ख्रिसमसचा खाऊ! आजच्या मेजवानीत कोणकोणते पदार्थ विशेष?

  • मनस्विनी प्रभुणे
  • बीबीसी मराठीसाठी
गोवा

फोटो स्रोत, Manaswini prabhune

डिसेंबर म्हटलं की अर्धा भारत सदेह नाही तर मनाने तरी गोव्याला पोहोचतोच. आणि ख्रिसमसला तर गोव्याची रंगत काही औरच!

गोमांतकीयच काय पण गोव्याबाहेरील अनेक जण मुद्दाम या काळात ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यात येतात.

ख्रिसमस साजरा करावा तो गोव्यातच. २४ डिसेंबला मध्यरात्री चर्चमध्ये येशू जन्माची होणारी प्रार्थना, गायली जाणारी वेगवेगळी 'कॅरोल' यामुळे ख्रिसमसच्या वातावरणात सुंदर भर पडते.

पण या सगळ्याची तयारी मात्र खूप आधी सुरू झालेली असते.

डिसेंबर सुरू होताच घरांना रंग देणं, विविध आकर्षक शोभिवंत गोष्टींनी घराला सजवणं, अंगणात गोठ्यातील येशूचा जन्माचा देखावा तयार करणं, खिडक्या-दारांवर नक्षत्र (चांदणी) लावणं अशा गोष्टींनी घराघरात ख्रिसमसच्या तयारीची लगबग सुरू होते.

त्या काळातली महिलांची लगबग अवर्णनीय असते. बेक्ड कुकीज, केक यांचा सुगंध घराघरात दरवळत असतो.

याशिवायही घराघरात काही पारंपरिक पदार्थ बनवले जातात. आधी अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यात आणि नंतर त्या अतिशय आदरातिथ्यानं सर्वांनां खाऊ घालण्यात त्या मग्न असतात.

ख्रिसमस स्पेशल गोवन पदार्थ

पोर्तुगीजांनी गोव्यात येऊन इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्यांच्या खाद्यसंस्कृतीतल्या काही पदार्थांची छाप पाडली. बेक करणं ही तर त्यांनीच दिलेली देण. भारतातली पहिली बेकरी गोव्यात सुरू झाली.

फोटो स्रोत, Alex Wong/getty

पाव, पेस्ट्री, केक या गोष्टी प्रामुख्यानं या बेकरीमध्ये होऊ लागल्या. आता घराघरात हे सर्व पदार्थ बनवले जातात. गोव्यातल्या काही पारंपरिक गोष्टींचाही प्रभाव बेक केलेल्या पदार्थांवर पडला.

गोव्यात घराघरात उत्तोमोत्तम कुकीज बनवल्या जातात. 'कलकल' पारंपरिक पद्धतीनं बनवली जाणारी कुकीज खास ख्रिसमससाठी बनवली जाते.

'दोदोल', 'बेबिंका', 'दोस' आणि 'सांना' हे देखील पारंपरिक पदार्थ खास ख्रिसमससाठी बनवले जातात.

आता यातले काही पदार्थ दुकानातही मिळू लागले आहेत. पण तरीही ख्रिसमसच्या आधी घरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन हे पदार्थ बनवण्यात जी मजा आहे ती दुकानातून विकत आणून ते पदार्थ खाण्यात मजा नाही.

1. दोदोल

नाचणीच्या पिठापासून बनणारा हा पदार्थ अतिशय पौष्टिक असतो. दुलदुलीत अशा मऊसर वड्यांना दोदोल असं म्हणलं जातं.

फोटो स्रोत, Manaswini Prabhune

फोटो कॅप्शन,

नाचणीच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जातो.

साहित्य-

२ वाटी नारळाचं दूध, ४ वाटी नाचणीचे पीठ, चार चमचे तूप किंवा खोबरेल तेल, ४ कप माडाचा गूळ म्हणजेच Coconut Jaggery (माडाचा गूळ नसल्यास उसाचा गूळ किंवा साखर घातली तरी चालते. पण माडाचा गुळाने दोदोलला जी चव येते ती दुसऱ्या कशानेही येत नाही)१ चमचा गव्हाचे पीठ, वेलची पावडर, चवीनुसार काजू-बदाम.

कृती-

गूळ बारीक किसून घ्यावा. ४ वाटी नारळाच्या दुधात नाचणीचे पीठ, गूळ विरघळेपर्यंत, एकजीव होईपर्यंत ढवळावे. ज्या भांड्यात दोदोल करणार ते जाड बुडाचं असलं पाहिजे.

त्या भांड्याला आधी तुपाचा हात लावून त्यात चार चमचे तूप घालून त्यात काजू आणि बदाम लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत. त्यातच नाचणी आणि माडाच्या गुळाचं एकजीव केलेले मिश्रण घालून ढवळत राहावं.

गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. थोडं घट्ट होऊ लागलं की त्यात वेलची पावडर आणि थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून मिश्रण ढवळून घ्यावं.

मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर एका ट्रे मध्ये किंवा छोटे छोटे केकचे कप मिळतात त्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावं. ट्रे मध्ये घातल्यास ते नीट पसरवून त्याच्या छान वड्या पाडाव्यात. त्यावर काजू किंवा बदामने सजावट करावी.

दोदोल हा पदार्थ मऊसूत असतो. इतर वड्यांप्रमाणे या वड्या कडक नसतात. याची चव मुळात माडाच्या गुळावर अवलंबून असते आणि त्यात खोबऱ्याचं तेल वापरल्यास आणखी वेगळीच चव येते. दोदोल हा संपूर्ण शाकाहारी पदार्थ आहे.

2. बेबिंका

बेबिंका हा एक पुडींग किंवा पेस्ट्रीचाच प्रकार आहे. हा पदार्थ इंडो-पोर्तुगीज प्रकारात मोडतो. पोर्तुगाल आणि मोझाम्बिक देशातही बेबिंका बनवला जातो.

फोटो स्रोत, Manaswini prabhune

फोटो कॅप्शन,

ही इंडो पोर्तुगीज डिश गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

वरवर साधं वाटणारं हे पुडींग बनवताना बराच वेळ जातो. पण शेवटी हातात येणारा हा पदार्थ सगळे श्रम विसरायला लावतो. मूळ बेबिंका हा १६ थरांचा बनवला जायचा.

आता किमान ७ थर असलेला बेबिंका बनवला जातो. काहीजणी या ७ थरांच्या बेबिंकातील प्रत्येक थराला वेगळा रंग देतात. जणू इंद्रधनुष्यच.

साहित्य-

५ अंडी, २०० ग्रॅम साखर, १ कप मैदा, ४०० ग्रॅम नारळाचं दूध, जायफळ, वेलची, तूप , मीठ.

कृती-

४०० ग्रॅम नारळाच्या दुधात २०० ग्रॅम साखर आणि १ कप मैदा घालून एकजीव होईपर्यंत फेटून घ्यावं. अंड्यातील पिवळा बलक काढून घेऊन पांढरा भाग या मिश्रणात फेटून घ्यावा.

त्यात चवीनुसार जायफळ, वेलची पावडर घालावी. भांड्याला तुपाचा हात लावून एक थर घालून ओव्हनमध्ये २००च्या उष्णतेवर किंवा कुकरला शिट्टी न लावता बेबिंकाचा एक थर बेक करून घ्यावा.

आपल्याला हवे असतील तितके थर अशाच पद्धतीनं बेक करावेत. जसजसे बेबिंकाचे थर तयार होतील तसे ते एकवर एक ठेवावेत. हा देखील एक पारंपरिक गोवन मिष्टान्नाचा प्रकार आहे.

3. कलकल

कलकल हा कुकीजचाच एक प्रकार आहे. नाव तर वेगळं आहेच पण या कुकीज बनवणं म्हणजे एक कल्पक काम आहे. विशेषतः कलकल बनवणं लहान मुलांना अधिक आवडतं.

फोटो स्रोत, Monika gowardhan

फोटो कॅप्शन,

कलकल हा कुकीजसारखा प्रकार आहे.

लहान मुलं जर गोंधळ करत असतील तर, 'अरे किती कलकल करताय' असं म्हणलं जातं. पण इथे जर मुलं कलकल बनवायला मदत करणार असतील तर ती एकदम चिडीचूप होतील. कारण हा पदार्थ बनवताना खूप संयम लागतो.

साहित्य-

१ कप मैदा, १/२ कप रवा, १/४ कप साखर, १/४ कप बटर किंवा तूप, २-३ चमचे दूध, १ अंड, थोडे बदाम, व्हॅनिला इसेन्स आणि तळण्यासाठी तेल.

कृती -

एक भांडं घेऊन त्यात आधी १ कप मैदा, १/४ कप रवा आणि चिमूटभर मीठ घालून हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यावं.

मग त्यात साखर (पिठी साखर असल्यास अधिक चांगलं) २-३ चमचे दूध आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून त्यात घालून छान मसळून घ्यावं. मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करावेत.

यापुढचा भाग अतिशय महत्वाचा आहे. काटे चमचाच्या मागील भागानं गोळ्यावर हलक्या हाताने दाब देऊन काटे चमचा आतल्या बाजूस म्हणजे आपल्या बाजूला वळवायचा.

कुकीजला छोट्याशा शंखाचा आकार येतो. दिसायला देखील अतिशय आकर्षक दिसतात. या केलेल्या सर्व कुकीज तेलात तळून घ्याव्यात. तळताना तेलात खूप जास्त वेळ ठेवू नये.

कुकीज मऊसर राहिल्या तर अधिक चविष्ट लागतात. कुकीज तळून झाल्यानंतर त्यावर शेवटी हलक्या हातानं पिठी साखर भुरभुरावी. याची चव तर लाजवाब. त्याहून जास्त त्याचा आकार आपल्याला आकर्षित करतो. अतिशय कमी वेळात या कुकीज बनतात.

