गुजरातचा नवा मुख्यमंत्री 'पटेल' असू शकतो : राजदीप सरदेसाई

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: राजदीप सरदेसाईंचं निवडणुकीचं विश्लेषण

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना गुजरात निवडणुकांनंतरच्या परिस्थितीचं सखोल विश्लेषण केलं. त्यांच्या मुलाखतीतला संपादित भाग इथे देत आहोत. संपूर्ण फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी स्क्रोल करा.


गुजरातच्या निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाला खरा. पण त्यासाठी त्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागले. पण या निमित्तानं प्रत्येक निवडणूक ही एकतर्फी होऊ शकत नाही, असा संदेशदेखील भाजपच्या गोटात गेला. आता कोणताही पक्ष मतदारांना गृहित धरू शकत नाही, असं मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केलं.

लोक आता सजग झाले आहेत, त्यामुळे फक्त विकासाच्या मॉडेलचा डंका वाजवून चालणार नाही. असंही राजदीप सरदेसाई यांनी बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्ह बोलतताना स्पष्ट केलं.

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी गुलशनकुमार वनकर यांनी राजदीप सरदेसाई यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाचकांच्या प्रश्नांचीही उत्तरं दिली.

निकालानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?

निवडणुकांचे निकाल पाहिल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की, 22 वर्षांनी भाजपला अटीतटीचा स्पर्धक मिळाला आहे. आतापर्यंत जितक्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला एकतर्फी विजय मिळाला आहे. पण 22 वर्षांत पहिल्यांदाच भाजपला काँग्रेसनं चांगलीच टक्कर दिली आहे.

भाजप 100 पर्यंत पोहोचणार नाही ही एक मोठी हेडलाईन आहे, पण त्याचवेळी भाजपने सहा वेळा तिथं सत्ता स्थापन केली, हीसुद्धा मोठी गोष्ट आहे.

Image copyright Getty Images

कारण सध्याच्या काळात एकाच पक्षाचं सहा वेळा सरकार स्थापन होणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे भाजपाचं सहाव्यांदा सरकार येणं, पण तरी शतक न गाठता येणं, या निवडणुकीतल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याचवेळी हे काँग्रेसचं कमबॅक आहे.

मग हे भाजपचं अपयश आहे की काँग्रेसचं यश आहे?

खरंतर दोन्ही आहे. आपण जर सहा महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला 80 जागा मिळतील असं सांगितलं असतं तर कोणाचा विश्वास बसला नसता, विशेषत: उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर जेव्हा भाजपची लाट होती तेव्हा अमित शाह म्हणाले होते की, हे मिशन 150 आहे.

तेव्हा लोकांना वाटलं की, हे खरंच शक्य आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसची मेहनत तर आहेच.

Image copyright Getty Images

पण सौराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे, तिथं कापसाचा भाव त्यांना मिळाला नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा राग आहे. या सगळ्याचा फटका नक्कीच भाजपाला बसला आहे. अहमदाबाद, सुरत, वडोदरा या भागात भाजपला नक्की यश मिळालं आहे पण जसं तुम्ही शहरापासून दूर सौराष्ट्राकडे जाता तिथे लोक प्रश्न विचारू लागले आहेत की, हे मोदी मॉडेल शहरापुरतं मर्यादित आहे आणि ते गावापर्यंत का गेलं नाही?

मग इथे काँग्रेस कमी पडलं का?

काँग्रेस पक्ष सध्या कमजोर झाला आहे. या संस्थात्मक दुबळेपणामुळे काँग्रेसनं काही ठिकाणी हवा तसा लढा दिला नाही म्हणून त्यांना अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल यांची मदत घ्यावी लागली.

शक्तीसिंग गोहिल, अर्जून मोढवाडिया, सिद्धार्थ पटेल, तुषार चौधरी या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या मोठमोठ्या नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसची संघटना अजूनही सक्षम नाही. ज्या जागांवर 2000हून कमी फरकांनी भाजप जिंकली अशा सोळा जागा आहेत. काँग्रेसच्या अशा 13 जागा आहेत.

