'मोहम्मद रफीचं गाणं ऐकवा' : फाशीच्या कैद्याची अंतिम इच्छा

  • रेहान फजल
  • बीबीसी प्रतिनिधी
महंमद रफी

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

मोहम्मद रफी

मोहम्मद रफींच्या विषयी संगीतकार नौशाद नेहमी एक किस्सा सांगतात. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यायची होती. या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली.

या गुन्हेगारानं त्याच्या कुटुंबाला भेटण्याची, विशेष खाद्यपदार्थांची मागणी केली नाही. तर त्यानं इच्छा व्यक्त केली की, त्याला 'बैजू बावरा' सिनेमातलं 'ऐ दुनिया के रखवाले' हे गाणं ऐकायचं आहे.

त्यानंतर एक टेपरेकॉर्डर आणून त्याला हे गाणं ऐकवण्यात आलं.

तुम्हाला माहीत आहे का, मोहम्मद रफी यांनी या गाण्यासाठी 15 दिवस रियाज केला होता. या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर त्यांचा आवाज असा काही बिघडला की, लोक म्हणू लागले की त्यांना पुन्हा त्यांचा आवाज मिळवता येणार नाही.

श्रीलंकेत रफी

पण रफी यांनी लोकांना चुकीचं सिद्ध केलं आणि ते भारतातले सर्वात लोकप्रिय पार्श्वगायक बनले. 4 फेब्रुवारी 1980ला श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना एका विशेष शोसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

त्रिनिनाद इथं एका शो वेळी मोहम्मद रफी.

त्यासाठी 12 लाख लोक जमले होते. तो त्या काळातील जागतिक विक्रम होता.

श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने आणि पंतप्रधान प्रेमादासा कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जाणार होते. पण रफींच्या गायनानं त्यांना असं काही मोहीत केलं की, ते कार्यक्रम संपेपर्यंत तिथंच थांबून राहिले.

रफी यांची सून यास्मीन खालिद यांनी रफी यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. त्या म्हणतात, "रफी परदेशात गेले की तिथल्या भाषेतलं एक गाणं म्हणत. श्रीलंकेत रफी यांनी सिंहला भाषेत गाणं ऐकवलं."

रफींच्या भात्यात सगळेच बाण

ते हिंदीत गाऊ लागले आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. या गर्दीत हिंदी समजणारे फारच कमी लोक असतील.

प्रेमाचं प्रकटीकरण करणारं गाणं असेल, तर ते रफी यांनीच गायलं पाहिजे. किशोर वयातील अल्लड प्रेम असो किंवा प्रेमभंगाची व्यथा, प्रगल्भ प्रेमाचा उद्गार असो किंवा प्रेयसीच्या सौंदर्याचं कौतुक... मोहम्मद रफींना तोड नव्हती.

प्रेम सोडाच! मानवी भावनांच्या प्रकटीकरणाचे जेवढे काही पैलू असतील त्यात ते उत्तम गात. दुःख, आनंद, आस्था किंवा देशभक्तीपर गीत असो किंवा लोकगीत, शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली असा गायनाचा कोणताही प्रकार असो, रफी यांच्या भात्यात सर्वच बाण होते.

रेज ऑफ द नेशन

श्यामसुंदर यांनी पंजाबी सिनेमा 'गुलबलोच'मध्ये त्यांना पहिला ब्रेक दिला. मुंबईतील त्यांचा पहिला सिनेमा होता 'गांव की गोरी.' नौशाद आणि हुस्नलाल भगतराम यांनी त्यांच्यातील प्रतिभेला ओळखलं. त्या काळात शर्माजी नावानं प्रसिद्ध असणारे खय्याम यांनी त्यांना गायनाची संधी दिली.

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

मोहम्मद रफी पत्नी बिल्किससह.