4. दोस

दोस म्हणजे चण्याच्या डाळीच्या वड्या.

फोटो स्रोत, Manaswini prabhune

फोटो कॅप्शन,

दोस पाहून तोंडाला पाणी सुटलं ना...

साहित्य

२०० ग्रॅम चण्याची डाळ, ४०० ग्रॅम साखर किंवा १ वाटी गूळ, दीड वाटी खोवलेला नारळ, चिमूटभर साखर, वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी तूप.

कृती

सर्वप्रथम चण्याची डाळ एक तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. शिजवून झाली की त्यामधलं पाणी काढून टाकून छान एकजीव (पुरण करतो तसंच) करून घ्यावं.

एकजीव केलेलं डाळीचं मिश्रण आता एका नॉनस्टिक भांड्यात घालून त्यात दीड वाटी खोवलेला नारळ, ४०० ग्रॅम साखर, चिमटीभर मीठ, वेलदोड्याची पूड घालून गॅसच्या मंद आचेवर शिजत ठेवावं.

हे मिश्रण सतत ढवळत राहावं लागतं नाहीतर करपू शकतं. साखर विरघळू लागते तसं हे मिश्रण पातळ होऊ लागतं. ते भांड्याला चिकटू नये म्हणून त्यात हळूहळू चमच्यानं तेल सोडत रहावं.

दोसचं मिश्रण घट्ट होऊ लागलं की गॅस बंद करून केळ्याच्या पानाला तुपाचा हात फिरवून त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यावं. थोडं थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. छान मऊसर लुसलुशीत दोस खूप दिवस टिकतात.

5. गोड सांना

सांना हा प्रकार दोन प्रकारे करतात. एकात साखर किंवा गूळ घातला जातो तर दुसऱ्यात यापैकी काही घालत नाहीत. इडली जशी असते तसाच हा प्रकार. पण करण्याची पद्धत जरा वेगळी.

फोटो स्रोत, Manaswini prabhune

फोटो कॅप्शन,

इडलीसारखाचं प्रकार पण अगदी वेगळाचं...

गोवा, कारवार, कर्नाटक तसंच केरळमध्ये अशाच प्रकारचे सांना बनवतात फक्त त्यांचं तिथलं नाव वेगळं आहे. गोव्यात विशेषतः कॅथलिक घरांमध्ये सांना बनवताना त्याचे पीठ आंबवण्यासाठी त्यात थोडी ताडी घातली जाते. या ताडीमुळे सांनाला एक वेगळीच चव येते.

साहित्य

२ कप उकडे तांदूळ, १ कप साधे तांदूळ, १ कप उडीद डाळ, १ वाटी खोवलेला नारळ, अर्धा वाटी गूळ, १ चमचा साखर, २ चमचे इस्ट, अर्धा लीटर ताडी

कृती

सर्वप्रथम उकडे तांदूळ, साधे तांदूळ आणि उडीद डाळ तीन तास आधी वेगवेगळ्या भांड्यात भिजवावी. तीन तासांनी पहिल्यांदा उडीद डाळ एकदम बारीक वाटून घ्यावी.

मग दोन्ही तांदूळ एकत्र करून जाडसर वाटून घ्यावेत (इडलीसाठी जसे जाडसर वाटतो तसे). थोड्या पाण्यात तीन चमचे साखर घालून त्यात २ चमचे इस्ट मिक्स करून ते विरघळे पर्यंत ढवळावे.

साखरेबरोबर विरघळलेलं इस्ट तांदूळ आणि उडदाच्या मिश्रणात घालावं. यातच ५०० मिली ताडी घालून पीठ आंबण्यासाठी ४ तास झाकून ठेवावं.

चार तासानं पीठ एकदम हलकं होऊन जातं. एक वाटी खोवलेल्या नारळात अर्धी वाटी गूळ घालून मोदकासाठी करतो तसं सारण करून घेणं.

इडली पात्रात किंवा वाटीमध्ये आंबलेलं पीठ आणि त्यात प्रत्येकात थोडं-थोडं सारण वरून हलक्या हातानं घालावं. सारण आंबलेल्या पिठात एकदम न घालता इडली पात्रात एकेक पात्र भारत असताना त्यात ते थोडं थोडं करून घालावं.

म्हणजे प्रत्येक सांनामध्ये त्याची चव लागते. इडली जशी वाफवून घेतो तसे हे सांना वाफवून घ्यावेत. सांना इडलीचेच चुलत-मावस भावंडं शोभतील असे असतात.

गोव्यातील ख्रिसमस या अशा आगळ्यावेगळ्या पदार्थांशिवाय साजरा होऊ शकत नाही. इथल्या कॅथलिक घरांमध्ये याकाळात हेच पारंपरिक पदार्थ खायला मिळतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)