनाका पोलीस मखारिया कंपाऊंडमधल्या दुर्घटनेचा तपास करत असल्याची माहिती डीसीपी एन. डी. रेड्डी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनीही या आगीच्या तपासाचा आणि १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

कंपांऊंडमधल्या पोटमाळ्याचं बांधकाम अनधिकृत असल्याचं तसंच आवश्यक परवानग्यांशिवाय कारखाना सुरू असल्याचं आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असं मेहता यांनी जाहीर केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)