गुजरात निवडणूक : मोदींनी काय गमावलं, राहुलनं काय कमावलं?

भाजप, काँग्रेस, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, गुजरात Image copyright AFP
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याने भाजपला गुजरातमध्ये तारलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता राखली. या निकालांचे अनेक अर्थ आहेत. विजय तर मिळाला, पण जागा घटल्या.

मोदींची जादू कायम

काही आठवड्यांपूर्वी गुजरातमध्ये चमत्कार घडू शकेल अशी चर्चा होती. एका ओपिनियन पोलनं भाजप आणि काँग्रेस यांच्यातील दरीही कमी झाल्याचं दाखवलं होतं. एवढंच नव्हे तर, विरोधी पक्ष भाजपची तिथली सत्ता उलथवून टाकेल, असा त्याचा सूर होता.

गुजरातमध्ये 24 वर्षांच्या हार्दिकनं काँग्रेसबरोबर हातमिळवणी करत मोदींना आव्हान दिलं. त्याच्या सभांना मोठी गर्दी होत होती. गुजरातच्या 6 कोटी जनतेत 14 टक्के एवढं प्रमाण असलेल्या त्याच्या समाजाची विशेष काळजी घेतली जावी अशी त्याची मागणी होती. हा समाज आजवर भाजपच्याच पाठीशी उभा राहिला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या कोशातून बाहेर आले. त्यांनी मोदींना चांगलं आव्हानही दिलं.

मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. पंतप्रधानांसह कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, भाजप खासदार, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यासह शेकडो कायर्कर्ते प्रचारात आणले.

मोदींनी कडव्या हिंदू राष्ट्रवादाची आर्थिक विकासाशी सांगड घातली. त्यांनी गुजराती अस्मिता जागवली. प्रतिस्पर्धी पक्षांकडून कशी अवहेलना झाली हा मुद्दा मोदींनी सातत्याने पुढे रेटला.

निवडणुकांचं चित्र पालटावं यासाठी काँग्रेसनं पाकिस्तानची मदत घेतल्याचा आरोप मोदींनी केला. या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा आरोप अजब आणि विचित्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

अक्षय्य ऊर्जेसह काम करण्यासाठी प्रसिद्ध मोदींनी या निवडणुकीसाठी थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 40 सभा घेतल्या. या निवडणुका मोदी आणि पर्यायानं भाजपसाठी किती महत्त्वाच्या होत्या हे सिद्ध करणारा हा आकडा आहे.

गोष्टी गांभीर्यानं घेतल्या नाहीत तर दगाफटका होऊ शकतो याची जाणीव भाजपला झाली होती.

"आम्ही सातत्यानं जिंकत होतो. मतदारांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दिला," असं भाजप प्रवक्ते नलीन कोहली यांनी सांगितलं

शेवटच्या आकड्यांनुसार भाजपनं या निवडणुकीत निसटता विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं. एकेका जागेसाठी त्यांना संघर्ष करावा लागला.

केंद्रात सत्ता असूनही आणि मोदींची मातृभूमी असूनही भाजपनं कशीबशी सत्ता राखली. पण तांत्रिकदृष्ट्या हा भाजपचा विजय आहे आणि पुन्हा एकदा मोंदीची जादू चालली.

काँग्रेसला संजीवनी

निवडणुका जिंकत वर्चस्व प्रस्थापित करण्याची नामी संधी राहुल गांधी यांनी दवडली असं अनेकांना वाटतं. मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी झेप घेतल्यानंतर गुजरातमध्ये भाजपच्या दोन नेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. मात्र त्यांची कामगिरी सर्वसाधारण राहिली.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा राहुल गांधींच्या नेतृत्त्वाने काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे.

प्रस्थापित सरकारविरोधातला नाराजीचा सूर, ग्रामीण भागातील असंतुष्टता, पटेल समाजानं केलेलं बंड, नोटबंदीमुळे झालेली ससेहोलपट, वस्तू आणि सेवा कराच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे घटलेलं उत्पन्न आणि व्यवसाय चालवण्यातल्या अडचणी हे गुजरात निवडणुकीच्या प्रचारातले महत्त्वाचे मुद्दे होते.

या सगळ्याआड भाजप पक्ष हतबल आहे हे स्पष्ट होतं.

राहुल गांधी यांनी आपल्याभोवतीचं अनिश्चिततेचं वलय बाजूला सारलं आणि प्रचाराची धुरा स्वत:कडे घेतली. हार्दिक पटेल यांच्याशी हातमिळवणी करण्याची चतुर खेळी राहुल यांनी केली.

मतदारांचा भावनिक कल ओळखण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी पक्षाचा पसारा वाढवला. मोदी आणि भाजपनं राहुल यांना गांभीर्यानं घेतलं नव्हतं. त्याच भाजपला राहुल यांनी काळजी करण्यास भाग पाडलं.

काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता. त्यांच्याकडे भाजपसारखी कार्यकर्त्यांची फळी नव्हती. तरीही 32 वर्षांनंतर काँग्रेसची गुजरातमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. साधारण: गुजरातची जनता काँग्रेसविरोधी कौल देते. मात्र 2012च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचं मताधिक्य सहा टक्क्यांनी वधारलं.

