प्रेस रिव्ह्यू - मोदींनी आता निवृत्त व्हावं : जिग्नेश मेवानी

जिग्नेश मेवानी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जिग्नेश मेवानी

गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम मतदारसंघातून निवडून आलेले दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सकाळने दिलेल्या बातमीनुसार, एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोतलताना मेवाणी म्हणाले, "मोदींनी आता संन्यास घेऊन हिमालयामध्ये जावं. वयाची सत्तरी गाठली, तरीसुद्धा मोदी स्वत:ला तरुण म्हणवून घेतात. मोदींनी जुनी भाषणं देण्यापेक्षा हिमालयामध्ये जाऊन आपली हाडं झिजवावीत."

आपण या वक्तव्याबाबत माफी मागणार का? या प्रश्नावर मेवाणी म्हणाले, "राहुल गांधींनी सांगितलं तरीसुद्धा आपण आपले विधान मागे घेणार नाही."

2. स्वतंत्र मराठवाड्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणांचा आधार

जलतत्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र राज्याचा पर्याय सुचवला होता. त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी ही मागणी अयोग्य ठरवत मराठवाडा स्वतंत्र करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही, असं म्हटलं आहे.

Image copyright Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

पण आता मराठवाड्याच्या मागणीसाठी काही ऐतिहासिक संदर्भ पुढे केले जात आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये 21 डिसेंबर 1955 रोजी केलेल्या भाषणात राज्याची रचना त्रिगट पद्धतीने करण्याची संकल्पना मांडली होती.

या बातमीनुसार, त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते की, अखंड संयुक्त महाराष्ट्र ही मागणी अयोग्य असून संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यासारख्या जिल्ह्यातील मागासलेल्या लोकांची प्रगती होऊ शकणार नाही.

औरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयामध्ये झालेल्या भाषणाला 62 वर्षं पूर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र अशी रचना करताना मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर ही राजधानीची ठिकाणं राहतील, असं डॉ. आंबेडकरांनी भाषणात म्हटलं होतं.

पूर्व महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि चांदा (चंद्रपूर) जिल्ह्यांचा समावेश होईल. तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातील पाच जिल्हे (तत्कालीन पाच जिल्हे) औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि नाशिक, डांग, अहमदनगर, पूर्व आणि पश्चिम खानदेश, आणि सोलापूर जिल्ह्यातला कर्नाटकला जोडलेला मराठी भाग याचा समावेश होईल.

बाकीचा भाग पश्चिम माहाराष्ट्रात जाईल, असं आंबेडकरांनी प्रतिपादन केलं होतं.

3. यशराजचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' या चित्रपटासोबतच 22 डिसेंबरला 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना सलमानच्या चित्रपटाच्या तुलनेत फारच कमी प्राइम टाइम शो मिळाल्याने वादाला तोंड फुटलं आहे.

'लोकसत्ता'ने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला आहे.

Image copyright Getty Images

"'टायगर जिंदा है' चित्रपटाला आपला विरोध नाही. पण यशराज फिल्म्स या निर्मिती संस्थेला आपला तीव्र विरोध आहे," असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्रात हिंदी चित्रपट निर्मात्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, आणि मराठी चित्रपटांसोबत स्क्रीन शेअर न करण्याचा त्यांचा डाव मनसे उधळून लावेल," असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.

दरम्यान चित्रपटगृहांच्या मालकांविरुद्ध मनसेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा संजय काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्वीट करून दिला आहे.

4. राज्यातील सर्व दुकाने राहणार 24 तास सुरू

महाराष्ट्र सरकारने 19 डिसेंबरपासून राज्यात 'महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017' लागू केला आहे. त्यानुसार राज्यातील दुकाने, रेस्तराँ, मॉल आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास सुरू ठेवता येतील.

Image copyright Getty Images/MLADEN ANTONOV

दिव्य मराठीने दिलेल्या बातमीनुसार, यापूर्वी राज्यात दुकाने आणि आस्थापना यांना आठवड्यातून किमान एक दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा लागायचा.

पण आता सर्व दुकानं, आस्थापना, मॉल आदी, वर्षातले 365 दिवस आणि तीन शिफ्टमध्ये 24 उघडे ठेवता येतील.

पण मद्यविक्री दुकानं, बार, पब, हु्क्का पार्लर, ऑर्केस्टा, थिएटर्स यांना वर्षातले 365 दिवस व्यवसाय चालू ठेवण्याची संमती मिळाली आहे. मात्र ते 24 तास सुरू नसतील.

नवीन अधिनियमनानुसार दुकानं सातही दिवस खुली राहणार असली तरी कामगारांना आठवड्याची सुट्टी देणं, या कायद्यान्वये बंधनकारक राहणार आहे. तसंच रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्या संस्थेचीच असणार आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा गणपतराव देशमुख

5. वयाच्या 91व्या वर्षी एसटीने प्रवास करणारा आमदार

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांचा.

देशमुख वयाच्या 91व्या वर्षीही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करतात, असं या व्हायरल फोटोत म्हटलं आहे. या संदर्भाची बातमी एबीपी माझाने दिली आहे.

गणपतराव देशमुख अधिवेशनासाठी ट्रेनने जातात. मात्र आमदार निवास ते विधानभवन हा प्रवास ते स्वत:च्या गाडीने न करता त्यासाठी एसटी किंवा सरकारी वाहनाने ते तेथील प्रवास करतात.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)