या मुस्लीम आर्किऑलॉजिस्टने पुन्हा उभारली 200 मंदिरं

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: मध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यातील बटेश्वर इथं 8व्या शतकातील 200 मंदिरांचे भग्नावशेष सापडले.

मध्य प्रदेशातल्या भग्नावस्थेतल्या पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या मुस्लीम पुरातत्व शास्त्रज्ञाची बीबीसीचे प्रतिनिधी अनंत प्रकाश आणि सलमान रावी यांनी सांगितलेली ही विलक्षण कथा.

ही गोष्ट आहे एका मुसलमान पुरातत्व शास्त्रज्ञाची. त्यांनी आठव्या शतकातील प्राचीन हिंदू मंदिरं वाचवण्यासाठी मध्य प्रदेशातील खाण माफियांशी पंगा घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली आणि चंबळच्या दरोडेखोरांचंही साहाय्य मागितलं.

आर्कियॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये कार्यरत पुरातत्व शास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी 2005मध्ये मध्य प्रदेशातल्या मुरैना जिल्ह्यात, बटेश्वर येथील 8व्या शतकातील 200 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.

Image copyright K K MOHAMMAD
प्रतिमा मथळा बटेश्वर इथल्या मंदिरांचे अवशेष

नवव्या ते अकराव्या शतकाच्या दरम्यान ही मंदिरं पूर्णपणे जमीनदोस्त झालेली होती. दरोडेखोर आणि खाण माफिया यांचंच या भागात राज्य होतं.

दरोडेखोरांनी केली मदत

बटेश्वरमधील मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम खूपच मोठे होते. त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागणार होता.

के. के. मोहम्मद म्हणतात, "ग्वाल्हेरला पोहोचताच लोकांनी बटेश्वरच्या प्राचीन मंदिरांविषयी सांगितलं. तसंच, तो दरोडेखोरांचा भाग असल्यानं काम करणं कठीण असल्याचंही सांगण्यात आलं."

"दरोडेखोरांना जेव्हा कळलं की, एक मुसलमान मंदिराच्या कामांसाठी आला आहे, तेव्हा त्यांना आर्श्चय वाटलं. त्या काळी त्या भागात राम बाबू, निर्भय गुर्जर आणि पप्पू गुर्जर यांची दहशत होती."

Image copyright K K MOHAMMAD
प्रतिमा मथळा के के मोहम्मद, पुरातत्त्व शास्त्रज्ञ

के के मोहम्मद यांनी त्या दरोडेखोरांची भेट घेतली. त्यांनी असं काय सांगितलं की, ज्यामुळे त्या दरोडेखोरांनी मदत करण्यास लगेच होकार दिला?

या मंदिरांची उभारणी गुर्जर प्रतिहार राजांनी केली आहे. त्याच गुर्जर समुदायातले हे दरोडेखोर होते. त्यामुळे एका अर्थानं ते राजकुमारच आहेत, असं मोहम्मद यांनी त्यांना सांगितलं.

तेव्हापासून या मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात त्यांनी कर्तव्य भावनेनं मदत करण्यास सुरुवात केली.

वैदिक मंत्रांची मदत

मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात खूप अडचणी होत्या. एवढ्या मोठ्या परिसरात पसरलेल्या मंदिरांच्या अवशेषांतून हवे असलेले भाग शोधून काढणं महाकठीण कामा होतं.

के. मोहम्मद यांनी वैदिक मंत्रांचा अभ्यास केला आणि या मंदिराचा नकाशा समजून घेतला.

Image copyright K K MOHAMMAD
प्रतिमा मथळा मंदिरांचे अवशेष

"मंदिरात कोणतीही मूर्ती नव्हती. त्यामुळे मंदिर कोणाचं आहे हे लक्षात येत नव्हतं. त्याचा विचार करत असतानाच आयताकृती जागा दिसली. त्यावरुन ते नंदिस्तान असावं असं मला वाटलं.

कारण विष्णू मंदिर असतं तर ती जागा चौकोनी असती, शिवाय, विष्णू मंदिराच्या बाहेर गरुड स्तंभही असतो, " असं मोहम्मद म्हणाले.

"वाहनं वृषभो यस्य वासुकिः कंठभूषणम् ।

वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः ।।

या मंत्राचा जप करत मोहम्मद यांनी नंदीच्या अवशेषांची स्थापना त्या जागेवर केली. या मंत्रात शंकराचं मंदिर आणि त्यातील नंदीचं स्थान यांचं वर्णन आहे. त्यावरुनच, हे शंकराचं मंदिर असल्याचं स्पष्ट झालं.

संघाकडे मदत मागितली

चंबळमधील दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यात आल्यावर खाण माफियांनी मंदिरांच्या परिसरात खाणकाम सुरू केलं.

Image copyright K K MOHAMMAD
प्रतिमा मथळा मंदिराचे अवशेष

"या खाणकामामुळे मंदिरांची अवस्था जीर्णोद्धाराआधी होती, तशीच झाली. अनेकांकडे मदत मागितली पण काहीच झालं नाही. त्यानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांना मदतीसाठी पत्र लिहिलं. त्याचा फायदा झाला आणि मंदिराच्या शेजारील खाणकाम थांबलं," असं मोहम्मद यांनी सांगितलं.

के. सुदर्शन यांनी मोहम्मद यांचं पत्र आल्यावर तत्कालीन केंद्र सरकारला या विषयात लक्ष घालण्यास सांगितलं.

त्यावर केंद्रातील काँग्रेस सरकारमधील मंत्री अंबिका सोनी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कळवलं.

Image copyright K K MOHAMMAD
प्रतिमा मथळा अंबिका सोनी यांचं पत्र

त्यावर, राज्य सरकारनं हालचाली केल्या आणि मोहम्मद यांनी मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू केलं.

आज त्यातील अनेक मंदिरं मोहम्मद यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा उभी राहिली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)