"2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत खराब प्रदर्शन झालेल्या काँग्रेस पक्षाला गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं संजीवनी मिळाली आहे, मात्र निवडणुकीत विजयासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल," असं राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी यांनी सांगितलं.

पुढच्या वर्षी चार महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यापैकी राजस्थान, छतीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. प्रस्थापित व्यवस्थेविराधातली मतं थोपवण्याची अवघड जबाबदारी भाजपवर आहे.

राहुल यांना या राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांना वाव द्यावा लागेल. योग्य नेत्यांशी चर्चा करून आघाडी करावी लागेल. गावपातळीवर कार्यकर्त्यांची फौज उभारावी लागेल. तरच आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला आव्हान देऊ शकेल.

विजयाचं पारडं आमच्या बाजूने झुकेल असं काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सांगितलं. मात्र ही खूप मोठी आणि अवघड लढाई असेल.

हिंदुत्व राहणारच

हिंदू मतं आकृष्ट करण्यासाठी राहुल गांधींनी निवडणुकीदरम्यान 25 मंदिरांना भेट दिली. अनेक वर्षं काँग्रेसची ओळख असलेल्या धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीशी हा दृष्टिकोन विरोधाभासी होता असं अनेकांना वाटतं.

राहुल गांधी ट्वीटरवर नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका करतात, मात्र दोन वर्षांतल्या 3000 ट्वीटमध्ये त्यांनी देशातल्या मुस्लिमांबद्दल केवळ एकदा उल्लेख केला आहे, असं हरतोष सिंग बाल यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलं आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा फायदा मिळाला आहे.

गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या 9 टक्के मुस्लीम मतदार आहेत. मात्र या निवडणुकीत मुस्लीम समाज नाममात्र ठरला कारण बहुतांशी पक्षांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

हिंदुत्वासंदर्भात राहुल गांधींनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. ते जर असंच वागत राहिले असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयी होईल असं हरतोश यांनी सांगितलं. भारतीय नागरिकांसमोर ते हिंदुत्वाची कास धरणार का?

हिंदू मतदारांपासून दूर न जाता हिंदू राष्ट्रवाद मोडून काढण्याची जबाबदारी राहुल यांना पेलवणार का?

आर्थिक सुधारणेची पुंगी

व्यवसायिक आणि व्यापार उदीम क्षेत्रातले मतदार घटल्यानं भाजप येत्या काळात आर्थिक सुधारणांसंदर्भात आस्ते कदम धोरण अवलंबण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी तर चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर यांचा फटका भाजपला बसला आहे. देशभरात एकच बाजार आणि बाजारभाव असावा यादृष्टीनं वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आहे.

मोदीप्रणित भाजपच्या केंद्रातल्या सरकारच्या उर्वरित कार्यकाळात कोणत्याही आर्थिक सुधारणा लागू होणे शक्य नाही. मतदारांचा खर्चाचा भार वाढण्याची शक्यता आहे. जीएसटीचे कठोर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर आहे. बेरोजगारी वाढते आहे. जागतिक स्तरावर तेलाचे भाव चढे असल्यानं महागाई भडकू शकते. यामुळे आर्थिक पायाभूत व्यवस्थेला धक्का लागण्याची शक्यता आहे. अशावेळी मोदी आपली सुधारणावादी ही प्रतिमा बाजूला सारण्याची शक्यता आहे.

2019 निवडणुका रंगतदार

भाजपसाठी गुजरातचा निकाल धोक्याची सूचना आहे. गुजरात भाजपचं माहेरघर आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये सलग सहावा विजय सुखावणारा असला तरी समाधानकारक नाही. कारण भाजपला दीडशे जागांची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात त्यांना शंभरी ओलांडता आलेली नाही.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा 2019 लोकसभा निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

दोन राज्यं जिंकणं हे भाजपसाठी पीछेहाट नाही, मात्र त्याचवेळी दोन्ही राज्यात पराभव काँग्रेससाठी पुनरागमन सुद्धा नाही.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला आव्हान देऊ शकणार नाही असं अनेकांनी वर्तवलं होतं. पण गुजरातमधल्या प्रदर्शनानं पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.

भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसला चालना मिळाली आहे. भाजप आणि सहयोगी पक्ष 19 राज्यात सत्तेवर आहे.

नवीन वर्षात काँग्रेस आणि भाजप हे मातब्बर पक्ष विविध निवडणुकांच्या निमित्तानं एकमेकांसमोर पुन्हा उभे ठाकणार आहेत.

राहुल आणि त्यांच्या पक्षानं डावपेचांमध्ये सुधारणा करून नवा दृष्टिकोन अवलंबल्यास या निवडणुका रंगतदार होऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी 2019च्या निवडणुकीत पक्षाला एकहाती विजय मिळवून देतील असा विश्वास अनेक देशवासियांना होता.

राष्ट्रीय राजकारणात सत्तासमीकरणांमध्ये बदल घडू शकतो असा शक्यतारुपी किरण तयार झाला आहे. यामुळे आगामी काळ रोमांचकारी असणार आहे, असं द प्रिंट न्यूजचे संपादक शेखर गुप्ता यांनी म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)