खय्याम सांगतात, "1949ला त्यांनी माझ्यासमवेत पहिली गझल रेकॉर्ड केली. ही गझल होती वली साहेब यांनी लिहिलेली 'अकेले में वह घबराते तो होंगे, मिटाके वह मुझको पछताते तो होंगे.' रफी साहेबांनी ही गझल जशी माझ्या मनात होती, तशीच गायली. जेव्हा हा सिनेमा प्रसिद्ध झाला, तेव्हा हे गाणं 'रेज ऑफ द नेशन' ठरलं."

रफी यांचा सर्वोत्तम कालखंड होता तो म्हणजे 1956 ते 1965. याकाळात त्यांनी 6 वेळा फिल्मफेअर मिळवला. रेडिओ सिलोनवरील 'बिनाका गीतमाला'वर तब्बल 2 दशक त्यांचा प्रभाव आहे.

'आराधना'मुळे रफींना झटका

रफी यांच्या करीअरला झटका बसला तो 1969ला जेव्हा 'आराधना' हा सिनेमा आला. तो काळ राजेश खन्नानं झाकोळला गेला होता. तर आर. डी. बर्मन यांनी मोठे संगीतकार होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं होतं.

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

मोहम्मद रफी यांचा हज यात्रेतील फोटो.

'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'चे निवृत्त सह-संपादक राजू भारतन सांगतात, "आराधनातील सगळी गाणी रफीच गाणार होते. एस. डी बर्मन आजारी पडले नसते आणि आर. डी. बर्मन यांनी त्यांचं काम सांभाळलं नसतं, तर किशोर कुमार समोर आलेच नसते. आराधनामधील सुरुवातीची 2 ड्युएट रफी यांनी गायली आहेत."

भारतन सांगतात, "पंचम यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की, त्यांना जर संधी मिळाली तर रफींच्या जागी किशोरला आणतील. रफी यांची लोकप्रियता घसरली त्याला काही कारणं होती."

"ज्या अभिनेत्यांसाठी रफी गात होते ते दिलीप कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र आणि संजीव कुमार हे जुने झाले होते. त्यांची जागा नवीन अभिनेते घेत होते आणि त्यांच्यासाठी नव्या आवाजाची गरज होती. आर. डी. बर्मन यांच्यासारखे नवे संगीतकार पुढे येत होते आणि त्यांना नवीन करण्याची इच्छा होती."

रफींचं मन मोठं

70च्या दशकात संगीतकारांनी रफींची साथ सोडायला सुरुवात केली. अपवाद फक्त लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा. प्यारेलाल सांगतात, रफींनीच त्यांची साथ सोडली नाही.

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

रफी यांचा मुलगा खालिद यांच्या लग्नात डावीकडून बिल्किस, संगीतकार एस. डी. बर्मन, रफी, खालिद आणि यास्मीन

नामवंत ब्रॉडकास्टर अमीन सयानी सांगतात, "लक्ष्मीकांत पहिल्यांदा गाणं रेकार्ड करण्यासाठी रफींकडे गेले होते. त्यांना सांगितलं की आम्ही नवीन आहोत, त्यामुळे निर्माते जास्त पैसे देणार नाहीत. आम्ही तुमच्यासाठी एक गाण बनवलं आहे. तुम्ही हे गाणं म्हटलं तर मोठे उपकार होतील."

"रफी यांनी धून ऐकली आणि त्यांना ती आवडली. रेकॉर्डिंगनंतर लक्ष्मीकांत थोडे पैसे घेऊन त्यांच्याकडे गेले. पण रफी यांनी पैसे परत दिले आणि आपापसात वाटून खात राहा, असा सल्ला दिला. त्यांनंतर आम्ही रफींची गोष्ट कायम लक्षात ठेवली आणि नेहमीच वाटून खाल्लं."

घड्याळ आणि गाड्यांचा छंद

रफी मितभाषी, विनम्र आणि मधाळ होते. तसंच त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं. बॉलीवूडमधल्या पार्ट्यांना जायला त्यांना आवडत नसे. रेकॉर्डिंगला जाताना ते नेहमी पांढरे कपडे परिधान करत असत.