जिथं अटीतटीचा सामना आहे तिथे भाजपनं जास्त ताकद लावली आहे. त्यामुळे काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये जिंकण्याची इर्षा आहे असं दिसतं. हीच इच्छाशक्ती अजून काँग्रेसमध्ये आलेली नाही. त्याचं नुकसान काँग्रेसला नक्कीच झालं आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींच्या नावाची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं?

नाही मला नाही वाटत. दिल्लीत इराणींच्या नावाची चर्चा आहे. पण त्या एक कणखर नेत्या आहेत. तुम्हांला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्याची गरज आहे.

Image copyright PTI

इराणींमध्ये अजून ते गुण आहेत असं मला वाटत नाही. कदाचित एखादा पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो. विजय रुपाणी हा अमित शहांचा माणूस आहे. त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळू शकते. पण पटेल नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

यामुळे राजकारण कसं बदलेल? हार्दिक पटेलची यावर काय प्रतिक्रिया असेल?

हार्दिक पटेलचा आदर्श बाळासाहेब ठाकरे आहे आणि तुम्हाला माहिती असेल की बाळासाहेब ठाकरेंची निवडणुकीपूर्वी हवा असायची पण निवडणुकीत त्यांना म्हणावं तस यश मिळायचं नाही. हार्दिक पटेलनं गर्दी खूप गोळा केली पण त्याचं रुपांतर मतात झालं नाही. त्यामुळे हार्दिक हा फॅक्टर होता पण त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला नाही. मला असं वाटतं की हार्दिक सारख्या नेत्याला संधी आहे कारण गुजरातमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. पण गुजरातचं राजकारण भाजप केंद्रीत होतं ती परिस्थिती बदलून आता भाजपाला पर्याय मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांना गृहित धरू नये. या निवडणुकीनं जे अहंकारी नेते होते त्यांना जमिनीवर आणलं आहे.

Image copyright FACEBOOK/NITINBHAIPATELBJP
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी आणि नितीन पटेल

भाजप 2019 पर्यंत विजयाची ही मालिका कायम ठेवू शकेल का?

एका राज्याचा परिणाम दुसऱ्या राज्यावर होऊ शकत नाही. उत्तर प्रदेशात भाजपला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं, पण त्याचवेळी पंतप्रधानांचं घरचं राज्य असलेल्या राज्यात त्यांना संघर्ष करावा लागला. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आघाडीचे उमेदवार आहेत. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करायची असेल तर अजूनही मोदींचं पारडं जड आहे. विशेषतः शहरी भागात त्यांचा प्रभाव चांगला आहे आणि त्याचा फायदा मोदींना नक्की मिळेल. पण त्याचवेळी ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो.

या निकालाचा महाराष्ट्राच्या निकालावर काय परिणाम होईल?

महाराष्ट्रातल्या निवडणूका अजून दूर आहेत. पण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा रोष होता तसा महाराष्ट्रात मराठा समाजाचा रोष आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाचं जे मॉडेल आहे ते काही लोकांपर्यंत सीमित राहू शकत नाही. आज युवकांना नोकऱ्या हव्या आहेत, शेतकऱ्यांना हमी भाव हवा आहे. त्यामुळे अशा प्रकारची आवाहनं प्रत्येक सरकारपुढे आहेत.

Image copyright SANJAY KANOJIA/Getty Images

राहुल गांधींसाठी या निकालाचं काय महत्त्व आहे?

काही लोकांनी मला सांगितलं की राहुल गांधी या निवडणुकीचे बाजीगर आहेत. पण शेवटी 'जो जीता वही सिकंदर' हे आहेच. भाजपाची सत्ता असलेलं हे 19वं राज्य आहे. त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच सिकंदर आहेत. पण राहुल गांधींनी मेहनत केली आहे. त्यामुळे आता तुम्ही त्यांना पप्पू म्हणू शकत नाही. काही लोक त्यांना बाजीगर म्हणतात. पण काँग्रेस अजूनही एक मोठा पक्ष आहे. पण राहुल गांधींना भरपूर मेहनत करावी लागणार आहे. काँग्रेसला एक सकारात्मक अजेंडा लोकांना द्यावा लागणार आहे

संपूर्ण मुलाखत इथे पाहू शकता -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)