प्रेस रिव्ह्यू : 'GDPचे चांगले आकडे मोदी सरकारच्या दबावाखाली'

सुब्रमण्यम स्वामी Image copyright Getty Images

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी केंद्रात असलेल्या नरेंद्र मोदी सरकारवर GDPचे आकडे बदलण्याचा आरोप केला आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, स्वामी म्हणाले, "GDPची जी आकडेवारी तुम्ही आज बघत आहात, त्यावर विश्वास ठेवू नका. कारण मोदी सरकारने केंद्रीय सांख्यिकी आयोगावर GDPची आकडेवारी चांगली दाखवण्यासाठी दबाव टाकला होता. जेणेकरून नोटाबंदीचा अर्थव्यवस्था आणि GDPच्या वाढीवर वाईट परिणाम झाला नाही, असंही सगळयांना जाणवेल."

अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात चार्टर्ड अकाउंट्सना संबोधित करताना ते म्हणाले, "कृपया GDPच्या आकडेवारीवर जाऊ नका. ते सगळे चुकीचे आहेत. मी हे तुम्हाला सांगतो कारण माझ्या वडिलांनी केंद्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना केली होती."

"नुकतंच मी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्यासोबत आयोगाच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. कारण नोटाबंदीनंतर चांगले आकडे दाखवण्याचा दबाव होता. मग त्यांनी अशी आकडेवारी जाहीर केली, ज्यामुळे नोटबंदीचे परिणाम दिसणार नाही," असं स्वामींनी पुढे सांगितलं.

2.पवारांनाही उदारीकरण धोरणाचे तेवढेच महत्त्व

शास्त्रात ज्यांना 'कर्मयोगी' म्हटलं जातं, ती उपाधी शरद पवार यांना लागू पडते, अशी स्तुती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शरद पवारांची केली. औरंगाबादमध्ये शेषराव चव्हाण लिखित 'शरद पवार : द ग्रेट इनिग्मा' या पुस्तकाच्या विमोचन समारंभी ते बोलत होते.

Image copyright Getty Images

लोकसत्तातील बातमीनुसार, सिंग म्हणाले, "आर्थिक उदारीकरणाच्या काळात पवारांचा सल्ला महत्त्वाचा होता. पण उदारीकरणाच्या निर्णयापूर्वी, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते बदल करायला हवेत, या विषयी पवारांनी पुण्याच्या 'चेंबर ऑफ कॉमर्स'मध्ये केलेलं भाषण सुधारणांना पुढे नेण्यास उपयोगी ठरलं. त्यामुळे उदारीकरणाच्या श्रेयात पवारांचा वाटाही सारखाच आहे."

"कृषीमंत्री म्हणून पवारांची कारकीर्द लक्षणीय ठरली आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नी पवारांनी दाखवलेलं सामाजिक भान इतिहास विसरू शकणार नाही," असंही सिंग याप्रसंगी म्हणाले.

3. जिग्नेश मेवाणी महाराष्ट्रात

एक जानेवारी 1818 रोजी ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. यात ब्रिटिशांकडून लढलेल्या दलित समाजातील जवानांचं प्रमाण लक्षणीय होतं.

यंदा या घटनेला 200 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने 31 डिसेंबरला पुण्याच्या शनिवार वाड्यात 'एल्गार परिषदे'चं आयोजन करण्यात आलं आहे.

Image copyright SANJEEV MATHUR

गुजरात निवडणुकीत विजय मिळवणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी या परिषदेला उपस्थित राहणार आहे, अशी बातमी द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रातनं दिली आहे.

इंग्रजांनी या विजयानंतर पुण्यातल्या कोरेगाव भिमा इथं एक विजयस्तंभ बनवला होता. त्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दलित बांधव एकत्र येतात.

4. देशातील 6 टक्के शेतकऱ्यांनाच मिळतो हमीभाव

देशात दरवर्षी सुमारे 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात. मात्र 6 टक्के शेतकऱ्यांनाच हमीभाव मिळतो, अशी बातमी दिव्य मराठीनं दिली आहे.

"देशात फक्त 6 टक्के शेतकऱ्यांनाच हमीभाव मिळतो. उरलेले 94 टक्के शेतकरी थेट बाजारात जातात आणि आडत व्यापारी त्यांचं शोषण करतात," असं शांताकुमार समितीचा अहवाल सांगतो.

"देशात सध्या शेतकऱ्यांवर 12 लाख सात हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. पण सरकार फक्त एक लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याच्या गोष्टी करत आहे," असं शेतकरी नेते अविक शहा यांनी म्हटल्याचा या बातमीत उल्लेख आहे.

5. गळ्यात चपलांचा हार घालून काढली महिलेची धिेंड

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आलूरमध्ये एका महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची धिेंड काढण्याचा प्रकार घडला आहे.

दिव्य मराठीने दिलेल्या बातमीनुसार, आलूर येथील शिवानंद सोमय्या स्वामी हे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. चार दिवसांपूर्वी ते सुटीवर गावी आले. शिवानंदला संशय होता की त्यांच्या एका चुलतीने त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नाहक बदनामी केली होती.

त्यामुळे शिवानंदने शुक्रवारी त्या महिलेच्या घरी जाऊन तिला जाब विचारला. तिला मारहाण केली आणि मग चपलांचा हार तिच्या गळ्यात घालून धिंड काढली.

ABP माझाच्या बातमीनुसार, सरपंचांनी मध्यस्थी करून या महिलेची सुटका केली. या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याची तक्रार मुरुम पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)