त्यांनी स्टाईलिश घड्याळं आणि फॅन्सी गाड्यांचा छंद जोपासला.

जेवणासाठी लंडनला

रफी पंतगही उडवत असतं. त्यांचे शेजारी मन्ना डे यांनी बऱ्याच वेळा त्यांचा पतंग कापला होतो. रफींना पाहुणाचाराची हौस फार होती आणि ते अनेक वेळा जेवणासाठी मित्रांना बोलवत असतं.

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

सून यास्मिन सोबत रफी.

यास्मिन खालिद सांगतात, "रफी एकदा ब्रिटनमधील कॉवेंट्री या शहरामध्ये शो करत होते. यास्मिन जेव्हा त्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांचा मूड खराब होता. त्यांनी विचारलं लंडनला जायला किती वेळ लागेल? लंडन जायला 3 तास लागणार हे कळल्यावर त्यांनी यास्मिनला विचारलं तू डाळ, भात आणि चटणी करशील का? यास्मिनने होकार देताच ते म्हणाले, लंडनला जाऊन जेऊ. कुणाला सांगायची गरज नाही."

रफी, खालिद आणि यास्मिन लंडनला आले यास्मिनने जेवण बनवलं. जेवणानंतर रफी यांनी यास्मिनला आशीर्वाद दिले. आणि ते कॉवेंट्रीला परत आले. संयोजकांना त्यांनी हा किस्सा सांगितला तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले.

मोहम्मद अलींशी भेट

रफींना बॉक्सिंगचा मोठा षौक होता. मोहम्मद अली हे त्यांचे आवडते बॉक्सर होते. 1977ला एका शोसाठी ते शिकागोला गेले होते. त्यावेळी रफी यांची ही आवड आयोजकांना समजली. त्यांनी रफी आणि मोहम्मद अली यांची भेट घडवण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे तितकं सोपही नव्हतं.

फोटो स्रोत, YASMIN K RAFI

फोटो कॅप्शन,

महंमद अली यांच्यासह रफी.

संयोजकांनी मोहम्मद अली यांची भेट घेऊन सांगितले की, तुम्ही जितके बॉक्सिंगमध्ये प्रसिद्ध आहात, तेवढेच मोहम्मद रफी गाण्याच्या क्षेत्रात ख्यातनाम आहेत. त्यावेळी मोहम्मद अली त्यांना भेटायला तयार झाले. या भेटीत रफी यांनी मोहम्मद अलीसोबत बॉक्सिंग पोजमध्ये फोटो काढून घेतले.

पद्मश्रीपेक्षा मोठ्या पुरस्काराची योग्यता

मी राजू भारतन यांना विचारलं की, रफी यांना त्यांच्या हयातीत त्यांच्या योग्यतेचा पुरस्कार मिळाला का?

भारतन म्हणाले, "बहुतेक नाही. रफी यांनी पुरस्कारांसाठी कधी लॉबिंग केलं नाही. हा विचार करता त्यांना फक्त पद्मश्री पुरस्कारच मिळू शकला. मला वाटतं त्यांच्या योग्यतेनुसार त्यांचा सन्मान झाला नाही. त्यांना पद्मश्रीपेक्षा मोठा पुरस्कार मिळायला हवा होता."

ते म्हणाले, "1967ला जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाला तेव्हा त्यांनी तो नाकारण्याचा विचार केला होता. पण त्यांना असा सल्ला देण्यात आला की, ते एका विशिष्ट समजातून आहेत. जर पुरस्कार नाकारला, तर गैरसमज होतील. जर त्यांनी तसं केलं असतं आणि वाट पाहिली असती, तर त्यांना पद्मभूषण मिळाला असता आणि तेवढी त्यांची योग्यता होती."

हे वाचलं का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)