प्रेस रिव्ह्यू : एकतर्फी प्रेमातून महिलेला जिवंत जाळले

हैदराबाद

फोटो स्रोत, UNKNOWN

एकतर्फी प्रेमातून हैदराबादमध्ये महिलेला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिला गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता काम आटोपून घरी परतत होती. त्यावेळी तिच्यावर हल्ला करण्यात आला.

बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि एक पुरुष वाद घालताना निदर्शनास आले होते. त्यानंतर त्या पुरुषानं तिच्या अंगावर रॉकेल टाकून आग लावली.

स्थानिक लोक पीडितेला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला.

"कार्तिक वंगा असं हल्लेखोराचं नाव आहे. मृत महिलेच्या पूर्वीच्या कंपनीत तो तिच्यासोबत काम करत होता. तसंच गेल्या दोन वर्षांपासून तो तिला लग्नासाठी आग्रह करत होता. पण, महिला त्याला सतत नकार देत होती. अशी माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली आहे.

बोंडअळीग्रस्तांना 30 हजारांची मदत

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईपोटी 30 ते 37 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

फोटो कॅप्शन,

गुलाबी बोंडअळी

कोरडवाहू क्षेत्रातल्या कापसासाठी प्रतिहेक्टरी 30 हजार 800 रुपये तर बागायती क्षेत्रासाठी दोन हेक्टरमागे 37 हजार 500 रुपये मदतीची घोषणा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

मात्र सरकारनं जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. लोकसत्तानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

तसंच ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातल्या फळपिकांसाठी हेक्टरी 43 हजार तर भाजीपाल्यासाठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत देण्यात येणार आहे.

विदर्भात आणि इतर भागात धानावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं त्यासाठी हेक्टरी 7870 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

2000 रुपयांची नोट बंद होणार ही अफवा

नोटबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.

फोटो स्रोत, AFP

मात्र आता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भात ट्वीट करून ही अफवा असल्याचं सांगितलं आहे.

2 हजार रुपयांची नोट बंद होणार याबद्दल फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेऊ नका, असं जेटलींनी ट्वीटद्वारे स्पष्ट केलं आहे.

एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

त्या 9 बँका बंद होणार नाहीत

बँक ऑफ इंडियासह नऊ बँकांवर केलेल्या कारवाईबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) स्पष्टीकरण दिलं आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES

RBIनं केलेल्या तातडीच्या सुधारणेच्या कारवाईमुळे (प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन) या बँकांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

बँक ऑफ इंडियासह आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक, कॉर्पोरेशन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे.

या बँकांनी वितरित केलेली कर्जे संकटात सापडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकांना नव्यानं कर्जे देता येणार नाहीत, तसंच शेअर धारकांना लाभांशाचं वाटपही करता येणार नाही.

RBIनं या बँकांना प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शनसाठी (तातडीच्या सुधारणांसाठीची कारवाई) बनवलेल्या यादीत टाकलं आहे.

सलमान खान, शिल्पा शेट्टीच्या फोटोला जोडे

अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

फोटो स्रोत, AFP

चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान सलमाननं टीव्हीवरील एका कार्यक्रमात अपशब्द वापरला. तर शिल्पानंही त्या शब्दाचा वापर केला. यामुळे ते दोघेही अडचणीत आले आहेत.

सलमान आणि शिल्पानं वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या अखिल वाल्मिकी समाजानं यावेळी केली.

दरम्यान सलमान आणि शिल्पाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत राजस्थानच्या अजमेर भागातल्या वाल्मिकी समाजानं त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)