कधी मुली मुलांच्या मागे लागतात का?

पाठलाग Image copyright Getty Images

"पोलीस एका महिलेविरुद्ध स्टॉकिंगचा (पाठलाग आणि छळवणूक) खटला कसा दाखल करू शकतात? हे शक्यच नाही. हे मला मान्य नाही!"

एका महिलेवर स्टॉकिंगचा खटला दाखल करून तिला अटक करणाऱ्या पोलिसांना दिल्ली उच्च न्यायालयानं हे प्रश्न केले. महिला वकील दीपा आर्या यांचा आरोप आहे की दिल्ली पोलिसांनी त्यांना त्यांच्या घराचं दार तोडून, घरातून बाहेर खेचलं.

पोलिसांनी मालमत्तेच्या एका प्रकरणात ही कारवाई केली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार उच्च न्यायालयानं दिल्ली सरकार आणि गृह मंत्रालयानं या प्रकरणात कारवाई करत पाच जानेवारीला होणाऱ्या सुनावणीच्या आधी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

पण महिला पाठलाग करतात का?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सगळ्यात आधी पाठलाग आणि छळवणूक प्रकरणांमध्ये कायदा काय सांगतो, ते पाहूया.

भारतीय दंड संहितेच्या कलम 354D नुसार, जर एखाद्या महिलेने कोणत्याही पुरुषाला स्पष्टपणे आपली असहमती दाखवली असेल, तरीही तो पुरुष तिचा पाठलाग करत असेल, किंवा तिला अडचण होईल, आणि त्यामुळे मानसिक छळ होईल, असं वागेल, तर त्याला गुन्हेगार मानलं जाईल.

Image copyright Getty Images

आणि हेच सगळं जर एखादा पुरुष इंटरनेट किंवा ईमेल किंवा फोनचा वापर करून करत असेल तरी त्याला छळवणूक मानलं जाईल. त्यात दोषी आढळलेल्या पुरुषाला पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

2012 मध्ये दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर, Criminal Amendment Act मध्ये छळवणूक म्हणजे चुकीच्या इराद्यानं महिलेच्या पाठलागाला दंडनीय अपराध मानलं गेलं आहे.

या कायद्यावर जर स्पष्ट विश्लेषण केलं तर हेच लक्षात येतं की छळवणूक केवळ पुरूषच करू शकतात, हे जणू गृहितच धरण्यात आलं आहे.

पुरूषांसाठी कायदा नाही?

पण जर एखाद्या पुरुषाबरोबर छळवणुकीची घटना झाली तर, किंवा एखाद्या महिलेने बलात्कार केला तर? तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की अशा घटनांसाठी कोणताही कायदा नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील रेखा अग्रवाल सांगतात, "IPC 354D फक्त पुरुषांना लागू आहे. हा कायदा स्त्रियांना लागू होणार नाही. भारतीय दंड संहितेत पुरुषांच्या छळवणुकीप्रकरणी कोणताही कायदा नाही."

"जेव्हा आपण 21व्या शतकात आधुनिक भारताबद्दल बोलतो. जे काम पुरुष करतात, तेच काम स्त्रियादेखील करू शकतात. त्यात छळवणुकीचाही समावेश आहे. मला वाटतं की स्त्रियांनी केलेल्या छळवणुकीसाठी कोणताच कायदा अस्तित्वात नाही."

'स्त्रियांनी केलेल्या छळवणुकीबाबत कोणताच कायदा अजूनही नाही', असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, 'जर महिलांना समानता हवी असेल, तर मग गुन्हा केल्यावर शिक्षेतसुद्धा समानता हवी. जर एखादी स्त्री छळवणूक करत असेल तर त्याबाबतीतसुद्धा कायदा हवा. जर एखाद्या पुरुषाने त्याच्याबरोबर झालेल्या छळवणुकीचे पुरावे दिले, तर त्यांना कायद्याचा आधार मिळावा म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा मिळेल."

Image copyright Getty Images

सर्वोच्च न्यायालयाचे वकील ऋषी मल्होत्रा सांगतात, "जर तुम्ही छळवणुकीची व्याख्या लक्षात घेतली आरोपी कायम पुरुष आणि पीडित कायम स्त्रीच असते. त्यात पुरुष स्त्रीचा पाठलाग करतो, वाईट नजरेनं बघतो. जर पुरुषाच्या जागी 'कोणतीही व्यक्ती', म्हणजे पुरुष किंवा स्त्री कोणीही, असं केलं, तर जास्त बरं होईल."

मुलांबरोबर जेव्हा छळवणूक होते

पंजाबमध्ये राहणारे रज्जी एस आपल्याबरोबर झालेल्या छळवणुकीबद्दल सांगतात, "तुम्हाला कोणीतरी रोखून बघणं, हे फार विचित्र असतं. तुम्ही जिथे जाता, तिथे त्या नजरा तुमच्या मागावर असतात. हे खरं आहे की मुलींनाच जास्त छळलं जातं, पण याचा अर्थ असा नाही की मुलांबरोबर हे होत नाही."

रज्जी पुढे सांगतात, "एकमेकांच्या पसंतीनेच कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात करायला हवी. माझ्याबरोबर असं झालं होतं की, माझं त्या मुलीवर प्रेम नव्हतं. मी तिला मैत्रीण मानत होतो, पण तिला वाटत होतं की मी तिचा प्रियकर व्हावं. पण मी त्यासाठी तयार नव्हतो."

"मी या सगळ्या प्रकरणामुळे वैतागलो नव्हतो, पण मी अस्वस्थ असायचो. यात समस्या अशी आहे लोकांना कळतच नाही की या छळवणुकीची सुरुवात कुठे होते आणि याचा अंत कुठे."

पुरुषांसाठी राष्ट्रीय पुरुष आयोग नाही.

दिल्लीत राहणारे पंकज सांगतात, "एक मुलगी होती. आधी मला वाटलं की मी तिला आवडतो. ही फारच सामान्य गोष्ट आहे. तिचं ते आवडणं हळूहळू मागे लागल्यासारखं झालं. फेसबुकपासून ते प्रत्यक्ष भेटीपर्यंत. मी वैतागून तिला फेसबुकवर ब्लॉक केलं तरी ऑफिससमोर येऊन उभी राहू लागली. लग्न कर, मला भेटत जा, नाही तर काही तरी बरंवाईट करण्याची धमकी द्यायची."

"मला तिच्यात काही इंटरेस्ट आहे, असे कोणतेच संकेत मी माझ्यावतीनं तरी दिले नव्हते. जेव्हा तुम्हाला कुणामध्ये रस नसतो आणि समोरची व्यक्ती असं काही करते, तेव्हा काय करावं काही सुचतच नाही. मुलांनासुद्धा छळलं जातं, असं कोणी मानत नाही."

Image copyright Getty Images

मग मुलींनी मुलांचा पाठलाग केला आहे का?

नाव न सांगण्याच्या अटीवर मुलींनी सांगितलं की, "हो, मी फेसबुकवर एका मुलाला स्टॉक केलं होतं. माझं त्या मुलावर बारीक लक्ष होतं. पण मला असं वाटत नाही की पुढे काही होईल. आणि माझं हे असं स्टॉक करणं त्याला माहिती होतं का, याची मला काही कल्पना नाही. त्याला कदाचित आमचं हे ऑनलाईन स्टॉकिंग छळवणूक वाटत नसेल."

छळवणूक झाल्यास मुलांनी काय करावं?

रेखा अग्रवाल सांगतात, "मुलांसोबत जर छळवणूक झाली तर ते छळवणूक झाल्याबद्दल FIR करू शकतात."

ऋषी मल्होत्रा सांगतात, "हा खूप धुसर फरक आहे. छळवणुकीचा गुन्हा असं मानतो की फक्त पुरुषच छळवणूक करतात. जर बलात्काराशी निगडीत कलम 375चा विचार केला तर त्यातसुद्धा बलात्कार करणाऱ्याला पुरुषच संबोधलं गेलं आहे. जर भारतीय दंड संहितेचा आधार घेतला तर महिलांना छळवणूक किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासाठी अटक करता येत नाही."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : ऑनलाईन छळापासून कसे वाचाल?

पण मुलं छळवणूकीची तक्रार करू शकतात का?

ऋषी मल्होत्रा सांगतात, "पुरुष छळवणुकीची तक्रार दाखल करू शकत नाही. कायद्याने आरोपी फक्त पुरुषाला आणि पीडित फक्त स्त्रीला मानलं आहे. हा भेदभाव करणारा कायदा आहे."

"आज एखाद्या मुलानं सांगितलं की त्याच्याबरोबर बलात्कार झाला आहे, तर त्याच्या बाजूने कोणताही कायदा नाही. लैंगिक अत्याचाराबाबत 354A आहे. त्याच्या व्याख्येनुसार अत्याचार करणारा फक्त पुरुषच असेल."

Image copyright Getty Images

त्याचवेळेला रेखा अग्रवाल सांगतात, "जर स्त्रियांनी छळवणूक केली तर त्या समोर येत नाही. एक प्रकारची भीती त्यांच्यात असते. महिलांसाठी भलेही कोणता कायदा नाही, पण महिला पण स्टॉकिंग करतात."

ऋषी मल्होत्रा शेवटी म्हणतात, "सगळ्या कायद्यात पुरुषांना आरोपी मानलं आहे. काही झालं तर मीच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे."

पण महिलांसोबत जास्त छळवणूक होते, या गोष्टीचा पण इन्कार करू शकत नाही.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2015 साली छळवणुकीच्या 6266 केसेस दाखल झाल्या होत्या. अर्थातच, या सगळ्या प्रकरणांमध्ये स्त्रियांचाच पाठलाग झाला होता. या प्रकरणांमध्ये पुरुषांची छळवणूक झाली नव्हती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
#100Women: बसप्रवासातल्या लैंगिक छळाला कशी तोंड देते आहे केनियाची अनिता एनडेरू

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)